पावसाअभावी पीक प्रात्यक्षिकांवर फिरले ‘पाणी’

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : जिल्ह्यात कडधान्याच्या उत्पादकतेमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून विविध तालुक्‍यांमध्ये तूर, मूग, उडीद पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली, परंतु हव्या त्या वेळी पाऊस नव्हता, त्यामुळे या कार्यक्रमावरच जणू पाणी फिरले आहे.

जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांमध्ये तीन कडधान्य पिकांबाबत कार्यक्रम राबविला गेला. तुरीच्या सलग पीक प्रात्यक्षिकांसाठी धरणगाव तालुक्‍यात १० हेक्‍टरचा प्रकल्प होता. त्यासाठी प्रतिहेक्‍टर ५३५० रुपये अनुदान दिले. तुरीच्या आंतर पिकाचे बोदवड तालुक्‍यात पाच, पाचोरा तालुक्‍यात चार, अमळनेरात दोन आणि एरंडोलमध्ये एक असे १२ प्रकल्प होते. त्यांना हेक्‍टरी ४१५० रुपये अनुदान होते.

मुगाचे प्रतिप्रकल्प १० हेक्‍टर याप्रमाणे मुक्ताईनगरमध्ये एक, जामनेरात सहा, चोपड्यात नऊ, एरंडोलमध्ये पाच, धरणगावात सात असे २८ प्रकल्प होते. त्यांना हेक्‍टरी ३५३८ रुपये अनुदान होते. मुगाचे पीक पद्धतीवर आधारित प्रतिप्रकल्प १० हेक्‍टरचा याप्रमाणे मुक्ताईनगर तालुक्‍यात एक, जामनेरात दोन आणि चोपडा, एरंडोल, धरणगावात प्रत्येकी एक असे एकूण सहा प्रकल्प होते. त्यांना हेक्‍टरी पाच हजार ८८८ रुपये अनुदान दिले गेले.

उडदाची सलग पीक प्रात्यक्षिके जिल्ह्यात १६ प्रकल्पांमध्ये (प्रतिप्रकल्प १० हेक्‍टर) राबविली. त्यांना हेक्‍टरी ३७२५ रुपये अनुदान दिले. उडदाचे पीक पद्धतीवर आधारित सात (प्रतिप्रकल्प १० हेक्‍टर) प्रकल्प होते. त्यांना हेक्‍टरी सहा हजार ७५ रुपये अनुदान मंजूर होते.

या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना २५ रुपये प्रतिकिलो असे अनुदानावर बियाणे देण्यात आले. कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब असे उपक्रम राबविले. पीक पेरणी, त्यानंतरचे व्यवस्थापन झाले. परंतु, अनेक ठिकाणी पावसाने पाठ दिल्याने दुबार पेरणीची वेळ आली. बोदवड, धरणगावमध्ये अडचणी अधिक आल्या.

उत्पादकता वाढलीच नाही जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही महिन्यांत पावसाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादन वाढीवर परिणाम झाला. जी उत्पादकता ठरविली होती, ती यशस्वी झाली नाही. मुगाचे हेक्‍टरी ३०० किलोपर्यंत उत्पादन आले. उडदाचे हेक्‍टरी ४०० किलोपर्यंत उत्पादन आल्याची माहिती आहे. तुरीचे पीक मुक्ताईनगर व इतर भागांत बरे आहे. त्याच्या उत्पादनाचा अंदाज अजून आलेला नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

यंदा मूग, उडदाचे उत्पादन हातीच आले नाही. किरकोळ उत्पादन आले. ते घरापुरते कामी येईल. - संजय हरी ढाके, शेतकरी, आसोदा, जि. जळगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com