ठिबकचे १९० कोटी केंद्रात अडकले

ठिबकचे १९० कोटी केंद्रात अडकले
ठिबकचे १९० कोटी केंद्रात अडकले

पुणे : ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यासाठी ३८० कोटीचा निधी दिला जाईल, असे सांगणाऱ्या केंद्र शासनाने प्रत्यक्षात १९० कोटी रुपये अजूनही राज्याला दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात ठिबकसाठी एकूण तब्बल ७६४ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. ठिबक योजनेच्या इतिहासात राज्याला इतका प्रचंड निधी प्रथमच दिला जात होता. प्रत्यक्षात केंद्र शासनाकडून निधी वाटपात दिरंगाई होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

‘ठिबक संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ६२० कोटी रुपयांचा अनुदान आराखडा केंद्र शासनाने मंजूर केला आहे. यात केंद्राचा वाटा ३८० कोटी रुपये तर राज्याचा हिस्सा २४० कोटीचा आहे. केंद्राचा वाटा आल्याशिवाय राज्य शासनदेखील स्वतःचा हिस्सा देत नाही. केंद्राने पहिला १९० कोटींचा वाटा पाठविला. मात्र, दुसरा १९० कोटाचा हप्ता अजूनही दिलेला नाही,’ असी माहिती सूत्रांनी दिली.

आधीचा पाठविलेला ५० टक्के निधी खर्च केल्याशिवाय दुसरा हप्ता न पाठविण्याचे धोरण केंद्राचे असते. तथापि, या प्रकरणात राज्य शासनाने ७५ टक्के निधी खर्च केलेला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१७-१८ चा निधी मार्चअखेर न पाठवून केंद्राने राज्याच्या कृषी विभागाची डोकेदुखी वाढवून ठेवली आहे.

सूक्ष्म सिंचन योजनेतील स्वतःचा वाटा म्हणून ३८० कोटी रुपयांचा निधी केंद्र शासन देणार असल्याचे पत्र राज्य शासनाला मिळाले होते. त्यानुसार राज्य शासनाने आपला वाटा म्हणून २४० कोटी रुपयांची तरतूद केली. त्याच भरवशावर कृषी आयुक्तालयाने राज्यातील शेतकऱ्यांकडून ठिबक अनुदानासाठी हजारो अर्ज मागवून ठेवले आहेत.

‘आतापर्यंत ४ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ठिबक अनुदानासाठी अर्ज केले असून, त्यात दोन लाख ७३ हजार अर्जांना अनुदानासाठी पूर्वसंमती दिली आहे. पूर्वसंमती दिलेल्या अर्जांची एकूण संख्या पाहिली अनुदानासाठी प्रत्यक्षात ८४३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

६७ हजार शेतकऱ्यांची अडचण शक्य केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून आतापर्यंत एक लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत थेट अनुदान जमा करण्यात आले आहे. परंतु, एक लाख ६७ हजार शेतकऱ्यांना अजून अनुदान देणे बाकी आहे. उपलब्ध निधीतून एक लाख शेतकऱ्यांना अनुदान देता येईल. मात्र, उर्वरित ६७ हजार शेतकऱ्यांच्या अनुदान वाटपाला उशीर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com