शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारी फळपिके घ्यावीत : डाॅ. मोरे

मार्गदर्शन करताना डाॅ. मोरे
मार्गदर्शन करताना डाॅ. मोरे

परभणी ः मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण प्रदेशात पावसाच्या खंडकाळात खरीप पिकांना संरक्षित सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी धरणातील पाणीसाठा आरक्षित करावा. सिंचन व्यवस्थापनात कृषी अभियंत्यांचा अंर्तभाव करावा. पेरू या कमी पाण्यावर येणाऱ्या फळपिकांची लागवड करून या भागात फळप्रक्रिया उद्योग सुरू करावेत. करपरा मध्यम प्रकल्पाची पुनर्बांधणी करावी, अशा शिफारशी सिंचन सहयोगचे अध्यक्ष डाॅ. दि. मा. मोरे यांनी रविवारी (ता. ३१) केल्या. येथील ज्ञानोपासक महाविद्यालय आणि सिंचन सहयोग यांच्यातर्फे दुर्मीळ पाण्याचे आदर्श व्यवस्थापन या विषयावर आयोजित दोनदिवसीय १८ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या समारोप कार्यक्रमामध्ये डाॅ. मोरे बोलत होते. या वेळी माजी खासदार गणेशराव दुधगावकर, परभणी सिंचन सहयोगच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डाॅ. संध्याताई दुधगावकर, कार्याध्यक्ष प्रा. बापू अडकिने, प्रा. डाॅ. पांडुरंग ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमापूर्वी निवळी (ता. जिंतूर) येथील करपरा मध्यम प्रकल्पाचा लेखा जोखा मांडण्यात आला. या वेळी निवळी येथील डाॅ. ठोंबरे यांनी या प्रकल्पांची दुरवस्था, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. बोरी येथील शेतकरी डाॅ. अनिल बुलबुले यांनी कालव्याचे पाणी वेळेवर सोडले जात नसल्याने त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत नसल्याचे सांगितले. कालव्याच्या शेवटच्या टोकाकडे आजवर एकदाही पाणी आले नाही, असे डोहरा येथील शेतकरी छत्रपती मानवते यांनी सांगितले. कालव्याचे पाणी साचून राहत असल्यामुळे जमिनी चिभड झाल्या आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यावर विपुल पाणी असलेल्या करपरा मध्यम प्रकल्पाची गेल्या ४० वर्षांत अवनती झाली आहे. या प्रकल्पाची उंची वाढवून तसेच गाळ काढून साठवण क्षमता वाढवावी असे डाॅ. मोरे यांनी सांगितले. तत्पूर्वी निवृत्त अभियंता श्री. सावळेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्रामध्ये सिंचन प्रकल्पांची आश्वासित क्षमता, जायकवाडी प्रकल्पातील पाणी व्यवस्थापन, देशविदेशांतील पाटपाणी व्यवस्थापन या विषयावर व्ही. एम. रानडे, रा. ब. घोटे, जलसंपदा नियमन प्राधिकरणचे सचिव डाॅ. सुरेश कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. या वेळी सिंचन परिषदेतर्फे देण्यात येणार सिंचन कार्यकर्ता पुरस्कार करपरा मध्यम प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सनदशीर मार्गाने सातत्याने पाठपुरवा करणारे सेवानिवृत्त प्रा. डाॅ. पांडुरंग ठोंबरे यांना देण्यात आला.  पुढच्या वर्षी १९ वी महाराष्ट्र सिंचन परिषद वाडा (जि. पालघर) येथे होणार असल्याचे डाॅ. दि. मा. मोरे यांनी या वेळी जाहीर केले. डाॅ. दि. मा. मोरे यांनी सादर केलेल्या शिफारशी

  • पावसाच्या खंडकाळात खरीप पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा राखीव ठेवावा.
  • कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासकीय यंत्रसामग्री वापरावी.
  • पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी टप्प्या टप्याने नलिकेद्वारे सिंचनासाठी पाणी देण्यात यावे.
  • जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या धरणाचे मजबुतीकरण करावे.
  • पाणीपुरवठ्याचे अर्थशास्त्र समजून घेत पीक नियोजन करावे.
  • पेरूसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करावी.
  • ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी फळप्रक्रिया, सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.
  • मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर द्यावा.
  • जमिनीचा पोत टिकवून ठेवण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
  • गटशेतीला प्राधान्य द्यावे.
  • शेडनेटमध्ये भाजीपाला लागवड करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्यावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com