दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video सुद्धा)

मोसंबीच्या दोनशे झाडापैकी आतापर्यंत ५० गेली. थोडं पाणी जे मिळतंय त्यातून जेवढी झाडं वाचविता येतील तेवढी वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. - भगवान रोकडे, मांडकी, ता. वैजापूर
औरंगाबाद दुष्काळ
औरंगाबाद दुष्काळ

औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो. वडीलोपार्जित सहा एकर शेती. जवा पाऊस चांगला व्हायचा तवा मीसुद्धा शेतात मजूर लावायचो. पण आता निसर्ग साथ देईना. त्यामुळं मला अन्‌ माझ्या कुटुंबालाच मजुरीने जाण्याची वेळ आली. मुलगा कंपनीत व कुटुंबातील इतर लोक मिळेल तिकडे मजुरीने कामाला जाऊन जेवढे पैसे येतात त्यातून आपल्या गरजा न वाढविता प्रपंच सुरू आहे म्हणून जगणं व्हतयं, ठोक्‍यानं केलेल्या शेतीत राबणारे आपेगाव (ता. गंगापूर) येथील कारभारी धनुरे सांगत होते. मन लागत नाही, पणं त्या निसर्गाकडूनच कृपा व शेती साथ देईल ही आशा त्यांना आहे. ते म्हणाले, पाच पन्नास मेंढरं होती, पण ती चारायला जागा नसल्यानं विकून टाकली. त्यातून सहा एकर शेती घेतली. यंदा दुष्काळामुळं पाणी नाही, जनावरांना चारा नाहीये, शेतकऱ्यांना धान्यसुद्धा विकत घ्यावा लागतं. कामाला जाव तं कामसुद्धा भेटत नाही. जमिनीची मशागत करून ठेवतोय. पणं सारं निसर्गाच्या हातात हायं. यंदा दोन एकरात दहा- पंधरा क्‍विंटल मका झाली. ती हजार रुपये किंटलनं विकली. दुष्काळाचे चटके सहन करणारे शेतकरी काय म्हणतात पहा व्हिडिओत... तीन किंटल कापूस झाला तो पाच हजारानं विकला. साठ हजार खर्च अन पंधरा हजाराचा कापूस. शेतकऱ्याकडं माल असला की भाव मिळत नाही. सुरवातीला कापसाला सहा हजार भाव मिळाला वाटलं सात हजार मिळलं म्हणून कापूस ठेवला त भाव घसरले. शेवटी लई घसरतील म्हणून पाच हजारानं कापूस विकलां. जसा शेतीत उतरलो तशी अपवाद वगळता शेती पिकलीच नाही.  ‘‘सततच्या संकटानं बैलजोडी विकून टाकली अन्‌ मजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. शेतातली कामं संपली की कंपनीत जायचं अन्‌ पानकळा जवळ आल्या की परत शेतीत राबायचं असं सुरू केलं. एकदा शेतीनं साथ दिल्यानं कर्ज फेडून टाकले. त्यानंतर मजुरी अन्‌ शेती असं सुरू ठेवून तीन मुली अन्‌ एका मुलाचं लग्न केलं. मी शेतात राबतो अन्‌ मुलगा कंपनीत कामाला जातो. शेती असली तरी गावातले पन्नास टक्‍के लोक आजही कंपनीत कामाला जातात, कारण निसर्ग शेतीला साथच देत नाही,’’ असेही ते म्हणाले. पिण्याला पाणी नाही तीथ बागेला कुठून आणावं  कुटुंबाकडे चाळीस एकर शेती असलेल्या फातोलाबादच्या सतीश सोनवणे यांना पारंपरिक शेतीला फाटा देत सात वर्षांपूर्वी त्यांनी डाळिंबाची लागवड केली. बागेतून आजवर चार बहराचे उत्पादन मिळाले. यंदा पदरात काहीच नाही. शिवाय बागही पाण्याअभावी जाण्याच्या मार्गावर आहे. प्रत्यक्षात बागेवर झालेला खर्च व उत्पादनातून मिळालेले उत्पन्न याचा ताळमेळ लावता जवळपास १५ लाखांचा तोटा बागेतून झाला. याच गावातील प्रकाश सोनवणे म्हणाले, जमिनी नांगरून ठेवल्या, पाणी पडलं की सोय लावावी लागेल. शेतकऱ्यांकडे पैसा नाहीच. त्यातही दुष्काळी अनुदान निम्म आलं, ४० टक्‍के लोकांना मिळालचं नाही. गावातल्या १५ टक्‍के लोकांना मकाचा विमा मिळाला नाही. १५ एकर शेती, पण  रसवंती चालविण्याची वेळ  करंजगावचे नारायण कचरू धुरट यांच्या कुटुंबाकडे १५ एकर शेती. परंतु या शेतकऱ्यावर दुष्काळामुळे रसवंती चालविण्याची वेळी आली. यंदा त्यांनी १२ एकर कपाशीसाठी एकरी दहा हजार खर्च केले अन्‌ ३ क्‍विंटल कापूस झाला. कुटुंबात सात सदस्य त्यामुळे त्यांच्या चरितार्थ भागविण्यासाठी आपण उन्हाळ्यात रसवंती चालविण्याचा निर्णय घेतला. चार एकर नावावर असलेल्या शेतीवर त्यांना आजवर फक्‍त १९ हजार कर्ज मिळालं. एवढ्या कमी पैशात जमीन कसणं शक्‍य आहे का. शासन मदत देतं ती तुटपुंजी असते, यंदाचं पाहा ना आमच्या भागात अतिदुष्काळ, खरीप रब्बी गेलं; पण विमा परतावा मात्र २२ टक्‍केच मंजूर झाला, असे नारायण धुरट म्हणाले. विम्याचा घोळ कायम  औरंगाबाद जिल्ह्यातील ६ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी २०१८-१९ च्या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविला होता. त्यापैकी ४ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनाच २६५ कोटी ६० लाखांचा विमा मंजूर झाला आहे. जो विमा मंजूर झाला. त्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित परतावा मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  पॅसेंजर बनली मजूर ट्रेन  शासनाची रोजगार हमी योजनेची कामे सुरूच नसल्याने मजुरासोबतच जगणं अवघड झालेल्या शेतकऱ्यांना हाताला काम मिळावे म्हणून औरंगाबाद गाठण्याशिवाय पर्याय नाही. रोटेगाव, परसोडा, करंजगाव व लासूर स्टेशन आदी रेल्वे स्थानकावरून सकाळी हजारो लोक मिळेल ते काम करण्यासाठी औरंगाबाद गाठतात. एकट्या धोंदलगावातून दोनशे ते अडीचशे लोक हाताला काम मिळेल या आशेने रोज येतात. त्यापैकी काहींनाच काम मिळत तर बहुतांश लोकांना परत जावं लागत. उत्पादनाला मुकला ज्वारीचा पट्टा  गंगापूर व वैजापूर तालुक्‍यातील शिंदी सिरजगाव, फातोलाबाद, आपेगाव, हडस पिंपळगाव, धोंदलगाव, सुलतानाबाद, खोजवाडी, लासूर स्टेशनचा परिसर म्हणजे रब्बी ज्वारीचा पट्टा, परंतु यंदा या पट्यात खरीपच हातचा गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे उत्पादनच मिळाले नाही. जे मिळाले ते वर्षभर खाण्याला पुरेल इतकेही नाही. ३० ते ३५ किलोमीटर अंतरावरून आणावे लागते टॅंकरने पाणी  औरंगाबाद जिल्ह्यातील १३४४ गावांपैकी ९९० गाव, वाड्यांमधील साडेसोळा लाखांवर लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. त्यासाठी १०८३ टॅंकर सुरू आहेत. जानेवारीत २० ते २५ किलोमीटरच्या अंतरात मिळणारे पाणी आता ३० ते ३५ किलोमीटरवरून आणण्याची वेळ संबंधित यंत्रणेवर आली आहे. त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो आहे.  प्रतिक्रिया तीन वर्षांपासून सोसायटी थकीत आहे. शेती पिकली नाही अन्‌ हाताला काम नाही म्हणून ती भरल्या गेली नाही. वर्ष झालं पण मागणी करूनही हाताला काम मिळालं नाही.  - सोनाजी डुकरे , पिंपळगाव, ता. वैजापूर 

कर्जमाफी झाली म्हणतात पण २०१४-१५ पासून थकीत असलेलं माझ्याकडील कर्ज अजून माफ झालं नाही. २०१७ ला ते १ लाख १७ हजाराच्या आसपास गेलं होतं. आता त्यात आणखी वाढ झाली असलं.  - विठ्ठल निघोटे, हडस पिंपळगाव, ता. वैजापूर. 

दहा एकरवाल्यावर रोजगार शोधण्याची वेळ आली. या भागात रोहयोची कामे नाहीत त्यामुळं परसोडा, करंजगाव, लासूर स्टेशनवरून रेल्वेनं रोज सकाळी हजारो लोक वाळुंज एमआयडीसीत जातात. अनेकांना घरची भाकर खाऊन कामाविना परतावं लागतं.  - बाळासाहेब जिवरख, धोंदलगाव, ता. वैजापूर.    १२५ उंबऱ्याच्या आमच्या गावात जवळपास ७० एकर मोसंबी होती. पाण्याअभावी यंदा त्यापैकी ५० एकर जवळपास संपली. जी वाचली तीसुद्धा पाऊस वेळेवर आला नाही तर संपेल. पंचनामे झाले नाही. बॅंकेत विमा भरणारांना परतावा मिळाला पण ऑनलाइन भरणारांना मिळालाच नाही.  - रमेश बडक, उंदीरवाडी, ता. वैजापूर. 

१३ पैकी सात आठ जनावरं छावणीत ठेवली. दुभती जनावरं घरी आहेत, ती तिथं ठेवू शकत नाही. त्यांच्यासाठी चार हजार रुपये टनानं ऊस खरेदी करावा लागतोय. पाणी पण इकत घेऊन पाजनं सुरू आहे.  - किरण शेलार, उंदीरवाडी ता. वैजापूर. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com