संतुलित पुरवठ्यामुळे अंडी, ब्रॉयलर्स तेजीत

पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

कच्च्या मालाचे नियंत्रित दर, बाजारातील वाढती मागणी व त्या तुलनेत संतुलित पुरवठा, यामुळे ब्रॉयलर्स आणि अंड्यांचे बाजार तेजीत आहेत. मागणी-पुरवठ्यातील संतुलनामुळे येत्या दिवसांतही बाजार किफायती राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. शनिवारी बेंचमार्क नाशिक विभागातून ८१ रु. प्रतिकिलो या दराने ब्रॉयलर्स पक्ष्यांची विक्री झाली. ब्रॉयलर पोल्ट्रीसाठी गेल्या काही वर्षांत प्रथमच ३१ डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा नफ्याचा ठरला आहे.  ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगासाठी २०१७ कॅलेंडर वर्ष सर्वाधिक नफा देणारे ठरले आहे. या वर्षातील सरासरी विक्री दर ७२ ते ७५ दरम्यान राहिला असून, उत्पादन खर्चाची सरासरी माॅडेलनिहाय ५८ ते ६५ या दरम्यान येईल. गेल्या वर्षी कच्च्या मालाचे दर पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर होते. त्यामुळे मार्जिनमध्ये उच्चांकी वाढ पाहावयास मिळाली. एका दिवसाच्या पिलांचे दर आणि हॅचिंग एग्जचे दरही आजवरच्या सर्वोच्च पातळीवर वर्षभर स्थिर राहिले आहेत. अंड्यांच्या दराने या वर्षी प्रतिशेकडा ५६० रु. चा सर्वाधिक दर गाठला. मात्र महिनाभरातच त्यात मोठी घट होऊन ३५० ते ४०० रु. च्या दरम्यान बाजारभाव स्थिरावले आहेत. ‘‘दरवर्षी ३१ डिसेंबरसाठी केलेली प्लेसमेंट अतिरिक्त ठरत होती आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर मागचा माल कॅरी फॉरवर्ड होत असे. या वर्षी मात्र तसे घडले नाही. ३१ डिसेंबरसाठी हवा तेवढा माल निघून गेला असून, चालू आठवड्यात गरजेइतकाच माल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे नव्या वर्षाची सुरवातही चांगली झाली आहे. संतुलित पुरवठ्यामुळे जानेवारी महिन्याचा सरासरी विक्री दर उत्पादन खर्चाच्या वर असेल,’’ असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे म्हणाले, की ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना फारसा किफायती दर नव्हता. परिणामी नोव्हेंबर-डिसेंबरसाठी प्लेसमेंट कमी झाली होती. मार्गशीर्ष महिन्यामुळे असणारी मंदीची धास्ती, दरवर्षी ३१ डिसेंबरला बाजार मंदीत असणे अशा काही कारणांमुळे इंटिग्रेटर्सनी सावध पवित्रा घेऊन उत्पादन कमी केले होते. याचा उलट परिणाम होऊन बाजारात पुरवठा संतुलित राहिला आणि भाव वाढत गेले. २०१७ कॅलेंडर वर्षामध्ये पुणे विभागाचा अंड्यांसाठीचा सरासरी फार्म लिफ्टिंग दर ३६० प्रतिशेकडा होता. मात्र, २०१६ च्या तुलनेत हा दर प्रतिशेकडा ९ पैशांनी कमी आहे. २०१५ च्या तुलनेत मागील दोन वर्षांतील दर १५ टक्क्यांनी जास्त राहिला आहे. २०१७ मध्ये कच्च्या मालाचे दर कमी होते. त्यामुळे लेअर फार्मिंग उद्योगाच्या (अंडी) नफ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांतील बाजारभाव किफायती राहिल्यामुळे येत्या काळात अंडी उत्पादन वाढण्याची शक्यता दिसत आहे.  

प्रकार  भाव      परिमाण   बाजारपेठ
ब्रॉयलर  ८१     प्रतिकिलो   नाशिक
अंडी    ४१५    प्रतिशेकडा   पुणे
चिक्स    ४५    प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज     ३५   प्रतिनग   मुंबई
मका  १२८०  प्रतिक्विंटल   सांगली
सोयामिल     २४३८८   प्रतिटन      इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com