Agriculture news in Marathi, editorial | Agrowon

वाहतूक वाढवा, व्यापार वाढेल
विजय सुकळकर
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी स्वस्तातील पर्याय उपलब्ध झाल्यास विक्री साखळी मोडीत काढीत ते दूरच्या बाजारपेठेत आपली फळे स्वत: पाठवू शकतील. 

महाराष्ट्र हे द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा या फळपिकांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. राज्यात पेरू, सीताफळ, बोर, आवळा या फळपिकांचे उत्पादनही बऱ्यापैकी होते. मिश्र शेती अथवा एकात्मिक शेती म्हणून राज्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीचा स्वीकार केला आहे. त्यास फळबाग लागवड योजनेचा मोठा हातभार लागला. अधिक उत्पादनाबरोबर राज्यातील शेतकरी फळांचा दर्जाही उत्तम राखतो.

राज्यात उत्पादित फळांना देशांतर्गत तसेच विदेशी बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. परंतु, विक्री साखळीतील सोयीसुविधांअभावी बहुतांश फळे देशांतर्गत तसेच विदेशी बाजारातही पोचत नाहीत. मोठ्या मध्यस्थांच्या साखळीने काही फळे बाजारात पोचतात. तसेच फळांची सध्याची वाहतूक ही प्रामुख्याने रस्त्याने (ट्रक, टेम्पो) होते. मध्यस्थांची मोठी साखळी आणि महागडी वाहतूक यामुळे फळांचे दर उत्पादकांना मिळणाऱ्या दराच्या चार-पाच पटीने अधिक असतात.

एकीकडे हवामान बदलाच्या काळात फळपिकांवर येणाऱ्या रोग-किडींमुळे उत्पादन खर्च वाढतो आहे. मात्र, फळपिकांना मागणीच नाही, असे भासवून व्यापारी अत्यंत कमी दराने फळपिकांची खरेदी करीत असल्याने फळ उत्पादकांचे अर्थकारण कोसळत आहे. दुसरीकडे मध्यस्थांची मोठी साखळी आणि लॉजिस्टीक खर्च वाढल्याने ग्राहकांना फळे खरेदी करणे परवडेनासे झाले आहे.

द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी आदी फळपिकांचे अत्यंत मेहनतीने निर्यातक्षम उत्पादन शेतकरी घेतो. परंतु, फळांच्या निर्यातीतही दरवेळेस काही ना काही अडचणी येतात. अशावेळी रस्ते वाहतुकीला लोह, जल, हवाई वाहतूक असे पर्याय उपलब्ध करून देशभर विक्री साखळी उभी केली जाणार, अशी घोषणा केंद्रीय रस्ते विकास वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात केली. हे काम तत्काळ हाती घेऊन ठराविक कालमर्यादेत पूर्ण करायला हवे. 

मागील दोन-तीन वर्षांतील फळ उत्पादकांचे विक्री आणि दराबाबतचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. द्राक्ष, डाळिंबासारखी फळेपिके मोठ्या मेहनतीने आणि खूप खर्च करून शेतकरी पिकवितो. परंतु, बाजारात ही फळे मातीमोल भावाने विकावी लागत आहेत. गंभीर बाब म्हणजे आपला शेतमाल वाहतूक खर्च अमेरिका, युरोपियन देशांपेक्षाही अधिक असल्याचे दिसते.

शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी स्वस्तातील पर्याय उपलब्ध झाल्यास विक्री साखळी मोडीत काढीत ते दूरच्या बाजारपेठेत आपली फळे स्वत: पाठवू शकतील. असे झाल्यास त्यांना अधिक दर मिळण्याबरोबर ग्राहकांनाही परवडणाऱ्या दरात फळे उपलब्ध होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जल वाहतुकीची संकल्पना चांगली आहे. देशाला लाभलेला मोठा समुद्र किनारा नद्यांचे विस्तृत जाळे यातून देशांतर्गत वाहतूक सुलभ आणि स्वस्त होऊ शकते.

मेजर-मायनर पोर्ट एकमेकांना जोडून तेथे वाहतूक, साठवणुकीच्या अद्ययावत सोयीउपलब्ध करून द्याव्या लागतील. बारमाही वाहणाऱ्या नद्यांद्वारेही छोटी छोटी बंदरे निर्माण करून जलवाहतूक सुरू करायला हवी. देशात रेल्वेचे जाळेही चांगले पसरले आहे. फळांच्या क्‍लष्टरनिहाय रेल्वे वाहतुकीचा विस्तार करून फळांची वाहतूक वाढवावी लागेल. बाजारात विविध प्रकारची फळे उपलब्ध होऊ लागली म्हणजे ग्राहकांची मागणी वाढणार आहे. असे असले तरी फळांचे आहारातील महत्त्व विषद करून लोकांची फळे खाण्याची सवयही वाढवावी लागेल. याकरिता देशांतर्गत बाजारपेठांमध्येही फळांचे ब्रॅंडिंग करावे लागेल.

निर्यातीद्वारेही फळांना अधिक दर मिळून उत्पादकांचा फायदा होतो. कृषी, वाणिज्य मंत्रालय, अपेडा, निर्यात कंपन्या यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपली दर्जेदार फळे जगाच्या बाजारपेठेत कशी पोचतील, हेही पाहावे लागेल. असे झाल्यास देशातील फळ उत्पादकांना अच्छे दिन येतील, यात शंका नाही. 

इतर संपादकीय
होय, आम्हीच खरे लाभार्थी!राज्यभर झालेल्या मृद संधारणाच्या अनेक कामांवर...
शेतीमाल हमीभाव : एक सापळासरकारने शेतकऱ्यांपुढे लटकवलेले हमीभावाचे एक गाजरच...
कापूस संशोधनाची पुढील दिशाकेंद्र शासनातर्फे बीटी जनुकांचे बौद्धिक संपदा...
कापूस कोंडी फोडाकापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाल्यामुळे कापूस...
पांढरं सोनं का काळवंडलं?यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीवरील अनियंत्रित...
सुलभ व्यापार वाढवेल निर्यातदेशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन न देता आपली गरज...
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...
अन्नसुरक्षेच्या लढ्याची अर्जेंटिनात...जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ) अकरावी...
‘ओखी’चा विळखानैसर्गिक आपत्ती या वर्षी शेतकऱ्यांची पाठ सोडायला...
ऊसदराचा उफराटा न्यायकोल्हापूरची तडजोड  उसाला टनामागे पहिली उचल...
दिशा बदलत्या कृषी शिक्षणाचीबदलते हवामान, खुली अर्थव्यवस्था, आयात-...
सजीव माती तर समृद्ध शेतीपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...
केवढा हा आटापिटा!कडधान्ये, खाद्यतेल यांच्या आयात-निर्यातीबाबत...
नकाशा दाखवेल योग्य दिशाजागतिक तापमानवाढीमुळे बदललेल्या हवामानाच्या...
कसे असावे आयात-निर्यात धोरण?देशातील तेलबिया व कडधान्य पिकांचे बाजारभाव किमान...
अलिबाबाच्या गुहेत दडलंय काय?पी कवाढीसाठीच्या अत्यंत मूलभूत घटकांमध्ये माती...
आर्थिक तरतुदीबरोबर हवे तांत्रिक...अंड्याचे पोषणमूल्य पाहता, महाराष्ट्रात कुपोषित...
रासायनिक शेती आणि मानवी आरोग्यहा लेख लिहिण्यामागे मुख्य उद्देश असा आहे, की १९९०...
वृक्षवने, नानाप्रकारची धनेेवाढत्या लोकसंख्येचा भार मर्यादित नैसर्गिक...
एका ब्रॅंडमधून क्रांतीराज्यात कुठे सेंद्रिय शेतमाल थेट विक्री केंद्रे...