agriculture news in marathi, Drought 2018, Farmers in crises Due to drought position in Marathwada, AGROWON | Agrowon

दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडा
संतोष मुंढे
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

गावातील किमान दोनशे बैल चाऱ्याच्या संकटामुळं आजवर विकली गेली असतील. आता माझंच पहा ना, जिथं ५० ते ६० क्‍विंटल मका व्हायचा, तिथं अकरा क्‍विंटल झाला. ते पण बाराशे रुपये दरानं विकावा लागला. चारा नसल्यानं दोन गाय, एक म्हैस अर्ध्या किमतीत विकली. चाऱ्याच्या संकटानं माझ्या भावानंही ६५ हजारांत घेतलेली बैलजोडी ३५ हजारांत विकली तेबी पैसे दोन महिन्‍यांनं देण्याच्या वायद्यानं, इतके बिकट होऊन बसलंय सारं. 
- रावसाहेब जाधव, जामखेड, ता. अंबड, जि. जालना.

औरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व ऑगस्टच्या उत्तरार्धानंतर परागंदा झालेल्या पावसाने मराठवाड्यातील शेतीसमोर संकटांचा डोंगर उभा केला आहे. ग्रामीण अर्थकारणाचे चाके पावसाच्या अवकृपेने गतिमंद झाली आहेत. मुक्‍या जनावरांना बाजाराची वाट दाखविण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिला नाही. दावणी ओस पडल्या तर त्या पुन्हा भरणे कठीणच. खरीप हातचा गेलाय. रब्बीची आशा नसल्यात जमा आहे. फळबागाही अखेरच्या घटका मोजत आहेत. आॅक्टोबरमध्ये बहुतांश भागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. यंदा मराठवाड्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटांच्या गर्तेत गावगाडा गुरफटतच चालला आहे.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर वाढणाऱ्या समस्या थांबविण्यासाठी हव्या असलेल्या शासनाच्या आधारासाठी काही तालुक्‍यांत दुष्काळ निकषांतर्गत दुसरी ''कळ'' दाबली गेली आहे. दाबलेल्या कळेतून येणारा काळ अडचणीतील शेतीउद्योगाला बळ देण्यासाठी निकषाच्या अधीन राहून काय वाढून ठेवते हा प्रश्न आहे. 

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : Video 

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील जवळपास ३१ तालुक्‍यांत दुष्काळी निकषांतर्गत ट्रिगर २ दाबला गेला आहे. त्याअंतर्गत सत्यमापनाची चाचपणी सुरू आहे. काही दिवसांत त्याविषयीची स्पष्टता येईल. त्यानंतर विभाग स्तरावरून राज्य स्तरावर व राज्य स्तरावरून केंद्रीय स्तरावर दुष्काळासंदर्भातील अहवाल पोचविला जाईल. त्यानंतर केंद्रीय स्तरावरून पाहणीसाठी पथक व पुढील प्रक्रिया सुरू होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
खरीप हातचा गेलाय, रब्बीची आशा नाही. सर्वाधिक रोजगार देण्याची क्षमता ठेवून असलेल्या शेतीउद्योगालाच पुन्हा एकदा दुष्काळाच्या सावटाने दुष्टचक्रात अडकविलंय, आता त्यातून मार्ग काढण्यासाठी काय पर्याय पुढे येतात, शासनाकडून काय आधार मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

उत्पादकतेने मोडले कंबरडे 
मराठवाड्यात सोयाबीनची १९ लाख ३३ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ मुगाची १ लाख ६५ हजार हेक्‍टरवर, तर उडदाची १ लाख ५४ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. मराठवाड्यात मुगाची सरासरी हेक्‍टरी उत्पादकता ३ क्‍विंटल ५२ किलो आली आहे. उडदाचे हेक्‍टरी उत्पादन ४ क्‍विंटल आले. तर सोयाबीनची हेक्‍टरी सरासरी उत्पादकता ५ क्‍विंटल १४ किलो आली आहे. हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मूग, उडीद, सोयाबीनची उत्पादकता सरासरीपेक्षा थोडी जास्त आहे. औरंगाबादमध्ये मूग, उडदाची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या निम्यापेक्षाही खूप कमी तर सोयाबीनची उत्पादकता सरासरी उत्पादकतेच्या निम्म्यापेक्षा थोडी जास्त आली आहे. 

कपाशीकडूनही मोठ्या उत्पादनाची आशा नाहीच 
मराठवाड्यात सोयाबीनपाठोपाठ १५ लाख २७ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी व नांदेड हे कापूस उत्पादक जिल्हे. यामधील नांदेडचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यांत पावसाचे प्रदीर्घ खंड व सिंचनाची नसलेली सोय यामुळे कपाशीची होरपळ वाढली आहे. जवळपास सगळीकडील कपाशीची वाढ खुंटली असून औरंगाबाद जिल्ह्यात कपाशीचे २३ हजार ५९९ हेक्‍टर पीक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. पक्‍व होण्याआधीचे बोंड सुकत चालली आहेत. कपाशीची पिके मोठ्या प्रमाणात सुकली असून, लागलेली पाते गळून पडली आहेत. बीड जिल्ह्यात ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

तुरीचे भवितव्यही धोक्‍यात 
मराठवाड्यात जवळपास ४ लाख ५७ हजार हेक्‍टरवर यंदाच्या खरिपात तुरीची पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या जवळपास ८४ टक्‍के क्षेत्रावर असलेल्या तुरीच्या भवितव्यावरही जवळपास दोन महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने संकटाचे ढग गडद झाले आहेत. मोठ्या प्रमाणात फुले लागण्याच्या अवस्थेत तुरीचे पीक आहे. आता पाउसच आला नाही, तर संरक्षित सिंचनाची सोय असलेले क्षेत्र वगळता इतर क्षेत्रावरील तूर काय उत्पादन देईल, हा प्रश्न आहे.

भूजलपातळीची अवस्थाही गलितगात्रच 
मराठवाड्यातील भूजलपातळीची अवस्थाही गलितगात्र झाली आहे. ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजलपातळीत घट नोंदली गेली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७६ विहिरींचे निरीक्षणाअंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळीत सरासरी १.७३ मीटरची घट नोंदली गेली. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यात २.०४ मीटर, बीड जिल्ह्यात २.०७ मीटर, लातूर जिल्ह्यात १.१५ मीटरपर्यंत तर उस्मनाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४.०१ मीटरपर्यंत भूजलपातळीत घट नोंदली गेली आहे. ३८ तालुक्‍यांत ३० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत पावसाची तूट 
मराठवाड्यात अपेक्षीत सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी ४५.४ टक्‍के घट नोंदली गेली. एकूण ७६ पैकी ३८ तालुक्‍यांत पडलेल्या पावसात ३० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत तूट नोंदली गेली आहे.

रब्बीच्या आशेला सुरुंग 
कोरडवाहू ज्वारी, हरभऱ्याची पेरणीची वेळ निघून गेली आहे. ऑक्‍टोबरमध्येच विहिरी उपशावर आल्याने संरक्षित सिंचनाकडूनही फारशी अपेक्षा नाही. विविध प्रकल्पांमध्ये पाण्याची उपलब्धता पाहता सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्यासाठीच सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर होणे, अपेक्षित राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रब्बीचे यंदाचे नियोजन कागदावरच राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. 

हुमणीचेही उसावर आक्रमण 
मराठवाड्यातील ऊस उत्पादकांना हुमणीनेही मोठा फटका दिला आहे. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत हुमणीच्या प्रादुर्भावाने जवळपास १७ हजार ४३७ हेक्‍टरवरील ऊस संपविल्यात जमा आहे. बीड जिल्ह्यात हुमणीच्या प्रादुर्भावाची तीव्रता अधिक आहे. तीनही जिल्ह्यांतील २६ हजार ८७४ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हुमणीने मोठे नुकसान केले आहे. दुसरीकडे जलसंकटामुळे ऊस पोसण्यातही अडथळे येऊन उत्पादकतेत घट येणार हे जवळपास स्पष्ट आहे. 

साडेचार लाख लोकांची तहान टॅंकरवर 
दुष्काळाची छाया मराठवाड्यावर गडद होत चालली आहे. झालेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईही हातपाय पसरायला लागली आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांतील १८६ गाव व ३ वाड्यांपर्यंत ही टंचाई जाऊन पोचली आहे. १८९ गाव वाड्यांमधील ४ लाख ५२ हजार २९३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. १५ ऑक्‍टोबरअखेर औरंगाबाद जिल्ह्यातील १६३ गाव, वाड्या, जालना जिल्ह्यातील २३, नांदेड २, बीड १ अशा १८९ गावांसाठी २११ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

फळबागांचीही होरपळ सुरू 
मराठवाड्यात मोसंबी, आंबा, सीताफळ, द्राक्ष आदी पिकांच्या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. या फळबागांना आतापासूनच होरपळ सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठाकडून फळबाग वाचवा अभियान राबविण्याची गरज भासू शकते, याविषयी विषय मांडला गेला आहे. आता तो विषय दृष्टिपथात असल्याचे चित्र असल्याने त्या अभियानाचे नेमके स्वरूप कसे असेल, याविषयी शासन स्तरावरून गांभीर्याने व तातडीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया
दुष्काळाची पाहणी करायला कुणी आलं नाही. विमा कंपन्यांना परिस्‍थितीशी अवगत करण्याचा प्रयत्न केला परंतु, अजून त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद नाही. मागच्या वर्षी अनेक लोकांना विमा मिळाला नाही. यंदा तसं होऊ नाही, आम्ही अपात्र ठरू नाही म्हणून खबरदारी घ्या म्हटलं तर येऊ पाहू असं उत्तर टोल फ्री क्रमांकावरून मिळतं. 
- तुळशीदास इंगळे, आसई, ता. जाफ्राबाद, जि. औरंगाबाद. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...