agriculture news in marathi, Editorial, AGROWON, pune, maharashtra | Agrowon

खयाली पुलाव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सरकारच्या धोरणलकव्यामुळे कडधान्य उत्पादक शेतकरी तोट्याच्या गर्तेत सापडले आहेत. परंतु, राधामोहनसिंह यांना मात्र देश कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होणार असल्याची स्वप्नं पडत आहेत.
 

मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दुध किती
अठरा रांजण भरून गेले प्याले चौदा हत्ती
आम्ही लटिके ना बोलू वर्तमान खोटे !

या काव्यपंक्तीची आठवण करून देणारे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केले आहे. भारत दोन वर्षांत कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होईल आणि कडधान्य आयात करण्याची गरजच उरणार नाही, असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे. साठच्या दशकात देशाला भीषण अन्नधान्य तुटवड्याला तोंड द्यावे लागले. त्या वेळी देशात हरितक्रांती घडवून आणण्याची मुहूर्तमेढ तत्कालीन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी रोवली. देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. आता देश कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला तर तो त्याच तोडीचा भीमपराक्रम ठरेल. कडधान्य क्रांतीचे शिल्पकार म्हणून राधामोहनांची इतिहासात नोंद होईल. पण दुर्दैवाने हे दिवास्वप्न वस्तुस्थितीशी फारकत घेणारे आहे.

कडधान्य उत्पादन आणि मागणी यातील तुटवडा भरून काढण्यासाठी देशाला दरवर्षी सुमारे २० टक्के आयात करावी लागते. हरितक्रांतीनंतरच्या ४० वर्षांत देशाची लोकसंख्या १३० टक्क्यांनी वाढली; परंतु कडधान्य उत्पादनात मात्र केवळ १८.१३ टक्के वाढ झाली. कडधान्य उत्पादकतेत जगातील पहिल्या पाच देशांमध्येही आपल्याला स्थान नाही. कडधान्यांचा शेतकरी हा प्रामुख्याने कोरडवाहू आणि अल्पभूधारक आहे. त्याच्याकडे साधनसामग्रीची कमतरता असते. बहुतांश शेतकरी घरच्यापुरती कडधान्ये करतात. पिकांची उत्पादकता, वरकड उत्पादन जास्त असेल आणि माल साठवणुकीची क्षमता असेल तरच शेतकरी तेजीचा फायदा घेऊ शकतात. त्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणूनच कडधान्ये घेतली जातात. वास्तविक संरक्षित पाण्याची पाळी आणि रोग-कीड नियंत्रणासाठी औषधे यावर खर्च केला तर कडधान्य उत्पादनात भरीव वाढ होऊ शकते. कडधान्यांचे चारशेहून अधिक सुधारित वाण उपलब्ध आहेत. पण तरीही देशात कडधान्यांचे उत्पादन वाढत नाही. कारण रास्त बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना या पिकांवर केलेला खर्च आणि गुंतवणुकीचा परतावा मिळेल याची शाश्‍वती नसते. वास्तविक कडधान्य आयातीवर जेवढा पैसा खर्च होतो त्यातला थोडासा हिस्सा देशातल्या शेतकऱ्यांना दिला तर ते उत्पादन निश्‍चितच वाढवतील.

शेतकऱ्यांनी कडधान्यांचा नगदी पीक म्हणून विचार केला तर सरकार त्यांची कशी ससेहोलपट करते, याचा गेल्या वर्षी तुरीच्या उदाहरणावरून चांगलाच अनुभव आला. देशात गेल्या वर्षी कडधान्यांचे विक्रमी उत्पादन होऊनसुद्धा आयातीत तब्बल १९.९ टक्के इतकी उच्चांकी वाढ झाली. सरकारने मार्च महिन्याच्या अखेरीस तूर आयातीवर निर्बंध घातले. परंतु, तोपर्यंत ४४.७ लाख टन इतकी प्रचंड तूर आयात झालेली होती. देशात तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली गेले आणि माल ठेवायला बारदाणेसुद्धा शिल्लक राहिले नाहीत; तरीही सरकारने दीर्घकाळ निर्यातीवरची बंदी हटवली नाही. तसेच स्टॉक लिमिट उठवायलाही उशीर लावला. सरकारच्या या सगळ्या धोरणलकव्यामुळे कडधान्य उत्पादक शेतकरी तोट्याच्या गर्तेत सापडले. त्यामुळे शेतकरी आता कडधान्यांचा पेरा कमी करतील. येत्या दोन वर्षांत त्याचे परिणाम जाणवून परत कडधान्य तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, राधामोहन मात्र खयाली पुलाव शिजवण्यात मश्गुल आहेत. वास्तविक सरकारने योग्य धोरणे आखली आणि सलग तीन-पाच वर्षे शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल याची तजवीज केली तर देश कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करू शकतो. परंतु, सरकारचा दृष्टिकोन गरज सरो, वैद्य मरो धाटणीचा अाहे. अशा स्थितीत स्वयंपूर्णतेची भाषा करणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने बघण्यासारखे आहे.

इतर संपादकीय
शाश्वत सिंचनासाठी हवेत ‘अटल’ प्रयत्नअटल सौर कृषिपंप ही योजना दोन वर्षांपूर्वी सुरू...
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
राबवा ‘आत्महत्या रोखा अभियान’ कर्जे थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या बँकांनी त्रास...
‘पोल्ट्री’तील संधी ओळखासध्या शेतमालाच्या दराचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे....
वेळ लई बाका-पुढ्यातला!‘मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये...
विषाचे परीक्षण आवश्यकचयवतमाळ जिल्ह्यात कीडनाशकांच्या विषबाधेने २२...
कोंडलेला श्वास-निष्पापांचा!‘प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता...
दिल्लीचा धडादरवर्षीच थंडीला सुरवात झाली की दिल्लीतील...
देर आए, दुरुस्त आएखुली आयात आणि निर्यात निर्बंध अशा धोरणांमुळे...
शेतकऱ्यांचा असाही एक पंथ असावाशांतता आणि आनंदाच्या शोधात भटकणे, या भटकंतीमध्येच...
सावध ऐका पुढल्या हाकाशेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पादनाचं मृगजळ : भाग...
प्रश्न जादा साखरेचादेशात पुढच्या वर्षी साखर उत्पादनात वाढ अपेक्षित...
विलीनीकरण नको, पुनर्रचना कराएकोणीसाव्या शतकाच्या अखेरच्या अघोऱ्या ...
प्रकल्प पूर्णत्वाचा मार्ग खडतरविदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व पश्चिम...
संकल्प ठीक; सिद्धीची वाट बिकटशेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पादनाचं मृगजळ : भाग...
सर्वच आघाड्यांवर उतरता आलेखशेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करायचे...
शेतकरीविरोधी धोरणांमुळे उत्पन्नात घटशेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पादनाचं मृगजळ : भाग...
तिढा ऊसदराचायंदाच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत प्रतिटन २५०...