agriculture news in marathi, Dr. Nagesh Tekale, Article on Tomato | Agrowon

मी आणि लाल चिखल
डॉ. नागेश टेकाळे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

आज टोमॅटोचा किरकोळ बाजारामधील भाव ७०-८० रुपये असला तरी त्याचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना झाला आहे. अनेकांना यापूर्वी किलोस १० रुपयेसुद्धा दर मिळाला नाही. टोमॅटोची शहरी, नोकरदार व व्यापारी समाजामधील वाढती लोकप्रियता आज शेतकऱ्यांना खुणावत आहे.
 

मराठीमधील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यकार भास्कर चंदनशिव हे माझे शालेय जीवनापासूनचे जवळचे मित्र. मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील त्यांचा ‘लाल चिखल’ हा धडा ऐंशीच्या दशकातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या वेदनांचे आणि हालअपेष्टांचे वास्तव चित्रित करणारा होता. मातीमोल किंमतीलाही कोणी टोमॅटो विकत घेत नाही, हे पाहून आठवडी बाजारात त्या शेतकऱ्याने निराश होऊन सर्व टोमॅटो खाली टाकले आणि पायाखाली तुडवून त्याचा लाल चिखल झाला. दिवस-रात्र शेतात खपून उत्पन्न घेतलेल्या मालाची बाजारात झालेली ती शून्य किंमत होती.

आकर्षक डिशमध्ये दोन-तीन टोमॅटोचे उभे-आडवे काप मसाल्याची पूड टाकून आनंदाने खात असणाऱ्या माझ्या मित्राच्या मुलाला मी त्या धड्यावर चार-पाच प्रश्‍न विचारले आणि त्याने त्याची अचूक उत्तरे दिली. मात्र, शेतकरी, त्याचे उत्पादन, त्याच्या मालाला मिळणारी किंमत आणि त्याच्या डोळ्यात आलेले पाणी याबद्दलच्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. हे आम्हाला सरांनी सांगितले नाही, हेच एक पालुपद त्याने लावले होते. २००० सालचा हा प्रसंग आजही मला आठवतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दुःखाबद्दल शहरामधील नोकरदार लोकांना काहीच देणेघेणे नसते. त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात काहीही बदल झालेला नाही. उलट ही दरी वाढत आहे, असेच वाटते. 

दोन दिवसांपूर्वी आमच्या गृहसंकुलात शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला, फळे नेहमीसारखी विक्रीस आली होती. टोमॅटोचा दर ८० रुपये किलो म्हटल्यावर तीन कोटींच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्या गृहिणी ‘हा काय भाव झाला? किती महाग!’ असे दोन-चार वाक्‍य बोलून टोमॅटो न घेताच निघून गेल्या. शेतकऱ्याने स्वहस्ते पिकवलेल्या उत्पादनाच्या खरेदीसाठी घासाघीस करणारा नोकरदार वर्ग महिन्याच्या १ तारखेस बॅंकेत जमा झालेल्या पाच-सहा आकडी रकमेस प्रेमाने गोंजारत असतो. हा विरोधाभास नाही का?

शहरी मानसिकता
आज टोमॅटोची मुद्दाम आठवण येण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांना सुखावणारे त्याचे भाव. मध्यमवर्गीय, नोकरदार मंडळी, श्रीमंताच्या घरी हे फळ कायम दिसणारच. आमच्या लहानपणी वडील आठवडी बाजारातून हिरवे-लाल टोमॅटो आणत आणि आम्ही ते तसेच खात असू. त्याची भाजी खाल्ल्याचे कधी आठवत नाही. शेकडो बिया असले हे फळ त्याकाळी अनेकांना नको असे. आज मात्र ते ताटात हवेच अशी परिस्थिती आहे. टोमॅटो आणि कांदा यांची भाववाढ झाली की नोकरदार वर्गाचे मासिक बजेट कोलमडते हा युक्तिवाद निव्वळ हास्यास्पद आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर दोन पैसे जास्त मिळू लागले, की नोकरदारांना मासिक बजेट आठवू लागते. 

मी मागील आठवड्यात पंजाब, हरियाना, आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेलो होतो. चंदिगड मुक्कामात सेक्‍टर २६ मध्ये असलेल्या धान्य आणि भाजीपाला मार्केटला आवर्जून भेट दिली. टोमॅटोचे भाव ४० रुपयांवरून ५० रुपयांवर गेल्यामुळे खरेदीदार नाराज होते. मी ठोक व्यापाऱ्याशी चर्चा केली. ‘‘शेतावरून येणारा  ट्रक आम्हाला ३० रुपये किलो भावाने पडतो, त्यामुळे हा दर आहे. हे लोक चारचाकी वाहने घेऊन येतात, चार-पाच किलो टोमॅटो घेऊन जातात. टोमॅटोपेक्षा पेट्रोलवर पैसे जास्त   जातात, पण शेतकरी आणि विक्रेत्यास दोन पैसे मिळाले, की यांचा पोटशूळ होतो आणि वृत्तपत्रे किचन बजेटच्या नावाखाली त्यास खतपाणी घालतात. हातगाडीवर टोमॅटो, कांदे विकणारे  प्रति किलो ५ रुपये जास्त लावतात. पण त्यांची मेहनत किती असते याचा विचार कोणीही करत नाही.’’ त्या विक्रेत्याचे बोलणे मला पटत होते, पण मध्यमवर्गीय मनोवृत्तीवर काय बोलणार! 

२८ ऑक्‍टोबरचा चंदिगडहून प्रसिद्ध होणारा इंग्रजी पेपर हातात होता. त्यामधील रॉटन टोमॅटोज (लाल चिखल) या लेखाने माझे लक्ष वेधून घेतले. ज्या वेळी अमृतसरला टोमॅटोचा भाव ४० रुपये किलो होता तेव्हा हाच टोमॅटो फक्त ३० कि.मी. दूर असलेल्या लाहोरमध्ये ३०० रुपये किलो भावाने विकला जात होता. कारण ‘वाघा’ सीमारेषेवरून पाकिस्तानमध्ये भारतीय भाजीपाला नेण्यास बंदी आहे. अनेक पंजाबी शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणावर टोमॅटोचे उत्पन्न घेतले, अचानक आयात-निर्यात बंदी झाली आणि या नाशवंत फळाचा लाल चिखल झाला. दिवाळीमध्येच तुटवडा जाणवू लागला आणि भाववाढ झाली. यात मूठभर शेतकऱ्यांचा फायदा झाला, पण त्या आधी लाखो शेतकरी पोळून निघाले. असाच प्रकार इतर भाजीपाला आणि केळीमध्येसुद्धा घडला. 

चीनमधील अनुभव
देशामधील शेती उत्पादनाच्या आयात-निर्यात धोरणांचा आणि निर्णयांचा अभ्यास करताना शेतकऱ्यांचे हित जपणे अतिशय महत्त्वाचे असते आणि याच करता केंद्र शासनाच्या अशा समित्यांवर शेतकऱ्यांचे अभ्यासू प्रतिनिधी हवेतच. मी चीनमध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे एका चिनी मित्राच्या घरी गेलो होतो. टेबलवर एका टोपलीत लालभडक टोमॅटो ठेवलेले होते. ते आठ दिवस आधीचे होते, हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. आपल्याकडे पिकलेल्या टोमॅटोचा बाहेरच्या वातावरणात लगेच लगदा होतो. चीनमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नाशवंत फळभाज्या व इतर उत्पादनावर प्रक्रिया करून त्यांची नाशवंत होण्याची प्रक्रिया पुढे ढकलली जाते. हा शेतमालाचा सन्मानच नव्हे काय? चीनमध्ये जेव्हा फळभाज्या अथवा इतर फळांचे भाव कमी असतात, तेव्हा शेतकरी फळांची पक्वता रोखण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी विशिष्ट संप्रेरकांचा सौम्य फवारा मारतात, जेणेकरून बाजारात योग्यभाव येताच फळांची तोडणी करणे शक्‍य होते. त्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करते. तिथे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या नाशवंत फळे व भाज्यांची साठवण करण्यासाठी अनेक अद्ययावत शीतगृहे आहेत.

आज टोमॅटोचा किरकोळ बाजारामधील भाव ७०-८० रुपये असला तरी त्याचा लाभ फार कमी शेतकऱ्यांना झाला आहे. अनेकांना यापूर्वी किलोस १० रुपयेसुद्धा दर मिळाला नाही. टोमॅटोची शहरी, नोकरदार व व्यापारी समाजामधील वाढती लोकप्रियता आज शेतकऱ्यांना खुणावत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये आपआपसात वाटून विभागून उत्पादन घ्यावयास हवे. शासनाने त्यांच्याकरिता शीतगृहांची व्यवस्था करावी. बाजारात एकदम माल आला, की भाव कोसळतातच, पण हाच माल ठराविक संख्येत आला तर भाव नियंत्रणात राहतात हे साधे अर्थशास्त्र आहे. परिपक्व टोमॅटो ग्राहकांच्या घरी जाईपर्यंत १०-१२ दिवस तसेच ताजे कसे राहतील यावरसुद्धा संशोधन, प्रबोधनाची गरज आहे. सर्व उत्पादन खर्च वजा जाता जर ५० टक्के नफा मिळत असेल तर टोमॅटो हे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने नगदी पीक ठरेल. 

- डॉ. नागेश टेकाळे
 : ९८६९६१२५३१
(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.) 
 

इतर संपादकीय
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
गावची कुंडली मांडता आली पाहिजेशहरी महिलांना साद घालून १९९२ ला कोल्हापुरात...
उत्पन्नवाढीची सूत्रेअर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद...
‘जलयुक्त’कडून दुष्काळमुक्तीकडे...राज्यातील मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षण प्रवण...
शेखचिल्ली धारणा कधी बदलणार?खरीप पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रबी...
बोंड अळीबरोबरच्या लढाईत हवी दक्षताराज्यात कापसाचे क्षेत्र ४० लाख हेक्टरवर आहे....
निर्धार गावांच्या सर्वांगीण विकासाचागावचा विकास आराखडा सरपंचाची निवड आतापर्यंत...
योजना नको, गैरप्रकार बंद करादेशाच्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणी अहवालात ...
ग्रामविकासातून जाते उन्नत भारताची वाट२१व्या शतकात भारताला एक प्रगत राष्ट्र बनविण्याचे...
प्रश्‍न वसुलीचा नाही, तर थकबाकीचा!तुलनेने अधिक संपन्न असलेले, पण बॅंकांची कर्जे...
नको बरसू या वेळी...जिवापाड जपलेला घास तोंडाशी रे आला। नको बरसू या...
चांगल्या उपक्रमाचे परिणामही हवेत चांगलेशेतीसाठी वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधांबरोबर...
अर्थार्जन आणि अन्नसुरक्षेचा वेगळा...चार-पाच वर्षांपूर्वीची आठवण. माझ्या अमेरिका भेटीत...
घातक वीज दरवाढ नकोचनववर्षाच्या सुरवातीलाच आपल्या शेजारील तेलंगणा...
सहनशीलतेचा अंत किती दिवस पाहणार? परवा सुसलाद, तालुका जत या गावी जाण्याचा योग आला....
आनंदवन ः आनंदाचा दुर्मीळ महासागर प्रत्येक माणूस जीवन जगतो. त्याच्या प्रवासाला...
एफपीओ सक्षमीकरणाची दिशाकृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय ग्रामीण भागाचा...
उत्पादककेंद्रित हवे धोरणराज्याच्या पुढील पाच वर्षांच्या वस्त्रोद्योग...
धोरणात्मक पाठिंब्याने चमकेल पांढरे सोने...कच्च्या मालाचे पक्‍क्‍या मालात रूपांतर करून या...