परभणीत ‘ई-नाम’च्या निकषांवर काम सुरू

‘ई-नाम’मुळे शेतमालाच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, शेतकऱ्यांच्या खात्यात त्याच दिवशी रक्कम जमा होईल. त्यासाठी बाजार समितीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. - विलास मस्के, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, परभणी.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी (प्रतिनिधी)ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा ‘ई-नाम’ योजनेअंतर्गत समावेश झाला आहे. बाजार समितीकडून तूर्त ‘ई-नाम’च्या निकषांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे.

‘ई-नाम’च्या पहिल्या टप्प्यात परभणी आणि सेलू या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश झाला आहे. या बाजार समित्यांमध्ये कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आदी शेतमालाची आॅनलाइन लिलाव (ई-अॅक्शन) पद्धतीने खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना आॅनलाइन पेमेंटदेखील देण्यात येणार आहे. यामुळे शेतमाल खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.

सद्यःस्थितीत बाजार समितीअंतर्गत ८० अडत परवानाधारक व्यापारी आहेत. तर किरकोळ खरेदीदार (फडीवाले) आणि खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या १३० आहे. या पैकी ७६ अडत व्यापारी तसेच १२४ खरेदीदारांनी ‘ई-नाम’अंतर्गत नोंदणी केली आहे. सध्या अनेक व्यापाऱ्यांकडे अडत, खरेदीदार, किरकोळ खरेदी असे तीनही प्रकारचे संयुक्त परवाने आहेत.

‘ई-नाम’अंतर्गत किरकोळ खरेदी बंद केली जाणार आहे. अडत व्यापारी तसेच खरेदीदार यांचे स्वतंत्र परवाने असणार आहेत. शेतमालाच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्याच दिवशी आॅनलाइन पद्धतीने रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बॅंक पासबुकची सत्यप्रत, सातबारा उतारा, आधार कार्ड बाजार समितीकडे जमा करणे आवश्यक आहे.

दरम्यान ‘ई-नाम’ प्रणालीअंतर्गत आवश्यक संगणक कक्षाची उभारणी बाजार समितीच्या कार्यालयात करण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून आजवर ८८ हजार ९१४ क्विंटल शेतमालाची गेट एंट्री झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर बंधिस्त नाही.

आत-बाहेर जाण्यासाठी अनेक रस्ते आहेत. त्यामुळे शेतमालाची वाहतूक करणारी वाहने कोणत्याही रस्त्याने प्रवेश करतात. तसेच बाहेर जातात ‘ई-नाम’ प्रणालीसाठी बंधिस्त मार्केट यार्डाला इन (एंट्री) आणि आउट अशी दोन प्रवेशद्वारे आवश्यक आहेत. एंट्री गेटवर शेतमालाचे वजन करण्यासाठी वजनकाटा आवश्यक आहे. दोन प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत.

त्यासाठी सध्या असलेले अनेक रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर ६० मेट्रिक टन वजनकाटा, शेतमालाच्या ग्रेडिंगसाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. तसेच आॅनलाइन लिलावासाठी व्यापाऱ्यांना वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com