सोलापूर बाजारसमिती निवडणूकीसाठी शेतकऱ्यांकडून चुरशीने मतदान

सोलापूर बाजारसमिती निवडणूक
सोलापूर बाजारसमिती निवडणूक

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.१) काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. या बाजारसमितीसाठी ४९.९३ टक्के पहिल्यांदाच थेट मतदान झाले. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील ही बाजार समिती असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच. पण, बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणारी ही निवडणूक असल्यानेही ती वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

बाजार समितीच्या १८ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील १ लाख १८ हजार ८८८ शेतकरी या निवडणुकीसाठी मतदार आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली. पण, सकाळी संथगतीने मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासांत अवघे १० टक्के मतदान झाले होते. पण, दहा वाजेनंतर काहीसा वेग आला. दोन्ही तालुक्‍यांतील १५ गणांत आणि व्यापारी मतदारसंघात दोन व हमाल मतदारसंघात एका जागेसाठी सगळीकडे चुरस दिसून आली.

सहकारमंत्री देशमुख यांनी सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन भंडारकवठेत मतदान केले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बसवनगर तांड्यावर, महापौर शोभा बनशेट्टी यांनी बाणेगावात आणि काँग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने यांनी तिऱ्हे येथे मतदान केले.

मतदार यादीत नाव नाही, दुबार मतदार, अपाक मतदार यांसारख्या मुद्यावरून काही ठिकाणी शाब्दिक चकमकी घडल्या. कोंडी केंद्रावर मतदार यादीत नाव नसलेला व्यक्ती उभा होता, पण पोलिंग एजंट म्हणून कार्यरत होता. माझ्या भावाऐवजी मी उभारल्याचे त्या एजंटने सांगितले. पण, मतदान केंद्राध्यक्षानेही फक्त बघ्याची भूमिका घेतली. परंतु, शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हरकत घेतल्यावर त्याला पोलिसांच्या मदतीने बाहेर पाठविण्यात आले.

एका पोलिंग बूथवरील पोलिंग एजंट दुसऱ्या बूथमध्ये कार्यरत होता. त्यावरूनही गोंधळ झाला. पण हे काही किरकोळ प्रकार वगळता, मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत ४० टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाले होते.       

बाजार समितीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्षांतील नेत्यांचे एक पॅनल आहे आणि याच पॅनलमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुखही आहेत. शिवाय काही अपक्षांचे बचाव पॅनल अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे मंत्री देशमुख यांच्या विरुद्ध सगळे विरोधक, अशी लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः देशमुखही आठवडाभरापासून प्रचारासाठी तळ ठोकून होते. साहजिकच, ही निवडणूक सहकारमंत्री देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.  

बाजार समितीच्या या निवडणुकीची मतमोजणी उद्या (मंगळवारी, ता.३) सकाळी आठ वाजल्यापासून सोरेगाव एसआरपी कॅंपमध्ये सुरू होणार आहे. मतपत्रिकेवर शिक्‍क्‍याद्वारे मतदान झाल्याने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी चालेल, असा अंदाज आहे.

बार्शी बाजार समितीसाठी शांततेत मतदान बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी १५ गण, व्यापारी दोन गण, तर हमाल एक गण अशा एकूण १८ गणांसाठी रविवारी (ता. १) ५७.९७ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. सकाळच्या सत्रात सुरवातीच्या दोन तासांत १३, तर दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com