बीटीची संशोधक संस्थांकडून शिफारस नाही : डॉ. शरद निंबाळकर

यवतमाळ ः कपाशीचा चक्रव्यूह या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे.
यवतमाळ ः कपाशीचा चक्रव्यूह या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे.

यवतमाळ ः बीटी तंत्रज्ञान आणताना उत्पादकता वाढेल, असे स्वप्न रंगविण्यात आले. कंपनीकडून लाभ पोचलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बीटी तंत्रज्ञानाचा प्रसार केला गेला. त्याकरिता मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात आधी लागवड करुन त्याच्या शेतातील मोठ्या आकाराची बोंड दाखविण्यात आली. या तंत्रज्ञानाची राज्यातील कृषी संशोधक संस्थांनी कधीच शिफारस केली नाही; त्यामुळेच बोंड अळीसारखे आजचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले, असा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी केला.  बीटी बियाणे, गुलाबी बोंड अळी, फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधा यावर विचारमंथनासाठी आयोजित ‘कपाशीचा चक्रव्यूह’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, शेतकरी न्यायहक्‍क आंदोलन समिती यांच्या संयुक्‍त सहकार्याने शुक्रवारी (ता.१० ) येथील कोल्हे सभागृहात ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. माजी खासदार व कॉंग्रेस उपाध्यक्ष नाना पटोले, प्रगतीशील शेतकरी वामनराव कासावार, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे, पॅन इंडियाचे संचालक डॉ. डी. नरसिम्हा रेड्डी, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर, कृषी अभ्यासक प्रा. मिलिंद राऊत, डॉ. व्ही.एस. नगरारे, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. कॅरो, डॉ. शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शेतकरी न्याय हक्‍क आंदोलन समितीचे देवानंद पवार, अमृतराव देशमुख, सकाळ विदर्भ आवृत्तीचे संपादक शैलेश पांडे यांची या वेळी उपस्थिती होती.  डॉ. विजय वाघमारे म्हणाले, की बीटी तंत्रज्ञान आल्यामुळे फवारणीची गरज नाही, असा गोड गैरसमज कंपन्यांच्या माध्यमातून पसरविण्यात आला; परंतु बीटी तंत्रज्ञानाचे उत्पादकता वाढीत कोणतेच योगदान नाही. त्यासोबतच अशाप्रकारचे तंत्रज्ञान हे केवळ ठरावीक किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे उर्वरित किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकाची फवारणी करावीच लागते; परंतु कंपन्यांच्या फसव्या आश्‍वासनाला फसलेल्या शेतकऱ्यांमुळे बोंड अळीकडे दुर्लक्ष झाले आणि या किडीचा उद्रेक वाढला. गुजरातमध्ये ३० ते ४० टक्‍के बोंड अळीचा प्रादुर्भाव होता. सिआयसीआरच्या शिफारसीनंतर हा प्रादुर्भाव आता ८ ते १० टक्‍क्‍यांवर आला आहे. नॉर्थ इंडियामध्ये नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कापूस काढून गहू, मक्यासारखे दुबार पीक घेतात तर राजस्थानमध्ये आजही देशी किंवा सरळ वाणांची लागवड होते. त्यामुळे या दोन्ही प्रदेशात बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाच नाही. महाराष्ट्रात देखील कापसाची काढणी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये करीत दुबार पीक घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच अशा प्रकारचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होणार आहे. डॉ. कॅरो यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. कीडनाशकाची खरेदी ३ ते ४ हजार रुपयांत होते. त्याऐवजी मजुरांमार्फत तणनियंत्रण आणि निरीक्षणाची कामे केल्यास संबंधितांना रोजगार मिळून कीड नियंत्रणाचे काम कमी खर्चात होईल. त्याकरिता पूर्वीप्रमाणे सरळ वाणांवर भर दिला पाहिजे, असेही डॉ. शरद निंबाळकर यांनी सांगितले. त्यासोबतच कापसाचे मूल्यवर्धन झाल्याशिवाय शेतकरी कापसाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्‍य नाही, असेही ते म्हणाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com