शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भाले

खरिप मेळावा
खरिप मेळावा

अकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना शेतकऱ्यांनी अधिक सजगतेने पेरणी करावी. हवामान खात्याने दिलेला अंदाज, आपल्या भागातील परिस्थिती याचा विचार करून योग्य पिकाची लागवड करावी. बाजारात जे विकते ते पिकविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले.   आगामी खरीप हंगामाच्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. २४)  ‘खरीपपूर्व कृषी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. भाले बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डाॅ. महेंद्र नागदेवे, उद्यानविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, विस्तार शिक्षण संचालनालयाचे डाॅ. काळे, प्रयोगशील शेतकरी तथा उद्योजक अप्पाजी गुंजकर (रा. उंद्री), शेतकरी विजय इंगळे (चितलवाडी) उपस्थित होते.  डॉ. भाले पुढे म्हणाले, आज काळानुरूप शेती करण्याची गरज तयार झाली आहे. वातावरणात झालेले बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी. विद्यापीठाचे बीटी कपाशी बियाणे या हंगामात महाबीजने उपलब्ध करून दिले आहे. त्याची लागवड करावी. कपाशीवर येणाऱ्या बोंड अळी तसेच इतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सजग राहावे. सोलर ट्रॅप, फेरोमोन ट्रॅपचा वापर केल्यास नियंत्रण मिळवू शकतो हे यापूर्वीच्या हंगामात दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाचे कमी खर्चाचे व्यवस्थापन तंत्र वापरावे. सध्या ज्वारीसारखे पीक चांगला पर्याय निर्माण झाला आहे. ज्वारीचे उत्पादन चांगले येते. शिवाय जनावरांसाठी चाराही मिळतो. आंतरपीक पद्धतीसुद्धा काळाची गरज बनली आहे. आपण जे पिकवतो त्यावर प्रक्रीया केली तर त्याचा दर अधिक मिळू शकतो. विविध पिकांचे पर्याय निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी या पीक बदलाचाही विचार करणे काळ सुसंगत ठरेल, असेही डॉ. भाले म्हणाले. मेळाव्यात इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत हंगामासाठी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामातील संभाव्य पाऊसमान, खरीप पिकांच्या जाती, नवीन संशोधित पीकपद्धती, आंतरपीक पद्धती, मृद व जलसंधारण व्यवस्थापन, एकीकृत कीड व रोग व्यवस्थापन, सुधारित अवजारे याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांमार्फत देण्यात आली. मेळाव्याच्या ठिकाणी कृषी विद्यापीठाने तयार केलेले व उपलब्ध असलेले बी-बियाणे, जैविक खते, विद्यापीठ प्रकाशने, निविष्ठा शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केली होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com