धूळ वादळाने उत्तर भारतात धुमाकूळ

धूळ वादळाने उत्तर भारतात धुमाकूळ
धूळ वादळाने उत्तर भारतात धुमाकूळ

जयपूर : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात धुमाकूळ घालणाऱ्या आणि आत्तापर्यंत १२४ बळी घेणाऱ्या धूळ वादळाने सोमवार आणि मंगळवारी पुन्हा राजस्थानातील काही भागात नुकसान केले. सोमवारी रात्रीपासूनच जयपूरसह अजमेरला प्रचंड वाऱ्यांनी, तर बिकानेर भागात धूळ वादळाने हजेरी लावली. राजस्थानातील ३३ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांत या वादळांचा प्रभाव होता. साधारणत: ५० ते ७० किलोमीटर प्रतितास अशा वेगाने वाहणारे वारे आणि धूळ वादळाने गेल्या आठवड्यात ३० जण मृत्युमुखी पडले होते.  दिल्लीत जनजीवन विस्कळित नवी दिल्ली : गेल्या आठवड्यातच उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे १२७ हून जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते. आता दिल्लीत गुडगावसह अन्या काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे वीज प्रवाह खंडित झाला, तसेच झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. या अकाळी पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळित झाले आहे, त्यामुळे येथील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वादळी वाऱ्यामुळे दिल्ली मेट्रोलाही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ ९० किमी प्रतितासापेक्षा जास्त वेगाने आल्यास मेट्रोची वाहतूकही थांबवण्यात येईल.   शुक्रवारपर्यंत पाऊस पुणे (प्रतिनिधी) : उत्तर भारतात आलेल्या धुळीच्या वादळाचे देशभरात परिणाम दिसून येत आहेत. शुक्रवारपर्यंत (ता. ११) ईशान्य, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटा येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  जम्मू- काश्‍मीर आणि परिसरावर असलेला पश्‍चिमी चक्रावात, हरियाना अाणि परिसरावर वाहणारे चक्राकार वारे यामुळे पूर्वराजस्थान, हरियाना, दिल्ली आणि उत्तर प्रदेशामध्ये धुळीच्या वादळाने थैमान घातले आहे. ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे धुळीचे लोट उसळत आहेत. वादळामुळे जम्मू- काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम राजस्थान, पंजाब, हरियाना आणि पूर्व राजस्थामध्ये वादळी वारे, विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. वादळामुळे या भागात हायअलर्ट देण्यात आला असून, शाळांनाही दोन दिवस सुटी देण्यात आली आहे.  पश्‍चिमी चक्रावात, चक्राकार वारे, उत्तर प्रदेशापासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबचा पट्टा (द्रोणीय स्थिती) पुढील २४ तासांमध्ये निवळून जाणार आहे. बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंत उत्तर भारतात पावसाची शक्यता अाहे. तर पुढील चार दिवसांमध्ये पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आेडिशा, झारखंड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पद्दुचेरी येथेही मध्यम ते हलक्या सरी पडतील. तर महाराष्ट्र आणि राजस्थानच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.   उत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग (प्रतिताशी किलोमीटरमध्ये) ठिकाण आणि ताशी वेग : चंडीगड ६२, अमृतसर ५६, सफदरजंग ६४, पालम ५०, अलिगड ५०, मोरादाबाद ५५ पुढील आठवड्यात १३ मे रोजी पश्‍चिम हिमालयाच्या भागात नव्याचे पश्‍चिमी चक्रावात तयार हाेणार आहे. दक्षिण भारतामध्ये पुर्वेकडून वाहणारे प्रवाह आणि हवेच्या खालच्या थरांमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. या दोन्ही स्थितींच्या प्रभावामुळे देशभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य, मध्य, पूर्व, ईशान्य, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये रविवारपासून (ता. १३) वादळी वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com