agriculture news in marathi, Every particle of soil is like gold; Do not waste it | Agrowon

मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया जाऊ देऊ नका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंची प्रयोगशाळा असून, त्यातूनच पिकांना अन्नघटक पुरविले जातात. त्यामुळे वावरातील मातीचा प्रत्येक कण शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा असून, त्याला वाया जाऊ देऊ नका, असा बहुमोल सल्ला जमीन सुपीकतेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला.  

नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म जिवाणूंची प्रयोगशाळा असून, त्यातूनच पिकांना अन्नघटक पुरविले जातात. त्यामुळे वावरातील मातीचा प्रत्येक कण शेतकऱ्यांसाठी सोन्यासारखा असून, त्याला वाया जाऊ देऊ नका, असा बहुमोल सल्ला जमीन सुपीकतेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिला.  

जमिनीची व पिकाची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी ‘अॅग्रोवन’कडून ‘जमीन सुपीकता’ हा मंत्र दिला जात आहे. त्यासाठी यंदा जमीन सुपीकता वर्ष साजरे केले जात असून, त्यानिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत नाशिकमध्ये ‘जपाल माती तर पिकतील मोती’ या विषयावर बुधवारी (ता. २०) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला उत्तम प्रतिसाद मिळाला.

चर्चासत्राचे प्रायोजक यारा फर्टिलायझर्स, तर सहप्रायोजक कॅन बायोसिस होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, फुकुओका परंपरेतील निसर्गशेतीचे अभ्यासक शेतकरी सुभाष शर्मा, भूसूक्ष्मजीवशास्त्राचे अभ्यासक शेतकरी प्रताप चिपळूणकर, यारा फर्टिलायझर्सचे शास्त्रज्ञ डॉ. गौरवकुमार सिंग, कॅन बायोसिसचे तांत्रिक सल्लागार डॉ. एस. एस. नाकट, ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी चर्चेत भाग घेतला.

मातीचा परिणाम प्रजननशक्तीवर ः डॉ. कौसडीकर
मातीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केवळ उत्पादकताच घटली नसून, मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता पिकांमध्ये उतरली आहे. पिकांमधून पुरेसे अन्नद्रव्य मानवी शरीराला मिळत नाही. त्यामुळे अनेक विकार होत असून, मातीमधील जस्ताच्या कमतरतेमुळे मानवी प्रजननशक्तीवर परिणाम होतो आहे, असे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले. मातीशिवाय शेती शक्य नाही. मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनातून उत्पादकता वाढू शकते. पीकवाढीसाठी कारणीभूत असलेल्या १७ अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनाकरिता जमीन सुपीक ठेवावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला जमिनीमधील २५ टक्के खनिज पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के हवा आणि २५ टक्के पाणी अशा चार घटकांना नेहमीच संतुलित ठेवावे लागेल, असेही ते म्हणाले.

पर्यावरणपूरक शेतीशिवाय विकास नाही ः शर्मा
निसर्गशेतीत जागतिक दर्जाचे संशोधन करणाऱ्या जपानमधील फुकुओका यांच्या परंपरेतील निसर्गशेतीचे अभ्यासक शेतकरी सुभाष शर्मा यांनी पर्यावरणपूरक शेतीशिवाय शेतकऱ्यांचा विकास अशक्य असल्याचे नमूद केले. सूक्ष्म जीव, पशुपक्षी, पाणी, हवा, झाडांच्या सहवासात मी शेती करतो आहे. माझी पिके चांगली उत्पादकता देतात. जैविक घटकांद्वारे किडीदेखील नियंत्रणात असतात, असे श्री. शर्मा म्हणाले. २००७ मध्ये मी रासायनिक शेती करण्याचे थांबवले. ४० कोटी वर्षांपूर्वी या जमिनीवर तयार झालेले जीवजंतू, प्राणी, पाखरे यांचे परस्परपूरक सहजीवन असल्यामुळेच शेतजमीन सुपीक बनते. त्यामुळे जीवसृष्टीला धोक्यात न आणता शेती केली आहे. ती परंपरा आपण तोडल्यामुळे सध्याच्या समस्या तयार झाल्या आहेत, असेही श्री. शर्मा यांनी लक्षात आणून दिले.

शेतीमधले तण देते धन ः चिपळूणकर
भूसूक्ष्म-जीवशास्त्राचे अभ्यासक शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी जमीन सुपीकता वाढविण्यासाठी तणांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन केले. नाशिक भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तण समूळ नष्ट करून फेकून देण्याऐवजी ते बागांमध्येच गाडण्याचा प्रयत्न करावा. यामुळे द्राक्षबागांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात नैसर्गिक पद्धतीचाही हातभार लागेल, असे ते म्हणाले. सेंद्रिय कर्ब घटल्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाली आहे, त्यामुळे जमिनीची उपासमार होते आहे. त्यासाठी शेतात तयार होणारा पालापाचोळा, तण, पाचट, धसकटेही शेतातच कुजवायला हवीत. त्यामुळे सूक्ष्मजीवांना खाद्य मिळेल. तणांचे अवशेष जमिनीत राहिल्यास जिवाणूसंवर्धनाचे कार्य होते व सेंद्रिय कर्ब वाढतो, असे मत श्री. चिपळूणकर यांनी मांडले.

सूक्ष्म जिवाणूंचे संवर्धन करा ः डॉ. सिंग
जमिनीची सुपीकता वाढवायची असल्यास प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतातील जिवाणूंचे संवर्धन करावेच लागेल, असे यारा फर्टिलायझर्सचे तज्ज्ञ डॉ. गौरवकुमार सिंग यांनी नमूद केले. शेतीची उत्पादकता वाढविल्याशिवाय नफ्यात वाढ होणार नाही. उत्पादकतावाढीसाठी जमिनीचा सामू संतुलित ठेवावा लागेल. सामूचे संतुलन पूर्णतः अन्नद्रव्य, पाणी आणि खत व्यवस्थापनावर अवलंबून आहे. सामू वाढल्यास सूक्ष्म जिवाणूंच्या कार्यात बाधा उत्पन्न होते. त्यातून पिकांना योग्य अन्नद्रव्य न मिळाल्याने उत्पादकता घटते, असे डॉ. सिंग म्हणाले. पिकांना अत्यावश्यक असलेले घटक जमिनीतून मिळत नाहीत, त्यामुळे रासायनिक खते द्यावी लागतात. मात्र, या खतांमधून ३० ते ३५ टक्केच अन्नद्रव्य पिकाला मिळते. इतर भाग वाया जात असून, त्यातूनदेखील जमिनीचे नुकसान होते आहे. त्यामुळे नवी संशोधित खते वापरून पिकांचे पोषण करावे लागेल, असेही ते म्हणाले.

जिवाणू पिकांशी बोलतात ः डॉ. नाकट
आपल्या जमिनींवर पहिला अधिकार सूक्ष्म जिवाणूंचा असून, ते कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेले आहेत. तेच आपल्या पिकांशी बोलतात व हवे ते अन्न पुरवतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवत नेणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय जमीन सुपीकता शक्य नाही, असे मत कॅन बायोसिसचे तांत्रिक सल्लागार डॉ. एस. एस. नाकट यांनी व्यक्त केले. सूक्ष्म जीव पिकांचे खरे मित्र आहेत. मुळांजवळ ते २० मिलिमीटरच्या क्षेत्रात राहून पिकांना अन्न पुरवतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी उपयुक्त जिवाणू, अन्य सूक्ष्म जीव, कृमी- कीटक यांची काळजीपूर्वक माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले.

सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा
कोणत्याही रासायनिक घटकाचा अतोनात वापर करून नापिक जमिनी सुधारता येणार नाहीत, त्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा लागेल. तोच शेतजमिनीचा आत्मा असून सेंद्रिय कर्ब जादा असलेली जमीन अमर असते, असे तज्ज्ञांनी या वेळी सांगितले. कुजलेला पालापाचोळा, तण आच्छादन, पिकांचे आच्छादन, हिरवळीच्या खतांचा वापर, सूक्ष्म जिवांचे संवर्धन यामुळेच सेंद्रिय कर्ब वाढतो, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक करताना ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की कृषिप्रधान राज्य असे म्हणताना शेतकऱ्यांसाठी कृती मात्र केली जात नाही. ‘अॅग्रोवन’ मात्र शेतकऱ्यांच्या समृद्धीचे तंत्रज्ञान व माहिती केवळ प्रसिद्ध न करता बांधावर पोहोचविण्याचे कामदेखील करतो आहे. त्यामुळे राज्यातील चार कृषी विद्यापीठांनंतर पाचवे विद्यापीठ म्हणून ‘अॅग्रोवन’चा उल्लेख शेतकरीवर्गात केला जातो. जमीन सुपीकता हा शेती समृद्धीचा मुख्य गाभा असल्यामुळेच या विषयावर थेट शेतकऱ्यांमध्ये जाऊन राज्यभर मंथन घडवून आणले जात आहे.

‘सकाळ’चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी, शेतकऱ्यांवर आलेल्या अरिष्टाला कारणीभूत असलेल्या प्रश्नांचा ‘अॅग्रोवन’कडून अभ्यासूपणे पाठपुरावा करून त्यावरील उपाय देखील मांडण्यात पुढाकार घेतला जात आहे, असे सांगितले. शेतीला समृद्ध करणारी परिसंस्था धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडल्याचे दिसते, असे ते म्हणाले.

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...