शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसाय

शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसाय
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसाय

फॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या व्यवसायामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शहरी भागात फॅब्रिकेशन व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळवता येते परंतु, हीच स्थिती ग्रामीण भागात असेल असं नाही. आज शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे आहे आणि शेतीला पूरक व्यवसायाकडे त्यांचा असलेला सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ग्रामीण भागात फॅब्रिकेशन व्यवसाय कृषी उद्योगाशी जोडल्यास शाश्वत उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण केल्या जाऊ शकते. याच विचाराने मंचर (ता. आंबेगाव, जिल्हा पुणे) येथे राहणारे मुबारक अली (वय २६) आणि  मिर्जा  मेहेदी (वय २५) या तरुणांनी २०१५ मध्ये जे. एम. फॅब्रिकेशन या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पार्श्वभूमी मुबारक अली यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी अकरावीत असताना फॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये हेल्पर  म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्याचवेळी मिर्जाची शाळा चालूच होती. पाठ्यपुस्तकीय शिक्षणात स्वारस्य नसल्याने त्यांनी २०१२ मध्ये पाबळ येथील विज्ञान आश्रमात डिप्लोमा इन बेसिक रूरल टेकनॉलॉजी (DBRT) या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मूलभूत ग्रामीण तंत्रज्ञानविषयक हा अभ्यासक्रम आहे. प्रात्यक्षिक शिकतानाच मुबारक अली यांनी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करण्याचे ठरविले. विज्ञान आश्रमात शिक्षण घेताना शिकाऊ उमेदवारी करण्याचीही संधी मिर्जा यांना मिळाली.  या संधीचे सोने करताना, मिर्जा विविध कौशल्य तर शिकलेच शिवाय `कमवा आणि शिका योजने`अंतर्गत विविध कामे करत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळवला. DBRT कोर्स पूर्ण  झाल्यावर, मिर्जा फॅब्रिकेशनची छोटी मोठी कामे करू लागले. त्यानंतर साधारण ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी मंचर येथे आर्क वेल्डिंग, ड्रिल मशिन, ग्राइंडर, कटर इ. मूलभूत  साधनांपासून फॅब्रिकेशन व्यवसायाची सुरवात  केली. सुरवातीच्या काळात विज्ञान आश्रमातील उमेदवारी करणाऱ्या मुलांची मदत घेत मिळेल ती कामे करत राहिले. दरम्यान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना  भेटून फॅब्रिकेशनला शेतीशी कसे जोडता येईल यावर अभ्यास सुरू केला. यात कांदाचाळी,   शेतीची विविध अवजारे, कोंबड्यांचे कमी खर्चातील पिंजरे इत्यादी  बनवण्यात विशेष प्रावीण्य प्राप्त केले.  संधीच्या शोधात  कामाच्या शोधात असताना मुबारक यांना लेअर कोंबड्यासाठी शेड आणि पिंजरा बनविण्याची ऑर्डर मिळाली. नंतर गोट फार्मला पार्टीशन मारणे, शटर बसविणे, जाळी बसविणे, औजारांना वेल्डिंग करून देणे, शेतात शेड बनवून देणे असली छोटी मोठी कामे त्यांना मिळत गेली. मुबारक आणि  मिर्जा  यांनी ऑनसाइट कामाला प्राधान्य दिले कॉन्ट्रॅक्टवर लेबर घेऊन त्यांनी कामे सुरू ठेवली. कामाचा व्याप वाढावा म्हणून त्यांनी आर्किटेक्चर, बिल्डर यांच्याशी जवळीक वाढवली, त्यातून त्यांना तसे कामही भेटत आहे. नुकतंच त्यांनी अवसरी फाटा येथील श्रीनाथ ऑटोमोबाइल्स (टाटा मोटर्स सर्विस सेंटर) येथील काम पूर्ण केलं आहे. जे. एम. फॅब्रिकेशनला भीमाशंकर, जुन्नर, खारघर, पुणे येथून ऑनसाइटच्या ऑर्डर येतात. समाधानकारक उत्पन्न  फॅब्रिकेशन व्यवसायातून मुबारक आणि मिर्जा यांना महिन्याकाठी ६० हजार रुपयांचे समाधानकारक उत्पन्न प्राप्त होत. महिन्याला साधारणतः ५०० किलो स्क्रॅप निघतो त्यातूनही त्यांचा पुरेसा खर्च निघतो. विथ मटेरियल काम करताना ते ७० टक्के ॲडव्हान्स पेमेंट घेतात, त्यामुळे स्वखर्च फार कमी करावा लागतो.   आव्हानांची जाणीव फॅब्रिकेशन व्यवसायाची सुरवात करण्याअगोदर फॅब्रिकेशनचा अनुभव असणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार नाही याची खबरदारी घेणे आणि त्यांना दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. ठरलेल्या वेळेत कामाचे वितरण करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.  उत्पन्न वाढविण्यासाठी मुबारक आणि मिर्जा यांनी लोखंडी गेट, ग्रील, खिडकी, दरवाजा, रेलींग, यांचे फॅब्रिकेशन करायला सुरवात केली आहे. नुकतंच त्यांनी बी पेरणी यंत्रे (सीड प्लांटर) फॅब्रिकेशन करायला सुरुवात केली आहे. त्यांनी कुठलंही कर्ज न काढता सुरू केलेला हा व्यवसाय आता हळूहळू हात-पाय पसरतोय. कामाचा व्याप वाढतोय. याचे मुख्य कारण म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या साधनांचे फॅब्रिकेशन.    :  विकी चौधरी ८४०८८३८४९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com