शेततळे, धडक सिंचन विहिरी योजनेचे प्रभावी काम

माहिती देताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय.
माहिती देताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय.

अकोला : शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यात आली आहेत. शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, धडक सिंचन विहिरी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कृषिपंप वीजजोडणी या अंतर्गत जिल्ह्यात प्रभावी काम झाले आहे, असा दावा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी पत्रकार परिषदेत केला.

जिल्हाधिकारी म्हणाले की, सर्व महसुली दाखले हे ऑनलाइन पद्धतीने निर्गमित करण्यात येत आहेत. जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मागील वर्षी ७०३ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता सर्वाधिक शेततळे करणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रशासनाने पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे.

तसेच शेततळ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला जाणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ मध्ये जिल्हा समितीने निवड केलेली २०० गावे पूर्णपणे जलयुक्त झालेली आहेत. याकरीता १३१ कोटी ८ लाखांची तरतूद करण्यात आली होती. सदर कामे पूर्ण झाल्यामुळे २८ हजार ३२९ टीसीएम पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. यामुळे ३२,५२५ हेक्टर जमीन एकपाळी सिंचनाखाली आली आहे. तसेच १७,४४३ हेक्टर जमीन दोनपाळी सिंचनाखाली आली आहे.

जलयुक्त शिवार २०१६-१७ अंतर्गत जिल्ह्यातील १२५ गावांची निवड करण्यात आली असून २७५८ इतकी कामे आराखड्यानुसार मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी १६७६ कामे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत. १३५२ कामे पूर्ण झाली असून ३२४ प्रगतिपथावर आहेत. या सर्व कामांसाठी ८६ कोटी ७ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर कामे पूर्ण झाल्यामुळे १२,७१३ टीसीएम पाणी साठवण  क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे १८७४३ हेक्टर जमीन एकपाळी सिंचनाखाली आली आहे. तसेच ९३७२ हेक्टर जमीन दोनपाळी सिंचनाखाली आली आहे. धडक सिंचन विहिरीअंतर्गत एकूण मंजूर ५४३४ विहिरींपैकी ४६१२ विहिरी पूर्ण झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. २०१५-१६ मध्ये कृषिपंप उर्जीकरणासाठी ६६.२१ कोटी निधी प्राप्त झाला होता. त्यानुसार एकूण ५००५ कृषिपंपाचे उर्जीकरण करण्यात आले आहे.

मार्च २०१७ अखेर प्रलंबित असलेल्या व आर्थिक तरतूद  नसलेल्या ४१०० कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यासाठी ५५ कोटी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात येईल. अकोला जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या केळी उत्पादनाकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com