सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेचा उत्साह

सोलापुरात सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता.१२) आयोजित तैलाभिषेक कार्यक्रमापूर्वी नंदीध्वज व लिंगांची विधिवत पूजा करण्यात आली.
सोलापुरात सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त शुक्रवारी (ता.१२) आयोजित तैलाभिषेक कार्यक्रमापूर्वी नंदीध्वज व लिंगांची विधिवत पूजा करण्यात आली.

सोलापूर ः बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला...सिद्धेश्‍वर महाराज की जय.... चा जयजयकार करत सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वरांनी स्थापलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेकाचा विधी शुक्रवारी (ता.१२) मोठ्या उत्साहात पार पडला. तत्पूर्वी सकाळी पालखीसह नंदीध्वज मिरवणूक निघाली. पांढऱ्या शुभ्र बाराबंदी वेशातील भाविकांचा सहभाग आणि शहरातील मुख्य मार्गावरून निघालेले मानाचे सातही नंदीध्वज यामुळे मिरवणुकीने सगळ्यांचेच लक्ष वेधले. भक्तीच्या अभूतपूर्व या उत्साहात अवघे सोलापूर भारून गेले.

तैलाभिषेकासाठी गुरुवारी मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाला साज चढविण्यात आला होता. उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांचे मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, स्मृती शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

त्यानंतर "बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला...सिद्धेश्‍वर महाराज की जय....'' असा जयघोष करीत फुलांनी सजवलेले नंदीध्वज तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाले. या मिरवणुकीतील पहिला नंदीध्वज सिद्धेश्‍वरांचा असतो. या नंदीध्वजाला खोबरे, लिंबाचा हार अर्पण केला जातो. त्यानंतर अन्य सहा नंदीध्वज एकत्रित मार्गक्रमण करतात. सनई-चौघडा, बॅण्ड पथक, हलगी, तुतारी अशा वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून निघाली.

पालखी आणि मिरवणुकीतील नंदीध्वजाच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उंचच्या उंच नंदीध्वज घेऊन निघालेले भक्तगण आणि बाराबंदीच्या पांढऱ्या शुभ्र वेशातील भाविकांच्या सहभागाने मिरवणूक एका वेगळ्याच वातावरणाने भारून गेली. सिद्धेश्‍वरांनी स्थापन केलेल्या शहरातील ६८ लिंगांना या मिरवणुकीतून तैलाभिषेक घालण्याची धार्मिक परंपरा आहे.  

आज अक्षता सोहळा सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य असणारा अक्षता सोहळा शनिवारी (ता.१३) सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास हा सोहळा होईल. या सोहळ्यासाठी परराज्यातून भाविक येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com