लेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची कारणे

लेअर कोंबड्यांना स्वच्छ, सर्व अन्नघटकांनी युक्त संतुलित अाहार द्यावा.
लेअर कोंबड्यांना स्वच्छ, सर्व अन्नघटकांनी युक्त संतुलित अाहार द्यावा.

पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक कमतरतेचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे पशुवैद्याकडून त्वरित उपचार करता येतात. सर्वसाधारणपणे पक्षी (मादी) वय २० ते २२ आठवडे झाल्यानंतर अंडी देण्यास सुरवात करतात. हे जरी खरे असले तरी अंडी देण्याची शारीरिक प्रक्रिया प्रथम दिवसापासून सुरू होते. परंतु प्रत्यक्षात अंडे २० ते २२ आठवडे वय झाल्यानंतर शरीराबाहेर पडते. त्यासाठी एक दिवसाच्या पिलापासून ते अंंडी देईपर्यंत पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.   लेअर कुक्कुटपालन - ज्या वेळेस अंड्यांचे उत्पादन चांगले होते, त्या वेळेस या व्यवसायातून अपेक्षित आर्थिक उत्पन्न चांगले होते. पण ज्या वेळेस अंड्यांचे उत्पादन पक्ष्यांच्या संख्येच्या मानाने कमी होते, त्या वेळेस अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय आर्थिक तोट्यात होतो, कारण कुक्कुटपालनातील इतर खर्च कमी होत नसतो; पण आर्थिक उत्पन्नाची बाब म्हणजे अंडी उत्पादन हे कमी झालेले असते. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन कमी का होत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर व्यवस्थापनशास्त्र, आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्रात शोधले पाहिजे. त्यासाठी सकाळी- दुपारी- संध्याकाळी पक्ष्यांना खाद्य, पाणी देत असताना पक्ष्यांचे निरीक्षण करणे अावश्‍यक अाहे. पक्ष्यांचे चालणे, बसणे, श्वास घेणे, पक्ष्यांची विष्ठा, पंखांची अवस्था, खाद्य- पाणी घेताना पक्षी आनंदी आहेत का? या निरीक्षणातून पक्ष्यांचे आरोग्य लक्षात येईल. अंड्यांच्या निरीक्षणातून खाद्यातील त्रुटी लक्षात येतील. तसेच, अनुत्पादक पक्षी ओळखता आले पाहिजेत.

अंड्यांचे उत्पादन कमी का होते?

  • खाद्यभांड्यात खाद्य टाकताना सर्व पक्षी एकाच वेळी खाद्यभांड्याकडे धावतात का? तसे होत असेल, तर पक्ष्यांचे आरोग्य चांगले आहे.
  • काही पक्षी खुराड्यात बसून राहतात का? किंवा खाद्यभांड्याकडे येण्याचा त्यांचा वेग कमी आहे का? असे असेल तर असे पक्षी आजारी असण्याची शक्‍यता असू शकते, त्याचा विपरीत परिणाम अंडी उत्पादनावर होतो. आजारी पक्ष्यांचे निरीक्षण करून पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
  • योग्य वयात योग्य समतोल, संतुलित खाद्यपुरवठा करणे गरजेचे आहे. पक्ष्यांना जरुरीपेक्षा जास्त खाद्यपुरवठा केल्यास पक्षी जाड होतात, पक्ष्यांचे वजन वाढते, लिव्हरवर स्निग्धता जमा होते, त्यामुळे अंडी उत्पादन कमी होते.
  •    पक्ष्यांना अपुरे खाद्य उपलब्ध झाल्यास अंड्यांचे उत्पादन कमी होते, त्यासाठी प्रत्येक पक्ष्याला त्याच्या वजनाप्रमाणे अंडी उत्पादनाप्रमाणे खाद्य उपलब्ध झाले पाहिजे. याकडे लक्ष दिले पाहिजे.
  • पाण्याची कमतरता झाल्यास अंड्यांचे उत्पादन कमी होते, तरी पक्ष्यांना सतत स्वच्छ, मुबलक, नायट्रोजनमुक्त पाणी उपलब्ध झाले पाहिजे, याकडे लक्ष दिले पाहिजे.
  • अंड्यावरील पक्ष्यांना १६ ते १७ तास प्रकाश उपलब्ध झाला पाहिजे. तो न मिळाल्यास अंड्यांचे उत्पादन कमी होते. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी प्रकाशाचे प्रमाण सारखे असावे. प्रकाशामध्ये सातत्य न राहिल्यास अंड्यांचे उत्पादन कमी कमी होत जाऊन पक्षी अंडी देणे बंद करतात.
  • खाद्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास अंड्यांचे उत्पादन घटते. अंड्याचे कवच खराब येते, त्यासाठी पक्ष्यांना खाद्यामधून ०.५ टक्केपेक्षा जास्त मीठ जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • खाद्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास अंड्यांचे उत्पादन कमी होते. पातळ, मऊ कवचाची अंडी तयार होतात, अशी अंडी व्यावसायिकदृष्ट्या हानिकारक आहेत. त्यासाठी खाद्यामध्ये शिंपल्याची पूड मिसळून खाद्य द्यावे.
  • प्रत्येक पक्ष्याला घरामध्ये २ चौ. फूट जागा उपलब्ध करून द्यावी. कमी जागेत जास्त पक्षी ठेवल्यास खाद्य पाणी भांड्याजवळ गर्दी वाढेल. पक्षी अापसात भांडतील. त्यामुळे पक्षी जखमी होतील. कळपात मृत्यूचे प्रमाण वाढेल, उत्पादनात घट येईल. गर्दीमुळे संसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढून अंडी उत्पादन कमी होईल.
  • शेडमध्ये मोकळी हवा असावी. शेडमध्ये साठणारे वायू बाहेर पडतील याची काळजी घ्यावी. शेडमध्ये वायू साठून राहिल्यास पक्ष्यांना श्‍वसनेंद्रियाचे आजार होतात अाणि अंडी उत्पादनात घट येते.
  • शेडमधील लिटर कोरडे राहील याची काळजी घ्यावी. लिटर कोरडे नसल्यास रक्तीहगवण या रोगाचा प्रादुर्भाव होऊन अंडी उत्पादनात घट येईल.
  • पक्ष्यांना वेटोळे जंत, चपटे जंताचा प्रादुर्भाव झाल्यास पक्ष्याची भूक चांगली असते; पण पक्ष्यामध्ये अशक्तपणा वाढतो, पक्ष्याचे वजन वाढत नाही, हगवण लागते, याचा परिणाम म्हणजे अंडी उत्पादन कमी होते.
  • पक्ष्यांना जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात, या प्रक्रियेस मोल्टिंग असे म्हणतात. पक्षी १ वर्षीचे झाल्यानंतर सर्वसाधारणपणे पावसाळ्यात पिसे गळतात आणि नवीन पिसे येतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात अंड्यांचे उत्पादन लक्षणीय कमी होते. खाल्लेले खाद्य नवीन पिसे तयार करण्यासाठी उपयोगात येते. या काळात पक्ष्यांना प्रथिने अधिक प्रमाणात द्यावीत. त्यासाठी खाद्यामधून पेंड, सुकट, मांसाचे तुकडे द्यावेत. तसेच २ टक्के मिनरल मिक्‍श्चर खाद्यातून द्यावे. चांगला परिणाम दिसून येईल.
  • वातावरणातील बदल, जसे अति थंडी, अति उन्हाळा, सतत पाऊस यामुळे देखील अंडी उत्पादन कमी होते. या काळात व्यवस्थापनात योग्य ते बदल केल्यास अंड्यांच्या उत्पादनात सातत्य राहील.
  • वातावरणात जिवाणू, विषाणूंचे अस्तित्व असते, त्याचा प्रादुर्भाव पक्ष्यांना झाल्यास अंड्यांचे उत्पादन लक्षणीय घटते. काही रोगांमुळे पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी योग्य वयात रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेतलेच पाहिजे. म्हणजे इन्फेस्क्‍शियस ब्राँकायटिस, मानमोडी, मरेक्‍स, देवी स्पायरोचिटोसिस, गंबारो, कॉलरा, लॅरिगो ट्रॅंकियटिस इत्यादी रोगांविरुद्ध पशुवैद्यकाकडून रोगप्रतिबंधक लसीकरण करावे. म्हणजे अंडी उत्पदनात सातत्य राहील.
  • कॉक्‍सिडियॉसिस (रक्तिहगवण) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पक्ष्यामध्ये मोठ्या प्रमाणात मरतूक होते, अंड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. हा रोग एकपेशीय जंतूंपासून होतो. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेड स्वच्छ ठेवावे, लिटर ओले होऊ न देता खाली- वर करावे. लिटर कोरडे राहील याची काळजी घ्यावी.
  • संपकर् ः  डॉ. श्रीकांत सरदेशपांडे, ९६५७२५७८०४  (लेखक पशुतज्ज्ञ अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com