नोटाबंदीमुळे कृषी विकासदर घटला ः पी. चिदंबरम

पी. चिदंबरम
पी. चिदंबरम

मुंबई: नोटाबंदीमुळे जानेवारी २०१७ या एका महिन्यात १५ लाख नोकऱ्या गेल्या. १०४ लोकांचा मृत्यू झाला. लघू आणि मध्यम उद्योग बंद झाले. उत्पादन घटले, मागणी घटली, कृषी विकासदर घटला, निर्यात घटली, अशी टीका देशाचे माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते शनिवारी (ता. ९) बोलत होते.  ते पुढे म्हणाले, की बनावट चलनी नोटा, दहशतवाद, काळा पैसा रोखणे यापैकी नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही.

नोटाबंदीनंतर २००० रुपयांच्या बनावट नोटा देशभरात अनेक ठिकाणी आढळून आल्या. नोटाबंदीनंतर २०१७ या वर्षात काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले आणि मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या संख्येत मोठी वाढ झाली. सरकार दरवर्षी दोन कोटी नव्या नोकऱ्या देणार होते. त्या नोकऱ्या कुठे आहेत? काळ्या पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तामिळनाडूच्या आर. के. नगर मतदारसंघातील निवडणूक, निवडणूक आयोगाने रद्द केली. या निवडणुकीत वापरलेला पैसा काळ होता की पांढरा? भाजपने देशात अनेक सभा घेतल्या. त्या सभांचा खर्च चेकने केला का, असा सवालही त्यांनी केला.

मोदी सरकारने केलेली नोटाबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नोटाबंदीमुळे विकासदर दोन टक्क्यांनी कमी होईल, असे डॉ. मनमोहनसिंग म्हणाले होते; ते खरे ठरले. सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली. येणाऱ्या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वांत वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही. नवीन नोटा छापण्यावर ८ हजार कोटींचा खर्च झाला, नोटांची वाहतूक, जुन्या नोटा जमा करणे, त्या जुन्या नोटांची विल्हेवाट लावणे यावर झालेला होणारा खर्च हा वेगळाच आहे. नोटाबंदीवर २१००० कोटी खर्च झाले. पंतप्रधान म्हणतात नोटाबंदी हा धाडसी निर्णय, परंतु चुकीचे निर्णय घ्यायला धाडस लागत नाही. चुकीची जबाबदारी स्वीकारायला धाडस लागते, असे पी. चिंदबरम यांनी म्हटले अाहे.

लघू उद्योगमंत्री कलराज मिश्रा, कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांना मंत्रिमंडळातून वगळले. रेल्वे आणि वाणिज्यमंत्री बदलले, यावरून सरकारने अप्रत्यक्षपणे अपयशी ठरल्याचे मान्य केले आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

सलग सहाव्या तिमाहीत विकासदरात घसरण झाली. येणाऱ्या तिमाहीत ही घसरण कायम राहील. आता भारत ही जगात सर्वांत वेगाने वाढणारी व्यवस्था राहिली नाही. - पी. चिदंबरम, माजी केंद्रीय वित्तमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com