Agriculture news in Marathi, editorial story, sharad joshi, Sheshrao Mohite | Agrowon

धीरोदात्त महानायक
शेषराव मोहिते
रविवार, 3 सप्टेंबर 2017

इथल्या राज्य व्यवस्थेनं शेती आणि शेतकरी याबाबत आखलेली आणि निर्दयपणे राबविलेली विनाशकारी धोरणं, योजना आयोगानं (निती आयोग) केलेली कृष्णकृत्ये, त्यांचे शेतकऱ्याप्रतीचे अपराध उघडे पाडणं अन्‌ शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण हे जरी खरे असले तरी शरद जोशींचे योगदान एवढंच आहे का? नाही... उद्या साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख. 
 

नुकतेच १९७०चे अस्वस्थ दशक सरत आलेले. हरित क्रांतीचे ढोल, नगारे सर्वत्र दुमदुमत असलेले. अन्‌ एकदम चाकणच्या बाजारात ठिणगी पडली. कुणी आठ- दहा वर्षे परदेशात उच्चपदी राहून परत मायदेशी आलेला जीन पॅंट, शर्ट घालणारा शरद जोशी नावाचा माणूस कांद्याच्या भावासाठी आंदोलन करतो. उपोषण करतो. हजारोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरतात. रस्ते अडवतात. हे आजवर कधी न घडलेलं आक्रित होतं. ग्रामीण भागातील लोकांसाठी लढविल्या गेलेल्या सर्व लढाया निस्तेज, दुर्बल झालेल्या. कुठल्या तरी बंदिस्त विचार सरणीत अडकून पडलेल्या.

देशाला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनविण्याची मर्दुमकी गाजवलेल्या शेतकऱ्यांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्याव लागत आहे याची गंधवार्ताही कुठल्या चळवळीला नव्हती. शेती करणारी माणसं भरपूर उत्पादन करूनही उत्पन्न वाढत नाही, उलट शेतीतील उत्पादनखर्च वाढतोय म्हणून उदास, दुःखी, हतलब आणि गोंधळलेल्या मनःस्थितीत. सरकार कुठल्याही पक्षाचं आलं तरी शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चाललेली. ही अवस्था अनेक वर्षांपासून सहन केल्यामुळे भवितव्याविषयी साशंकता निर्माण झालेली. अशा या पार्श्‍वभूमीवर शरद जोशींचा उदय झाला. त्यापुढील तीस- पस्तीत वर्षांचा इतिहास आपणा सर्वास ज्ञात आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून तीस- पस्तीस वर्षे झाली होती. तरीही इथे दोन मूल्यव्यवस्था नांदत होत्या. आजही नांदत आहेत, पण यातील विरोधाभासांचे आश्‍चर्य कुणाला वाटत नव्हतं. हा विरोधाभास शरद जोशींना तीव्रपणे जाणवला तो त्यांनी स्वित्झर्लंडसारख्या संपन्न देशात आठ वर्षे घालविली म्हणून परदेशातलं वैभव अन्‌ त्यांचं दर्शन, उपभोग घेऊन परत मायदेशी आलेले तोवर एकटे शरद जोशीच नव्हते. पण इतरांनी जे करण्याचं धाडस केलं नाही ते यांनी केलं. इथल्या राज्य व्यवस्थेनं शेती आणि शेतकरी याबाबत आखलेली आणि निर्दयपणे राबविलेली विनाशकारी धोरणं, योजना आयोगानं (आत्ता निती आयोग) केलेली कृष्णकृत्ये. त्यांचे शेतकऱ्याप्रतीचे अपराध उघडे पाडणं अन्‌ शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण हे जरी खरे असले तरी शरद जोशींच योगदान एवढंच आहे का? डॉ. पंजाबराव देशमुख, चौधरी चरणसिंह, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदे ते शरद पवार, विश्‍वनाथ प्रतापसिंग राजकारणात हयात घालवलेल्या या नेत्यांची शेतकऱ्याप्रतिची अन्‌ शेती प्रश्‍नासंबंधीची जाण, संवेदनशीलता काही कमी नव्हती. पण आपल्या येथील राज्यव्यवस्था, (सरकार) तिचे स्वरूपच असे आहे की, ती शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही.

शरद जोशींनी शेतीमालाच्या भावाचा प्रश्‍न ऐरणीवर आणला. तो केवळ शेती करणाऱ्या समूहाविषयीच्या सहानुभूती किंवा कळवळ्यापोटी नव्हे, तर इथल्या वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या गरिबीचे, आर्थिक विषमतेचे निर्मूलन करायचे असेल, तर इथला बहुसंख्य जनसमूह ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, त्याचे अर्थकारण सुधारण्यासाठी, त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी शेतीमालाचा रास्तभाव हा एकमेव पर्याय होता. म्हणून त्यांनी त्यावरच लक्ष्य केंद्रित केले.

शेती करणाऱ्या लोकांचे निवडीचे स्वातंत्र्यच इथे हिरावून घेतले गेलेले. ते स्वातंत्र्य त्यांना मिळावे यासाठीचा तो सर्व आटापिटा होता. १९९०- ९१ सालापासून आर्थिक उदारीकरण, खुलीकरण आपण स्वीकारले. त्यास अनेक विचारवंत, राजकारणी जेव्हा विरोध करीत होते. तेव्हा शरद जोशी शेतकरी संघटनेने त्या प्रक्रियेचे स्वागत केले. हेतू एवढाच होता, आता तरी शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळेल. पण खुलीकरण येऊन आर्थिक उदारीकरण येऊनही शेतकऱ्यांना ते स्वातंत्र्य काही मिळाले नाही.

शेतमालास रास्त भाव मिळाला नाही, तर भविष्यात काय धोकादायक परिस्थिती उद्‌भवू शकते. याचा इशारा शेतकरी आंदोलन सुरू झाले तेव्हाच १९८०-८१ मध्येच शरद जोशींनी दिला होता. शेती परवडेनाशी झाली तर उद्या शेतकऱ्यांच्या मुलांना पुण्या-मुंबईच्या फुटपाथवर बसून भीक मागायची वेळ येईल. हे उद्‌गार त्यांचे १९८० चे आहेत. तेव्हा ते कुणी गांभीर्याने घेतलं नाही. उलट शरद जोशी वेळोवेळी राजकीय भूमिका काय घेतात याकडे लक्ष वळवून शेतकरी समाजाशी लबाडी करण्यात सर्वच राजकीय पक्ष आणि तथाकथित विचारवंतांनी धन्यता मानली. त्याची फार मोठी किंमत लाखांच्या संख्येने आत्महत्या करून शेतकऱ्यांना मोजावी लागली. रस्त्यावर उतरून आंदोलनाचे सर्वच मार्ग कुंठीत झाल्यावर अन्‌ आपल्या प्रति समाजातील कोणत्याच घटकाच्या मनात संवेदनशीलता जागी होत नाही हे लक्षात आल्यावर शेवटचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरलेला आहे. एक प्रकारचे स्वतःला संपवून व्यवस्थेचा निषेध करण्याचा हा टोकाचा क्‍लेशदायक मार्ग आहे. 

सुरवातीच्या काळात अत्यंत हिरिरीने त्यांच्या सोबत या चळवळीत उतरलेले अनेक सहकारी एकतर घरी बसले किंवा त्यांची साथ सोडून एखादा राजकीय पक्ष त्यांनी जवळ केला. ज्या स्वतंत्रता वादाची, बहुसंख्यांना सहजासहजी पचनी पडणार नाही अशा विचारांची कास धरून शरद जोशी वाटचाल करती होते. त्या मार्गाने गेल्यावर राजकीय सत्ता नजिकच्या भविष्यकाळात तरी दृष्टिक्षेपात येत नव्हती. तेव्हा हाती कसलीही सत्ता नसताना, आर्थिक बळ नसताना, क्षमता असणारी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारी माणसं ती कितीही मोलाची असली तरी त्यांना दीर्घकाळपर्यंत सोबत ठेवण खूप कठीण असतं.

लोक सोडून जातात तेव्हा दोष त्या केंद्रस्थानी असणाऱ्या नेतृत्वाला दिला जातो. पण नेतृत्वाच्या वाट्याला नियतीन बहाल केलेली ही हतबलता, तिकडं सहसा कुणी पहात नाही. शरद जोशींनी वेगवेगळ्या पिकांच्या भावांसाठी केलेली आंदोलनं, आंबेठाणची शिबिरं, स्वतंत्रता वादाची केलेली पाठराखण, चांदवडच्या महिला अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकरी स्त्री प्रश्‍नाबद्दलची केलेली मांडणी, त्यातून निर्माण झालेला तो एक विचार केवळ महाराष्ट्राच नव्हे, तर पंजाब हरियाना, गुजरात, कर्नाटक या राज्यात निर्माण झालेला झळाळता प्रवाह, त्या लाखालाखाच्या सभा- मेळाव्यातून निर्माण झालेला प्रवाह काही निवडक भाषणं, लेख, त्यातून निर्माण झालेली पुस्तकं यातून कोणत्या उद्देशाने त्यांनी ही चळवळ उभी केली? याचा तर शोध येणाऱ्या पिढ्या घेतीलच. पण त्यांच्या जाण्याने, त्यांच्या विचारांचा, कार्याचा प्रभाव अधिक गडद होणार आहे. नाही तरी आपल्या इथं माणूस हयात आहे तोवर त्याचं मोठेपण थोडच कळतं? ते योद्धा शेतकरी होते की पराभूत तरी धीरोदात्त नायक होते की व्यक्तिस्वातंत्र्याचे कट्टर पाठीराखे होते? केवळ शेतकऱ्यांसाठीच त्यांचा लढा होता की एकूण समाज जीवनाचा कुंठीत, गोठलेला, काळवंडलेला प्रवाह त्यांना खळाळत प्रवाहीत करायचा होता? एखादा माणूस सत्य मांडत असेल, अन्‌ त्या सत्याचा प्रतिवाद करता येत नसेल तर त्या माणसाचे विरोधक सहजासहजी हार मानन्याऐवजी बाह्यतः त्यांची भलामण करणारी उमदी भाषणं करतात, पण त्यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात येणार नाहीत याची काळजी घेतात. तथाकथित विचारवंत यांच्यावर दुराग्रही लेख लिहितात. त्यांच्या एकूणच वाटचालीचे अन्याय अथवा असत्यावर आधारित विपर्यस्त लेखन करून त्या व्यक्तीचा त्या चळवळीचा मनोभंग करतात. अशा दडवलेल्या विपर्यस्त बाबी लवकर उघड्या पडत नसतात. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. शरद जोशी इथून पुढे अधिकाधिक कळत जाण्याची अन्‌ त्यांचे मोठेपण, वेगळेपण अधोरेखित होण्याची आता कुठे सुरवात झाली आहे असं आपण म्हणूया !

-  शेषराव मोहिते, ९४२१३६२९२९
(लेखक शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच साहित्यिक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
होय, आम्हीच खरे लाभार्थी!राज्यभर झालेल्या मृद संधारणाच्या अनेक कामांवर...
शेतीमाल हमीभाव : एक सापळासरकारने शेतकऱ्यांपुढे लटकवलेले हमीभावाचे एक गाजरच...
थंडी पुन्हा परतण्याची चिन्हेपुणे : गेल्या दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेली...
कापूस उत्पादकांना एकरी २५ हजारांची मदत...नागपूर : बोंडअळीमुळे कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे...
कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकटकोल्हापूर ः गेल्या तीन महिन्यांपासून साखरेच्या...
मावळातील शेतकऱ्यांची इंद्रायणी भाताला...कामशेत, जि. पुणे ः मावळ तालुक्‍याची ओळख असलेला...
"स्वामिनाथन'बाबत पुन्हा सर्वोच्च...पुणे : शेतीमालाचा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के...
अन्नसुरक्षा मुद्दाच भारतासाठी महत्वाचा ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : येथे होत असलेल्या...
कर्जमाफी, यवतमाळ विषबाधा,...नागपूर : ऑनलाइन कर्जमाफीतील घोळ, पाच...
अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे...एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची...
सोयाबीनच्या दर्जेदार बीजोत्पादनासाठी...महाराष्ट्राचे प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनचा...
कोणताही पक्ष, सरकार, शेतकऱ्यांना न्याय...शेतकरी प्रश्‍नांबाबत रघुनाथदादांची खंत आजपासून...
ट्रेलर्स ट्रॅक्‍टरला स्वयंचलित ब्रेक...सातारा : ॲग्रिकल्चरल ट्रेलर्स ट्रॅक्‍टर्सला...
कापूस उत्पादकांकडून बोनसची मागणीनागपूर : कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप...
‘माफसू’ची कुलगरू निवड प्रक्रिया २४...नागपूर ः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाचा...पुणे  ः बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा...
कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची...पुणे : कीटकनाशकांची विक्री वाढत असताना राज्यातील...
भडगावला अडतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची...जळगाव ः बाजार समितीत अडत वसुली बंदचा निर्णय होऊन...
सीताफळाला फळमाशीचा डंखसोलापूर ः कोरडवाहू शेतकऱ्यांचा आधार ठरू पाहणाऱ्या...
शेतीमध्येही गिरविले आधुनिकतेचे धडेघाटकोपर (मुंबई) येथील तानाजी मोहिते यांनी...