कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसाना आणि त्यामुळे कर्ज परतफेडीची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून २०१७ या वर्षांत परभणी जिल्ह्यातील १२५ आणि नांदेड जिल्ह्यातील १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

परभणी जिल्ह्यात गेल्या १२ वर्षांच्या तुलनेत २०१७ मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ४३ शेतकरी आत्महत्या कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या आहेत. परभणी जिल्ह्यात गेल्या १२ वर्षांत ६२१ शेतकऱ्यांनी, नांदेड जिल्ह्यात गेल्या १८ वर्षांत १ हजार १३४ शेतकऱ्यांनी तर हिंगोली जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत सुमारे १९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी करूनही या जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे.

दुष्काळ, त्यामुळे झालेली नापीकी, बॅकांनी कर्जपरतफेडीसाठी लावलेला तगादा यामुळे परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी २००३ या वर्षी पासून आत्महत्या करत आहेत. नांदेड जिल्ह्यात २००३ ते २०१७ या १८ वर्षाच्या कालावधीत १ हजार १३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१६ मध्ये १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१७ मध्ये १५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यापैकी मदतीसाठी ११२ प्रकरणे पात्र तर २५ प्रकरणे अपात्र ठरली. १६ प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

परभणी जिल्ह्यात २०१६ मध्ये ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१७ मध्ये पेरणीनंतर आलेला पावसाचा दीर्घ खंड आणि ऐन काढणीच्या काळात आलेला पाऊस, पडलेले बाजारभाव आदी कारणांमुळे  १२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी मदतीसाठी ८५ प्रकरणे पात्र तर ३१ प्रकरणे अपात्र ठरविली असून ९ प्रकरणे प्रलंबित आहेत. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर परभणी जिल्ह्यात तब्बल ४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी अनेक आत्महत्या कर्जमाफीत नसल्याच्या कारणांवरून झालेल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात २०१६ मध्ये ४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१७ च्या आक्टोंबर पर्यंत ३८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी मदतीसाठी २७ प्रकरणे पात्र तर ७ प्रकरणे अपात्र तर ४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना योजनांचा लाभ

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांस विविध विभागाच्या योजनांना लाभ देण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यतील ४३३ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबापैकी ११६ कुटूंबांना कौशल्य विकास, उद्योजकता विकास रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. १०१ कुटुंबावर आरोग्य उपचार, १५३ कुटूंबांना कर्ज, २५  कृषीपंप विज जोडण्या, १३ विहिरी, ३ शेततळी, ४९ कुटूंबांना गॅस जोडण्या, महात्मा फुले आरोग्य अभियानचा ४५ कुटूंबाना लाभ, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ ५४ कुटूंबांना, ७७ जनधन खाते, संजय गांधी निराधार योजने अंतर्गंत १० कुटूंबातील व्यक्तींना वेतन सुरू करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com