गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ

दहा एकरात तीन क्‍विंटल सोयाबीन झाली. सरकी अजून येचायची गरज नाही. दोन एकरात 50 किलो मुग झाले. खर्च व्हायचा तो होउन बसला, हाताला काम नाही. कुटूंबाचा रहाटगाडा चालवावां कसा हा प्रश्‌न आहे. - मंगेश इंगळे, पापळ ता. जाफराबाद जि. जालना
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ

जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. खरिपाची पीक गेल्यात जमा असतानाच रब्बीची आशा मावळली आहे. दिवसभर वेचणी केल्यानंतर किमान गाडी बैलानं आणावा लागणारा कापूस आता गोणीत दुचाकीवर आणण्याची वेळ आली आहे. शिवारच्या शिवारं पावसाअभावी करपली असून प्रत्येक शिवारावर चिंतेचे मळभ दाटले आहे. काही दिवस कसं बसं भागलं पणं पुढच्या वर्षी पाऊस येऊन चारा पाण्याची सोय होईपर्यंत जगायचं कसं हा प्रश्न जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांच काहूर निर्माण करीत असल्याची स्थिती आहे. जलना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेने जालना जिल्ह्यातील मंठा वगळता जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या स्थितीविषयक निकषाप्रमाणे ट्रिगर (कळ) २ दाबली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून दुष्काळाच्या सत्यमापनाचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते.   

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची अॉन द स्पॉट मालिका : जिल्हा जालना​ - 1 झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची अॉन द स्पॉट मालिका : जिल्हा जालना​ -2 संरक्षित शेतीवरही कोसळले संकट  जास्तीची शेती कसल्यापेक्षा कमी क्षेत्रात झेपलं तेवढ करावं म्हणून शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा मार्ग निवडला. परंतु त्या संरक्षित शेतीला लागणारं पाणीही मिळेनास झालयं. शिवाय वातावरणही पोषक नाही, उन्हाची वाढलेली तीव्रता यामुळे संरक्षित शेतीवरही संकट कोसळल्याची माहिती वरखेडा येथील तुळसीदास गोरे यांनी दिली.  चाऱ्याच्या शोधात भटकंती  जाफराबाद तालुक्‍यातील माहोरा मंडळांतर्गत येत असलेल्या वालसा वडाळा येथील समाधान सोरमारे, मजूर, ट्रॅक्‍टर घेऊन जानेफळ पंडित शिवारात दाखल झाले होते. श्री सोरमारे म्हणाले, दोन ते तीन येळेसचं पाऊस पडला, त्यामुळं गावशिवारातील पिकांची वाढ झालीच नाही. घरी पाच जनावरं आहेत. त्यांच्या चाऱ्याची किमान नऊ ते दहा महिने सोय लावावी लागणार म्हणून सवण्यावरून ठिकाणावरून भूस अन्‌ आता जानेफळ शिवारातून मकाचा चारा घेण्यासाठी आलोय. सात ते दहाहजार रुपये एकरी खर्च येतोय. मकाची कणसं तोडून द्यायची व आपला चारा ठरल्याप्रमाणे पैसे मोजून घेवून जायचा असं सूत्र आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची, पिकांची स्थिती बिकट पणं कुणी अजून आमच्या शिवारात पाहणीसाठी फिरकलं नसल्याचे सतीश दळवी म्हणाले.  मक्‍का अन्‌ ऊस सारी उन्नीनं खाल्ली  गंज दहा बारा एकर शेती, मक्‍का लाविली ती सगळी उन्नीन खाल्लली. इकून तिकून आली. त्यात दोन तीन क्‍विंटल झाली. यंदा परिस्‍थिती अवघड आहे. कपाशीला दोन चार कैऱ्या आल्यात. उसाला टॅंकरनं पाणी टाकलं पण त्योबी, उन्नीन खाललां. शासनाचं असं झालं, ते बी तारीख लांबवून राऱ्ह्यलं. कारखान्यात ऊस नेईपर्यंत राहील का नाही हा प्रश्न आहे. परिस्‍थिती अवघड हाय यंदा. अंबड तालुक्‍यातील जामखेडचे तुकाराम धुळे सांगत होते.  दुग्ध व्यवसायावरही गदा  माहोराचे रमेश दळवी म्हणाले, २०१२ च्या दुष्काळात दुधाच्या व्यवसायनं पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आधार देण्याचं काम केलं व्हतं. यंदा मात्र तसं नाही, या आधार देणाऱ्या व्यवसायावरच गदा आलीयं. चारा नसल्यानं व अजून बराच काळ तो पुरवावा लागण्याचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. शिवाय पदरी पैसा नाही, त्यामुळं जनावरं विकण्याशिवाय पर्याय नाही. ऐरवी सणासुदीत गिऱ्हाईकामुळं व्यापाऱ्यांना वेळं मिळतं नाही, परंतु आता गिऱ्हाईकाविना वेळ कसा काढावा अशी परिस्थीती जवळपास माहोराच्या बाजारात असल्याचं श्री. दळवी म्हणाले.  ७२ च्या दुष्काळापेक्षा बिकट स्थिती  अंबड तालुक्‍यातील रोहीलागडचे हरिभाऊ टकले १९७२ चा दुष्काळ अनुभवलेले वृद्ध. त्यांच्या लेखी त्या दुष्काळापेक्षा यंदा बिकट स्थिती आहे. हरिभाऊ म्हणाले, यंदा सध्या कसतरी चाललं पणं पुढचा प्रश्न लई दांडगा आहे. प्यायला पाणी मिळणं का नाही सांगता येत नाही. खर्चापेक्षा दहा पैसे उत्पन्न नाही. १३ एकर कपाशीतून ४ क्‍विंटल हाती आली. तीन बॅग बाजरीतून सात गोण्या उत्पादन झाले. चार बॅगी मुगाचे ५० किलो उत्पादन झालं. दोन बॅगी सोयाबीन पेरलं पणं दहा किलोपणं झालं नाही. जवळपास लाख रुपयांवर शेतीवर खर्च झाले, ४० हजाराचं उत्पन्न हाती येईल की नाही अशी स्थिती.  कुटुंब लागले कामाला  जाफराबाद तालुक्‍यातील चिंचखेडा येथील देवसिंग प्रभू सोनुने यांच्या कुटुंबातील सहा सदस्य जवळपास शेतीतील मका जमा करण्याच्या कामाला लागले होते. मजूरला कामाला लावावं तर त्यांना किमान तीनशे रुपये मजुरी द्यावी कुठूनं त्यामुळं घरच्याच सर्वांनी काम करण्याचा निर्णय घेतला.  बारा एकरांच्या मालकावर हाताला काम शोधण्याची वेळ सात एकरांत आजपर्यंत केवळ ३५ किलो कापूस हाती आला. चार एकर सोयाबीन व्हतं, काढायचं राऱ्हलं पणं तीन क्‍विंटल होईल की नाही याची खात्री नाही. पीक बदल व हातात खेळता पैसा राहील म्हणून एकरभर काकडी केली. त ती पाण्याअभावी जळून गेली. खरीप हातचा गेला, पाऊस नसल्यानं रब्बीची आशा नायं. जगावं तर लागणारच निदान कुटुंबाचं जगणं भागावं म्हणून जालन्याच्या कंपनीत जाऊन काम शोधलंय. चारशे रुपये हाजरीनं पैसे मिळतील. ते स्वीकारल्याशिवाय आता गत्यंतर नाही. जाफराबाद तालुक्‍यातील पापळचे समाधान मोरे यंदाच्या दुष्काळानं त्यांच्या कुटुंबाची मांडलेली दैन मांडत होते. आपल्या शेतात पीक नाही अन्‌ कामही नाही त्यामुळं त्यांच्या पत्नीने रोजमजुरीने जाण्याचा पर्याय स्वीकारल्याचे ते म्हणाले.   प्रतिक्रिया दहा वर्षांपासून किराणाचा व्यवसाय करतोय. क्‍वचित गिऱ्हाईक येतय. मजुराला काम नाही शेतकऱ्याला उत्पन्न नाही त्यामुळं ७० ते ८० टक्‍के गिऱ्हाईकी तुटली. मोजक्‍या शेतकऱ्यांकडे पैसे आहेत. कापडं, किराणा, मेडीकल आदी साऱ्याच व्यवसायावर मोठा परिणाम झालाय.  - रमेश भोजने,  किराना दुकानदार जामखेड ता. अंबड जि. जालना. 

परतेक वर्षी गावात काम मिळायचं कारणं पीक असायचं. यंदा मात्र मोटारपंप, पाईपलाईन असलेल्यांना कामाच्या शोधात बाहेर पडावं लागतयं. गावातल्या 70 ते 80 कुटूंबातील महिलांना गावात काम नसल्याने मिळेल त्या शिवारात कामासाठी जात आहेत.  - दिनकर सरोद, पापळ ता. जाफराबाद जि. जालना.

तीस गुंठ्यात एक बोध कपाशी निघाली. सकरोबाला पाणी पडलां तवापासून गेला तो आलाचं नाही त्याच्या येण्याची वाट पाहणं चालली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‌न गावात बिकट आहे.  - पांडुरंग कोरडे आणि रुख्मीनाबाई कोरडे, आसई ता. जाफराबाद जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com