पोल्ट्री
पोल्ट्री

अंड्यांचे भाव नव्या उच्चांकावर, ब्रॉयलर्स मात्र मंदीत

अंड्यांचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर पोचले आहेत. हिवाळ्यात वाढणारी हंगामी मागणी आणि भाजीपाल्यातील महागाई यामुळे अंड्यांना जोरदार उठाव आहे. दुसरीकडे, मागणी-पुरवठ्यातील संतुलनाअभावी ब्रॉयलर्स भाव थंडीतील ऐन खपाच्या हंगामात उत्पादन खर्चाच्या खाली गेला आहे. नाशिक विभागात आठवड्याच्या शेवटी, शनिवारी (ता. ११) रोजी ५८ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर्सचे लिफ्टिंग झाले, तर पुणे विभागात ४८८ रु. प्रतिशेकडा असा उच्चांकी फार्म लिफ्टिंग दर अंड्यास मिळाला. पुण्यातील योजना पोल्ट्रीचे संचालक राजू भोसले यांनी सांगितले, ‘‘हिवाळ्याच्या हंगामात देशांतर्गत मागणी २५ टक्क्यांनी वाढते. त्या जोडीला ज्या ज्या वेळेस भाजीपाला महाग असतो, त्या वेळेस अंड्यांची घरगुती मागणी वाढते. ४० ते ६० रु. किलोने भाज्या घेण्याऐवजी ग्राहक अंड्यांना अधिक पसंती देतो. येत्या डिसेंबरपर्यंत बाजारभाव असाच तेजीत राहील. १९ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष सुरू होतोय. या महिन्यात मांसाहार कमी होतो; पण अंडी याला अपवाद आहेत. त्यामुळे तेजीमध्ये अडथळा दिसत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत अंड्यांचा दर गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिनगामागे ३५ पैशांनी कमी होता. मात्र, यंदाचा खाद्यावरील खर्च कमी झाल्याने मार्जिन सुधारण्यास मदत मिळाली. पुढे थंडी सुरू होताच बाजाराने वर्षातील आणि त्यानंतर सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.’’ ‘‘सध्या प्रतिनग अंड्याचा उत्पादन खर्च ३.१० पैसे आहे. त्यातुलनेत सध्याचा बाजारभाव जवळपास पावणेदोन रुपयांनी जास्त आहे. उत्पादन खर्च कमी होणे आणि त्याच वेळी उच्चांकी तेजीचा बाजारभाव मिळणे असे पहिल्यांदाच घडत आहे. शिवाय, अंड्यावरील मार्जिनही आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोचले आहे. एकूण, लेअर (अंडी) उद्योगासाठी ही आश्वासक बाब आहे,’’ असेही भोसले म्हणाले. लेअर उद्योग नफ्याचे नवे उच्चांक गाठत असताना ब्रॉयलर उद्योगात मात्र मंदीचे चित्र आहे. थंडीच्या व पर्यायाने वर्षातील सर्वाधिक खपाच्या दिवसांतच बाजारभाव वर्षातील नीचांकी पातळीकडे चालला आहे. गेल्या जुलै महिन्यात ११० चा उच्चांक गाठल्यानंतर बाजार टप्प्याटप्प्याने खालावत गेला आणि आज तो जवळपास निम्म्यावर येऊन पोचला आहे.  १ ऑगस्ट २०१५ ते २० डिसेंबर २०१५ या काळात चालू दशकातील सर्वांत मोठी मंदी ब्रॉयलर उद्योगाने पाहिली आहे. या साडेचार महिन्यांत ब्रॉयलर पक्ष्यांचा सरासरी विक्री दर उत्पादन खर्चाच्या सुमारे १२ टक्क्यांहून अधिक फरकाने कमी राहिला होता. पुढे २१ डिसेंबर २०१५ ते ऑक्टोबर २०१७ या जवळपास वीस महिन्यांच्या कालावधीत संस्थात्मक इंटिग्रेटेड क्षेत्रासाठी ब्रॉयलरचा सरासरी विक्री दर उत्पादन खर्चापेक्षा सुमारे १२ ते १५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. याचा अर्थ संस्थात्मक क्षेत्रासाठी बाजार दीर्घकाळपर्यंत किफायती राहिला आहे. यापूर्वी, मोठ्या तेजीनंतर मध्यम ते लांब पल्ल्याच्या मंदीचा अनुभव असल्यामुळे यापुढेही तशी शक्यता नाकारता येत नाही. तशी कारणेही आहेत. पक्ष्यांची वेगाने येणारी वजने, खाद्याची वाढती गुणवत्ता आणि त्यायोगे मिळणारे सर्वोत्तम परफॉर्मन्स, चिक्सच्या वाढत्या किमतीमुळे पक्ष्यांची वजने वाढवण्याचा कल, दीर्घकाळच्या तेजीमुळे संस्थामक क्षेत्राची आर्थिक सक्षमता, येत्या काळात ब्रीडर्स अंड्यांच्या पुरवठ्यात होणारी संभावित वाढ या व इतर बाबींमुळे होत असलेली उत्पादनवाढ मागणीच्या तुलनेत संतुलित ठेवण्याचे आव्हान ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगापुढे आहे.  

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ५८ प्रतिकिलो नाशिक
अंडी ४८८ प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४० प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज  ३३ प्रतिनग मुंबई
मका १२९० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २१२०० प्रतिटन इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com