सिन्हांच्या ‘आंदोलनाचा धूमकेतू’ ही भाजपचीच खेळी?

सिन्हांच्या ‘आंदोलनाचा धूमकेतू’ ही भाजपचीच खेळी?
सिन्हांच्या ‘आंदोलनाचा धूमकेतू’ ही भाजपचीच खेळी?

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेपर्यंत झाडून सारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलनात उतरले असताना, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अचानक धूमकेतूसारखे अकोल्यात आंदोलन करतात काय अन्‌ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्‍वासनानंतर विजयाचा दावा करीत आंदोलन मागे घेतात काय, या घटनाक्रमामुळे राज्याचे राजकीय वर्तुळ बुचकळ्यात पडले आहे. वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात असताना, ही प्रत्यक्षात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच खेळी असल्याची बाब समोर येत आहे.   भाजपच्या ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सदस्य यशवंत सिन्हा पंधरा दिवसांपूर्वी भंडाऱ्याचे खासदार नाना पटोले यांच्यासोबत व्याख्यानासाठी अकोल्यात आले. त्यांचे पुत्र जयंत हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री असतानाही, जीएसटी, नोटाबंदी व शेतीप्रश्‍नांवरून त्यांनी सरकारवर तुफान टीका केली. त्याच वेळी आंदोलनाची तयारी झाली आणि कापूस, सोयाबीन, धान म्हणजे ‘कासोधा’ धरणे आंदोलनाचा प्रयोग झाला. सिन्हा यांच्या वलयाभोवती आंदोलन फिरत राहिले. त्यांची स्थानबद्धता, देशभरातून त्यांना पाठिंबा वगैरे बाबीच चर्चेत राहिल्या.  खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फळी, अधूनमधून कॉँग्रेसचे नेते सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असताना, सदाभाऊ खोत वगैरे प्रभुती सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा दावा करीत असताना, ‘झारखंडच्या हजारीबागहून येऊन यशवंत सिन्हा आंदोलन करतात’, ही बाब कोणालाही पटलेली नाही. अकोल्यातले भाजपचे नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्याचा प्रश्‍न नव्हता; पण पोलिस मुख्यालयाच्या मैदानात सिन्हा यांनी ठिय्या दिला असतानाही आंदोलन चिघळणार नाही, याची दक्षता नेत्यांनी प्रशासनाला घ्यायला लावली, अशी माहिती आहे.  या पार्श्‍वभूमीवर, सिन्हा यांचे आंदोलन ही भाजपची, विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच खेळी असावी, अशी माहिती समोर येत आहे. भाजपमधील सूत्रांनुसार, सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सूत्रे आपल्याच हाती ठेवून त्या संतापाला मोकळी वाट करून देणे आणि ‘सत्तेतही आपण व विरोधातही आपण’, या लोकांना संभ्रमात ठेवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ही खेळी असावी. अन्यथा, सिन्हा किंवा पटोले यांच्यावर आतापर्यंत सरकारविरुद्ध आंदोलन केल्याबद्दल कारवाई झाली असती. पटोले यांचे सगळे बंड त्यांच्या मतदारसंघाबाहेरच कसे, हादेखील प्रश्‍न आहे.  

अकोलाच का? अकोला हे पश्‍चिम विदर्भ म्हणजे वऱ्हाडाचे मुख्यालय असले; तरी सुरू केले. त्याची दोन कारणे दिली जात आहेत. एकतर अकोल्याचे तीनवेळचे खासदार संजय धोत्रे आणि गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यातल्या वादामुळे भाजपची संघटन पातळीवर वऱ्हाडात मोठी पंचाईत झाली आहे. अकोला जिल्ह्यात बाळापूर-पातूर वगळता सर्व विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. ते सर्व आमदार खा. धोत्रे यांच्यासोबत आहेत. विधान परिषद सदस्य असलेले डॉ. पाटील हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना तिकडून बळ मिळते. अकोल्यातल्या या संघर्षाचे पडसाद पुढच्या निवडणुकीत लगतच्या वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत उमटण्याची भीती आहे. म्हणून धोत्रे यांना शह देण्यासाठी हा प्रयोग केल्याचे मानले जाते. सिन्हा यांनी अकोला निवडण्याचे दुसरे कारण शेतीशी संबंधित आहे. राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा अकोला-खामगाव भागात मोठा जनाधार आहे. तेही अकोल्याचे तीन वेळा खासदार राहिले आहेत. यवतमाळच्या घटनाक्रमामुळे मात्र ते अडचणीत आहेत. अशा वेळी त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या शेतीप्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यात अकोल्याच्या आंदोलनाला यश आले. आंदोलन शिवसेनेच्या जिव्हारी सिन्हा यांचे आंदोलन खासकरून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सातत्याने वऱ्हाडात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून यशवंत सिन्हा यांना फोन केला नाही. त्यांचा फोन आल्यामुळे सौजन्य म्हणून पाठिंबा दिला, असे एका ज्येष्ठ नेत्याने ‘सकाळ’कडे स्पष्ट केले. ‘आम्ही ज्या मुद्द्यांवर मंत्रिमंडळात व बाहेर लढतो आहोत, त्याच प्रश्‍नांवर झारखंडमधून आयात केलेले नेते आंदोलन करीत असतील तर कसे खपवून घेऊ,’ असा सवालही या नेत्यांनी केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com