नांदेड, हिंगोली, परभणीतील बारा तालुक्यांना दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड   ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतील एकूण १२ तालुक्यांमध्ये दुष्काळाची द्वितीय कळ (ट्रिगर २) लागू झाली आहे. या १२ पैकी ६ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये या गावांतील पीक परिस्थितीचे सर्वेक्षण करून नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. नुकसानीच्या प्रमाणानुसार ३० आॅक्टोबरला दुष्काळ जाहीर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

परंतु दुष्काळाची प्रथम कळ लागू झालेल्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि नायगाव, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वगळण्यात आले. या निकषांची फेरपडताळणी कून गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यांतील परिस्थितीचा अहवाल परत सादर केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दुष्काळाची द्वितीय कळ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, उमरी, परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव या तालुक्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक परिस्थिती निर्देशांक (पेरणी क्षेत्र), रिमोट सेन्सिंग आधारित वनस्पती स्थिती निर्देशांक, मृदा आर्द्रता निर्देशांक यानुसार नांदेड जिल्ह्यातील मुखेड, उमरी तालुक्यामध्ये गंभीर तर देगलूर तालुक्यात मध्यम दुष्काळी परिस्थिती आहे.

परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ तालुक्यांमध्ये गंभीर तर परभणी, सेलू, पाथरी,पालम तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळी परिस्थिती असल्याचे आढळून आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे.

दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार ७ आॅक्टोबर २०१७ आणि २८ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तरावर दुष्काळाची प्रथम कळ (ट्रिगर -१) आणि द्वितीय कळ (ट्रिगर -२) अंतर्गत तालुके निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यासाठी अडचणी येत असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीच्या मूल्यांकनासाठी महा मदत ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे.

या प्रणालीच्या मदतीने ट्रिगर -१ लागू झालेल्या तालुक्यांपैकी ट्रिगर २ लागू झालेले तालुके निश्चित करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यामध्ये द्वितीय कळ (ट्रिगर-२) लागू झालेल्या मध्यम तसेच गंभीर दुष्काळी परिस्थिती असेलेल्या तालुक्यांतील १० टक्के गावे रॅंडम पद्धतीने निवडून तत्काळ पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण करण्यात यावे. त्यासाठी ‘महामदत’ मोबाईल अॅपचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

पिकांच्या क्षेत्रीय सर्वेक्षणादरम्यान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आढळून आलेली गावे दुष्काळी म्हणून घोषित जाण्यास पात्र असतील. नुकसानीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास दुष्काळाची तीव्रता गंभीर समजली जाईल. दुष्काळ घोषित करण्यासाठी गाव हा घटक राहणार आहे. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम तारिख ३० आॅक्टोबर आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com