agriculture news in marathi, Editorial, AGROWON, maharashtra | Agrowon

तोडगा की मॅच फिक्सिंग?
रमेश जाधव
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

ऊसदराच्या मुद्यावर सरकारचा प्रस्ताव फारसा ताणून न धरता मान्य करण्यात आला. सरकारनेही शेट्टी, खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना, अशी शंका घ्यायला वाव आहे.   
 

कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये हा तोडगा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी मान्य केल्यामुळे ऊसदराचा तिढा सुटला आहे. त्यामुळे गळीत हंगाम सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. रघुनाथ पाटील, आंदोलन अंकुश, सकल ऊसकरी परिषद आदींनी हा दर अमान्य करून आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे; परंतु त्यांची एकंदर तोळामासा ताकद पाहता त्यांच्या विरोधाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. तसेच ही बैठक कोल्हापूर जिल्ह्यापुरती असली तरी हाच फॉर्म्युला राज्यभरात मान्य केला जाईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पूर्वी राजू शेट्टींची संघटना बारामती, कराड येथे उग्र आंदोलन करून, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मोठे नुकसान करून, उपोषणअस्त्र वापरून ऊसदराचे आंदोलन पेटवत असे; पण नंतर सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेल्यावर त्यांच्या आंदोलनाची धग कमी झाली. यंदा वाहनांच्या किरकोळ नुकसानीपलीकडे संघटना फारशी आक्रमक झाली नाही. तसेच फारसे ताणून न धरता सरकारचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. सरकारनेही शेट्टी, खोत यांचे महत्त्व कायम राहील, असे पाहिले. यावरून सगळी नेपथ्यरचना आधीच ठरली होती की काय, हे मॅच फिक्सिंग तर नव्हे ना, अशी शंका घ्यायला वाव आहे. 
शेट्टींनी प्रतिटन ३,४००, तर रघुनाथदादांनी ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी केली होती. त्यातुलनेत अत्यंत कमी दरावर तडजोड झाली. वास्तविक उत्तर प्रदेशने ३,२५० रुपये दर दिला आहे. उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्राचा साखर उतारा जवळपास एक टक्क्याने जास्त असतो. या वर्षी बहुतांशी उसाचे गाळप हिवाळ्यात होणार आहे. हंगामही तुलनेने मोठा राहणार आहे. तसेच केंद्र सरकारने इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केली आहे. या सगळ्या कारणांमुळे येत्या हंगामात साखर कारखान्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. शिवाय देशात यंदा साखर उत्पादन वाढणार असले तरी शिल्लक साठ्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे दर पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ३४०० रुपये दराची मागणी रास्तच होती. खा. राजू शेट्टींनी कदाचित पुढची राजकीय गणिते जुळवण्यासाठी नमते घेतले असावे. त्यांनी भाजपशी घेतलेला काडीमोड आणि नवीन मित्रांचा शोध यातून अनेक संकेत मिळतच होते. असो.  
एफआरपीत शंभरेक रुपये वाढ मिळवण्यासाठी भांडणाऱ्या शेतकरी संघटना कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटा मारून शेतकऱ्यांची जी कोट्यवधी रुपयांची लूट केली जाते, त्याबद्दल मात्र मूग गिळून बसतात. काटामारीमुळे शेतकऱ्यांचे कसे प्रचंड नुकसान होते, यावर ही मंडळी पोटतिडकीने बोलत असतात; परंतु या मुद्यावर कधी उग्र आंदोलन करत नाहीत किंवा उसाचे वजन करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा आग्रह धरत नाहीत. त्यांची ही गुळमुळीत भूमिका कारखान्यांच्या पथ्यावरच पडते आणि मापात पाप करण्याचा गोरखधंदा जोमाने सुरू राहतो. शेतकरी नेत्यांनी राजकीय सोय बघून एफआरपीच्या मुद्यावर पांढरे निशाण फडकवले असले तरी आता काटामारीच्या प्रश्नावर तरी कारखान्यांना कोंडीत पकडून आपले पाणी दाखवणार का, हा प्रश्न कळीचा ठरणार आहे. घामाचे दाम मागणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधिलकी अद्याप कितपत घट्ट आहे, याचा फैसला त्यातून होईल.        

इतर संपादकीय
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
सेवा कसली, ही तर चक्क लूटबॅंकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर...
‘परभणी शक्ती’ने मिळेल ज्वारीला बळआपला आहार हा रिजन अन् सिझन स्पेसिफीक असला पाहिजे...
संकट टाळण्यासाठी...मागच्या वर्षी वऱ्हाड प्रांत आणि खानदेशामध्ये...
निर्यातवृद्धीनेच मिळेल हमीभावाला बळखरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच...
कृषी तंत्रनिकेतनचा सावळा गोंधळखरे तर एकूणच कृषी शिक्षणाचे राज्याचे काय धोरण...
अपरिणामकारक उतारादुधाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि मिळणारा कमी दर,...
‘कृषी तंत्रनिकेतन’ संस्थाचालकांची...शै क्षणिक वर्ष २०००-०१ पासून कृषी पदविका हा...
‘कार्टेल’चा कचाटाकेंद्र शासनाने पीक उत्पादन खर्चाच्या ‘एटू एफएल’...
हमीभाव आणि भाववाढचालू खरीप हंगामासाठी १४ पिकांचे हमीभाव केंद्रे...
प्रत्येक शेतच व्हावे कृषी विद्यापीठआमच्या सदनिकेच्या गॅलरीमध्ये विराजमान असणारी...
उद्यमशीलतेअभावी अन्नप्रक्रियेला ‘ब्रेक...भारतीय खाद्यान्न प्रसंस्करण उद्योग कात टाकत...
झुंडशाही नाही चालणारआठवड्यापूर्वी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे...
दीडपट हमीभावाचा दावा फसवादेशभरातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र-राज्य शासनबाबत...
लबाडाघरचं आवतणकेंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत...
कापसाच्या भावातील तेजी टिकेल?अमेरिका आणि चीनच्या व्यापारयुद्धामुळे भारतातून...
कापूस उत्पादकता वाढीची दिशादेशात बीटी तंत्रज्ञानाच्या आगमनापूर्वी कापसाची...