पुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’

पुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’
पुण्यातील भिडे यांनी केले मातीला ‘कर्ब श्रीमंत’

 पुणे : पुणे येथील सुनील भिडे यांनी दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलातील ‘टेराप्रेटा’ माती तंत्रावर आधारित शेतीपद्धती आपल्या घराच्या तीन हजार चौरस फूट टेरेसवर विकसित केली आहे. शंभरहून अधिक वनस्पतींचे प्रकार घेत, आपल्या मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्क्यांपर्यंत नेत आपल्या जमिनीला श्रीमंत केले आहे. शेतकऱ्यांनाही या पद्धतीने आपली जमीन सुपीक करणे शक्य व्हावे हेच आपल्या प्रयोगाचे उद्दिष्ट असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले आहे.   रसायनांचा अमर्याद वापर, हवामान बदल, बदलत्या शेती पद्धती आदी विविध कारणांमुळे भारतीय जमिनींची प्रत खालावत असून तिचे वाळवंटीकरण होत असल्याचा धक्कादायक अहवाल ‘इस्त्रो’ या संस्थेने दिला आहे. त्याचवेळी दक्षिण अमेरिकेत वसलेल्या अॅमेझाॅन या घनदाट जंगलखोऱ्यातील ‘टेराप्रेटा’ प्रकारची माती जगभरातील संशोधक तसेच शेतकरी यांच्यासाठी प्रचंड कुतूहलाचा व अभ्यासाचा विषय बनली आहे.  पुणे येथील महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी या संस्थेचे कार्याध्यक्ष व व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असलेले सुनील भिडे यांची निसर्गप्रेमी अशी अोळख आहे. अमेझॉन खोऱ्यातील टेराप्रेटा माती व तेथील शेतीवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. येथील सुपीक, निरोगी व सेंद्रिय कर्बाने भरपूर माती भारतातही तयार होऊ शकते व तीच शेतकऱ्यांना तारू शकते हाच ध्यास त्यांनी घेतला. पुणे शहरात डेक्कन जिमखाना परिसरातील आपल्या वास्तूतील तीन हजार चौरस फुटांच्या टेरेसवर त्यांनी त्या पद्धतीने शेतीही सुरू केली.  रासायनिक खते, कीडनाशके, संजीवके यांचा जराही वापर न करता केवळ जैविक अवशेषांचा वापर करीत त्यांनी आपली शेती व माती समृद्ध केली आहे. आश्चर्य म्हणजे पुणे शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजे सर्वाधिक प्रदूषण, ट्रॅफिक अशा विविध समस्यांच्या वातावरणात राहूनही त्यांनी फुलवलेला निसर्ग, जोडीला मधमाशा, गांडूळे, पक्षी, विविध सूक्ष्मजीव यांचा अधिवास पाहून थक्क व्हायला होते. बारा वर्षांपासून फळबागा, भाजीपाला, फुले आदींचे एकूण शंभरहून अधिक प्रकार त्‍यांनी बागेत घेतले आहेत. पपई, केळी, डाळिंब, फ्लॉवर, वांगी, मिरची, टोमॅटो, रताळे, भोपळा यांचे अत्यंत दर्जेदार व वजनदार उत्पादन घेत त्यांनी आपल्या टेरेसवरील कसदार मातीचा प्रत्यय आणून दिला आहे. ठिबक पद्धतीने पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर ते करतात.  टेराप्रेटा माती समृद्ध का?

  • सेंद्रिय घटकांचे प्रमाण सर्वोच्च. पालाशचे प्रमाण प्रति किलो मातीत २०० ते ४०० मिलिग्रॅम.
  • सेंद्रिय कर्ब प्रति किलो मातीत १५० ग्रॅम (१५ टक्के).
  • सुपीक घटकांचा थर तब्बल एक ते दोन मीटर खोल. 
  • या जमिनीत सर्वाधिक सुपीक, सुदृढ असण्याचे महत्त्वाचे कारण- मुबलक प्रमाणात आढळणारा जैव कोळसा.   
  •   सेंद्रिय कर्ब तब्बल नऊ टक्क्यांवर आपल्याकडील जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आढळते. तिथे भिडे यांनी २००९ मध्ये केलेल्या माती परीक्षणात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तब्बल नऊ टक्के आढळले आहे. खत म्हणून भिडे यांना वर्षाला सुमारे साडेआठ टन जैविक अवशेषांची (कचरा) गरज भासते. त्यासाठी शेजारील इमारती, मंगल कार्यालये, भाजीपाला विक्रेते यांच्याकडून ते अोला वा सुका कचरा घेतात.  - सुनील भिडे, ९४२०४८१७५१ (सुनील भिडे यांची यशकथा वाचा मंगळवार पाच जूनच्या अंकात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com