द्राक्षबागांना ‘डाउनी’चा विळखा

द्राक्ष बागांवर डाउनी आणि फळकूज वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात सरासरी ३० टक्के बागांना याचा फटका बसला आहे. सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण या भागातील अर्लीच्या बागा याला मोठ्या प्रमाणावर बळी पडल्या आहेत. - मनोज जाधव , द्राक्ष उत्पादक, सय्यदपिंप्री, ता. जि. नाशिक
द्राक्षबागांना ‘डाउनी’चा विळखा
द्राक्षबागांना ‘डाउनी’चा विळखा

नाशिक/सांगली/पुणे : राज्यात ऑक्‍टोबरमध्ये ऊन, पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यात ढगाळ हवामान आणि जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांत पाणी साचून डाउनी रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. सप्टेंबरमध्ये काही काळ कोरड्या वातावरणामुळे निश्चिंत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची आता मात्र अचानक बदललेल्या हवामानाने झोप उडवली आहे. डाउनीमुळे एकरी खर्चात मोठी वाढ झाली असून अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडल्या आहेत. पक्व झालेल्या द्राक्षघड व मण्यांवर डाउनी आल्यामुळे त्याची खुडणी कशी करावी? ही चिंता द्राक्ष उत्पादकांना भेडसावत असून हाताशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ अाली आहे.

पोंगा ते पक्वता या विविध अवस्थांत असलेल्या नाशिक भागातील वीस हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावरील द्राक्षबागांवर डाउनीचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वाधिक फटका सटाणा, मालेगाव, कळवण, देवळा या तालुक्‍यांतील अर्लीच्या बागांना बसला आहे. मागील पंधरवड्यात एकट्या डाउनीच्या नियंत्रणासाठी एकरी किमान ३० ते ४० हजारांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला आहे.

म्हणजे डाउनीच्या नियंत्रणासाठी मागील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांचा शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्‍यातील देशिंग आणि शिंदेवाडी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडल्या आहेत. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत दोन हजार एकरांवरील बागांचे नुकसान झाले अाहे.

फळ छाटण्या थांबल्या सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ तालुक्‍यातील देशिंग आणि शिंदेवाडी या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागा सोडल्या आहेत. डाऊणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील फळ छाटण्या संपूर्ण थांबल्या आहेत. डाउणी रोगाचे नियंत्रण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फवारणीची संख्या वाढवली असली तरी रोग नियंत्रणात येत नसल्याचे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात आगाप द्राक्ष फळ छाटणी केलेल्या बागांवर डाउणी रोगाने घाला घातला आहे. तर पलूस तालुक्‍यात द्राक्ष पोंगा अवस्थेत असताना पावसाने सुरवात केली. यामुळे द्राक्षावर डाउणी रोगाचा प्रादुर्भावास सुरवात झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.

नवीन बागांमध्ये कलम करण्याचे काम थांबले द्राक्ष उत्पादकांनी सांगली जिल्ह्यात नवीन बागांमध्ये गेल्या दीड महिन्यापासून कलम करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, या पावसामुळे या बागेवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी बाधित झालेल्या काड्या काढून टाकल्या आहेत. पुन्हा नवीन कलम करण्याचे काम हाती घेतले असले तरी त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. नवीन बागांमध्येही कलम करण्याचे काम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी थांबिवले आहे.

डाउनीचे नियंत्रण ही मोठी समस्या नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्‍याच्या पारनेर, दुधोटे, पिंगळवाडे या भागातील बहुतांश द्राक्ष उत्पादकांनी डाउनीच्या प्रादुर्भावाला कंटाळून बागाच सोडून दिल्या आहेत. १४ ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस राहील असा अंदाज असल्याने या स्थितीत डाउनीचे नियंत्रण ही मोठीच समस्या उभी राहिली आहे.

पिंगळवाडे येथील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक नामदेव भामरे म्हणाले की, सटाणा तालुक्‍यातील 45 टक्के बागांवरील डाउनी हा नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्या पैकी 30 टक्के बागा तर डेंजर झोनमध्ये म्हणजे अतिसंवेदनशील स्थितीत आहे. नाशिक, निफाड, दिंडोरी या तालुक्‍यातील 25 टक्के बागांवर डाउनीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. या भागातील द्राक्ष उत्पादकांना रोज उघडीप मिळताच धुरळणी, फवारणी करावी लागत आहे.

इंदापूर, बारामती तालुक्यात शेतकरी अडचणीत इंदापूर तालुक्यात बोरी, काझड, शिंदेवाडी, लासुर्णे, अंथुर्णे, भरणेवाडी, शेळगाव, कडबनवाडी हा पट्टा द्राक्षबागेचे आगार समजला जातो. या तालुक्यात पाच हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत; तर बारामती तालुक्यातही काटेवाडी, ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, सांगवीचा पट्टा या भागांत दोन हजार एकरांहून अधिक क्षेत्रात द्राक्षबागा आहेत.

२० ते २५ ऑगस्टपासून १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत छाटणी झालेल्या द्राक्षबागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणावर डाउनीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे डिसेंबर महिन्यात विक्रीस येणाऱ्या द्राक्षमालावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले आहे.

द्राक्षावर डाउनीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच फवारणीही मार्गदर्शनानुसार वेळेवर केली पाहिजे, असे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी म्हटले आहे.

  • ढगाळ वातावरण, सततच्या पावसाचा परिणाम
  • नाशिक जिल्ह्यात तीस हजार एकरांवर प्रादुर्भाव
  • सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बागा सोडल्या
  • इंदापूर, बारामती तालुक्यांत दोन हजार एकरांवर नुकसान
  • फळकूज वाढली, एकरी खर्चही अावाक्याबाहेर
  • बागांत पाणी साचल्याने नियंत्रण करणे अवघड
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com