दुष्काळग्रस्त लातूर जिल्हा ५० टक्के `जलयुक्त`

लातूर ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मोठी कामे झाल्याने सिमेंट नालाबांध भरून वाहत आहेत.
लातूर ः जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात मोठी कामे झाल्याने सिमेंट नालाबांध भरून वाहत आहेत.
लातूर ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. दोन वर्षांत या अभियानात ४१८ किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून, १७५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या अभियानात झालेल्या कामात निर्मित पाणीसाठा क्षमता ४० हजार टीसीएम (हजार घनमीटर) झाला आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्याच्या पाणीपातळीत सरासरी २.१५ मीटरने वाढली आहे. या कामामुळे जिल्हा ५० टक्के जलयुक्त झाला आहे.
 
जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. यात २०१५-१६ मध्ये २०२, २०१६-१७ मध्ये १७६ तर २०१७-१८ मध्ये १४२ गावांची निवड करून काम करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९४३ गावे आहेत. त्यापैकी ५२० गावात जलयुक्त शिवार अभियान पोचले आहे. उर्वरित ४२३ गावांतदेखील पुढील दोन वर्षांत कामे केली जाणार आहेत.
 
नऊ हजार कामे पूर्ण या अभियानात केवळ गाळ काढणे, खोलीकरण किंवा रुंदीकरण करणे हीच कामे नाहीत. तर कंपार्टमेंट बंडिग, सलग समतल चर, माती नालाबांध, वन बंधारे, सिमेंट नालाबांध, सिमेंट साठवण बंधारा, गॅबियन बंधारे, शेततळे, वनतळे, खोदतळे, रिचार्ज शाफ्ट, वृक्ष लागवड, रोपवाटिका, विहीर, बोअर पुनर्भरण, पाझर, साठवण तलाव दुरुस्ती, केटिवेअर दुरुस्ती अशी वीस प्रकारची कामे केली गेली आहेत. दोन वर्षांत ११ हजार २२१ कामे सुरू करण्यात आली आहेत. या पैकी नऊ हजार ४२ कामे पूर्ण झाली आहेत. दोन हजार १७९ कामे प्रगतिपथावर आहेत.
 
४० हजार टीसीएम पाणीसाठा 
जलयुक्त शिवारात केलेल्या कामामुळे जिल्ह्यात सुमारे ४० हजार टीसीएम निर्मित पाणीसाठा क्षमता झाली आहे. हे पाणी संरक्षित सिंचन दिल्यास ६७ हजार ५९० हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. तर दोन संरक्षित सिंचन दिल्यास ३८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. हेच पाणी ठिबक व सूक्ष्म सिंचनद्वारे दिल्यास चौपट क्षेत्राला मिळणार आहे. 
 
दीडशे कोटींचा लोकसहभाग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे त्यांनी लोकसहभागाला अधिक महत्त्व दिले. जिल्ह्यात शासकीय यंत्रणेने ४.४० कोटींचे ६९.७४ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम केले आहे. तर लोकसहभागातून १०५.६१ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यावर १५६.८१ कोटी रुपये लोकांनी खर्च केले आहेत. 
 
निलंग्यात पाणीपातळीत सर्वाधिक वाढ
लातूर जिल्ह्याची पाणीपातळी २.१५ मीटरने वाढली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेने जिल्ह्यातील ३९ पाणलोट क्षेत्रातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली आहे. या निरीक्षणाअंती पाणीपातळीत झालेली वाढ समोर आली आहे.
 
निलंगा तालुक्यात सर्वाधिक ३.६१ मीटरने पाणीपातळी वाढली आहे. रेणापूर तालुक्यात ३.३८, लातूर ३.१६, शिरूर अनंतपाळ ३.७, अहमदपूर १.४४, औसा १.४३, चाकूर ०.३, उदगीर ०.८६, जळकोट १.६६, देवणी तालुक्यांत २.६६ मीटरने पाणी पातळीवाढली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com