ठिबक अनुदानापासून पुणे जिल्ह्यातील ३६४२ शेतकरी वंचित

ठिबक सिंचन
ठिबक सिंचन
पुणे  ः शेतकऱ्यांना दरवर्षी वेळेवर अनुदान देण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र आहे. यंदा पुणे जिल्ह्यातील ६९६६ शेतकऱ्यांपैकी ३३२४ शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित अनुदानाचे धीम्या गतीने वाटप सुरू असून, अजून ३६४२ शेतकरी ठिबक सिंचन अनुदानापासून वंचित असल्याची स्थिती आहे.
 
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेच्या लाभासाठी वेळेवर अर्ज दाखल करता यावा याकरिता कृषी विभागाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला होता. त्याअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर होती. मात्र शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन कृषी विभागाने अर्ज करण्यासाठी १५ मार्च ही अंतिम मुदत दिली होती. या योजनेसाठी शासनाकडून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते.
 
या योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १३ हजार ५४३ अर्ज दाखल केले होते. त्यापैक अर्जाची छाननी करून सुमारे ६९६६ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध झाला. पूर्वसंमती दिलेल्या शेतकऱ्यांपैकी ५२८३ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच खरेदी केल्याची बिले कृषी विभागाकडे जमा केली आहेत. एक हजार ६८० बिले प्रलंबित आहे. 
 
बिले दाखल केलेल्या ३५३१ शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन संचाची मोका तपासणी केली आहे. १७५२ शेतकऱ्यांची मोका तपासणी प्रलंबित आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ३२४ शेतकऱ्यांना जवळपास आठ कोटी ३२ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. परंतु अजून सुमारे साडेआठ कोटी रुपये शिल्लक असून, त्याचे वाटप सुरू असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
 
तालुकानिहाय शेतकऱ्यांना वाटप केलेले अनुदान
तालुका शेतकरी संख्या वाटप केलेली रक्कम (लाखांत)
बारामती ६२९ १७५.३६
इंदापूर ६९७ १४८.५७
पुरंदर २७४ ४२.११
दौंड ४७९ २९.१५
हवेली २१२ ३८.५६
भोर २१ ४.३२
मुळशी १.३१
वेल्हा ०.६२
आंबेगाव ११३ २९.४९ 
जुन्नर २६३ ७५.८१
खेड ५६ १२.५५
शिरूर ५७४ १७४.७५

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com