पूर्व विदर्भाला गारपिटीने झोडपले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : पश्‍चिम विदर्भानंतर सोमवारी (ता.१२) पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने झोडपून काढले. अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास गारपीट झाली. यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज प्राथमिक स्तरावर वर्तविला गेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्‍यातील नांदेसावंगी, वेणी, लोणी, नांदूरा, पिंपरी, वाटखेड, किन्ही, वडगाव, राऊत (सावंगी), गोंधळी, फतियाबाद, विरखेड, मुबारकपूर, मुरादाबाद या गावांना गारपीटीचा फटका बसला. मारेगाव तालुक्‍यातील कुंभातर राळेगाव तालुक्‍यातील किन्ही जवादे, महागाव तालुक्‍यातील काळी (टेंभी), चिंचोली, राजूरा, बिजोरा, चिल्ली इजारा, फुलसावंगी ही गावेही गारपीटीने बाधित झाली.

भंडारा जिल्ह्यातदेखील गारपीट व पावसाने नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळाला. पवनी तालुक्‍यातील मांगली येथे वीज कोसळून एक गाय ठार झाली. गडचिरोली जिल्ह्यात वादळी वारा व पावसामुळे कुरखेडा व कोरची तालुक्‍यात मिरची, तूर, उन्हाळी धान, मका या पिकांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे अनेक जनावर जखमी झाले असून शेकडो घरावरील टिनपत्रे उडाल्याने अनेक कुटुंबांना थंडीत कुडकुडतच रात्र काढावी लागली.

नागपूर जिल्हा झाला प्रभावित काटोल तालुक्‍यातील ईसापूर (बु.), खैरी, बोरी, झिलपा, गोंडीमोहगाव, जटामजरी, गंगालडोह, बोरडोह, भाजिपानी, माळेगाव, चनकापूर, येनवा, कळंभा, पठार वाढोणा, कारला, मेंडकी, लिंगा सावळी, रिधोरा, पंचधार या भागात गारपीट झाल्याने गहू, हरभरा व संत्रा पिकांचे नुकसान झाले. कोंढाळी परिसरातील खापरी बोरकर, चंदनपाडी, जुनापाणी, चिचोली, अहमदनगर, हेटी, खुसार, जामगड या गावातदेखील गारपिटीने थैमान घातले. जुनापाणी येथे दिलीप काळे यांच्या शेतातील गोठा पडल्याने दोन गाई जखमी झाल्या. नरखेड तालुक्‍यातील सावरगाव मंडळातील आगरा, टेंभरा, उमरी, मोहगाव भदाडे या भागात बोराएवढ्या आकाराची गार पाहण्यात आली.

...अन् होत्याचे नव्हते झाले झिलपा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील दादासाहेब काळे यांची ५० एकर शेती. ऑटोमायझेशनसह ९ हजार संत्रा झाडे, शेडनेटमधील मिरची लागवड त्यांनी केली आहे. मृग बहारातील संत्र्याला व्यापाऱ्यांनी दहा लाख रुपयांत मागितले होते. परंतु हवामान खात्याने गारपिटीचा अंदाज व्यक्‍त केल्याने व्यापाऱ्यांनी सावध होत तोडच केली नाही. दहा लाख रुपयात मृगातील संत्र्याचा सौदा ठरला होता. मृग बहारदेखील झडल्याने दुहेरी नुकसान सोसावे लागले आहे.    

वर्धा जिल्ह्यातील मजूर जखमी कारंजा घाडगे तालुक्‍यात सावळी येथे गणपत मुने, किशोर पेंधे, महादेव देवासे, विश्‍वास कडसे यांच्यासह तब्बल सहा जण गारांच्या माराने जखमी झाले. गारांपासून बचावाकरिता संधी न मिळाल्याने त्यांना गारांचा मार बसला. या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com