agriculture news in Marathi, Farmer Dharma Patil exploited on government level, Maharashtra | Agrowon

शासनाच्या बेदरकारीने धर्मा पाटील यांची कोंडी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

आमचे वडील न्याय मिळावा म्हणून सतत धुळे, मुंबई येथे संबंधित अधिकारी, विभागांमध्ये चकरा मारत होते. पण कुणी जुमानत नसल्याने ते निराश झाले होते. आम्हाला न्याय मिळायला हवा. 
- नरेंद्र पाटील, धर्मा पाटील यांचे ज्येष्ठ पुत्र

धुळे : सर्व शेतजमीन शासनाच्या औष्णिक प्रकल्पात गेली... त्यातच मुलांना नोकरी, कामासाठी गावातून स्थलांतर करावे लागले... अशातच प्रकल्पात गेलेल्या जमिनींचा हवा तेवढा मोबदला धुळे जिल्हा प्रशासनातील प्रमुख कार्यालये व पुढे मंत्रालयात वारंवार खेटे घालूनही मिळत नसल्याने हतबल, निराश झालेल्या विखरण (देवाचे) (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील ८० वर्षीय धर्मा मंगा पाटील यांना विष घेऊन जीवन संपविण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलावे लागले.

धर्मा मंगा पाटील यांनी दलालांची मदत घेऊन आपला मोबदला मिळवावा..., त्यातून आपलेही खिसे गरम होतील... या बेदरकार, खाबुगिरीच्या वृत्तीमुळे पाटील कुटुंब संकटात सापडले आहे. याच वेळी शिंदखेडा व संबंधित भागात प्रकल्पग्रस्तांना निम्मे हिस्सा घेऊन जमिनीचा मोबदला मिळवून देणारे रॅकेटही सक्रिय असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

प्रशासन व शासन यांच्या मस्तवालपणामुळे धर्मा पाटील यांना विष घ्यावे लागले, असा आरोप विखरणमधील ग्रामस्थ, शेतकरी करीत आहेत. धर्मा पाटील हे विष घेतल्याने मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये दाखल असून, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

विखरण हे तसे चार हजार लोकसंख्येचे गाव असून, शिंदखेडा रस्त्यावर आहे. दोंडाईचा (ता. शिंदखेडा) विखरणपासून नजीक असून तेथेच या गावाचे महसुली व बाजाराचे व्यवहार होतात. २०१० मध्ये या गावानजीक तत्कालीन आघाडी सरकारने औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आणला. महानिर्मितीच्या अखत्यारित हा प्रकल्प असून त्यासाठी २०१२-१३ पासून जमिनींचे भूमीअधीग्रहण कायद्याचा आधार न घेता सरळ खरेदी सुरू झाली.

हेक्‍टरी १० लाख कोरडवाहूसाठी, निमबागायतीसाठी हेक्‍टरी १५ लाख व बागायतीसाठी २० लाख हेक्‍टरी दर दिले जात होते. भूमीअधीग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार गावातील जमिनीचे मूल्य एकरी ५२ हजारांपर्यंत येत होते. शेतकऱ्यांना अधिक दर मिळावेत, म्हणून सरळ पद्धतीने किंवा भूमीअधीग्रहण कायदा वगळून खरेदी सुरू केली. 

विखरणमधील ४५० शेतकरी बाधित असून त्यांची यादी, आधार क्रमांक, बॅंक खाते व इतर प्राथमिक माहिती शासनाने सुरवातीलाच घेतली. एकूण एक हजार हेक्‍टर जमीन या प्रकल्पासाठी हवी होती. यातील सुमारे ६०० हेक्‍टर जमीन एकट्या विखरण गावातील शेतकऱ्यांची असणार आहे. प्रकल्पासाठीचे संपादन पूर्ण होत आले असून, आता फक्त १८९ हेक्‍टर जमिनीचे संपादन राहिले आहे. 

धर्मा पाटील यांच्याबाबत अन्याय
या प्रकल्पात धर्मा मंगा पाटील यांची पाच एकर जमिन गेली आहे. ती प्रकल्पाच्या मधोमध असून, तिचे संपादन अनिवार्य होते. धर्मा पाटील हे जमीन देण्यास तयार नव्हते. कारण त्यात त्यांची ६०० आंब्याची झाडे होती. या जमिनीला दीर्घ फळबागायती म्हणून अधीग्रहण कर्त्या महानिर्मितीने मोबदला द्यावा, अशी त्यांची मागील तीन वर्षांपासूणची मागणी होती. पण त्यांच्या जमिनीला बागायती धरून तिचे मूल्यांकन व्हावे, यासंबंधी अधीग्रहणकर्त्यांनी कृषी विभागाला प्रस्ताव दिला नाही. नंतर २०१५-१६ मध्ये थेट त्यांची जमीन भूमीअधीग्रहण कायद्याचा आधार घेऊन ताब्यात घेतली. या जमिनीचा एकूण सुमारे चार लाख ६५ हजार रुपये मोबदला त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला. 

दखल नाहीच
धर्मा पाटील यांच्यासह इतर पाच फळबागायतदार शेतकरी असून, यातील पद्मसिंग गिरासे यांना त्यांच्या ७२ आर. जमिनीचा मोबदला एक कोटी ७७ लाख रुपये एवढा मिळाला आहे. पद्मसिंग यांची डाळिंब शेती असल्याचे मूल्यांकन होते. तर उर्वरित चार फळ बागायतदारांमध्ये अंबालाल रामसिंग गिरासे, जयपाल रामसिंग गिरासे (दोघे डाळिंब उत्पादक) आणि अशोक भीमसिंग गिरासे व दीपक भीमसिंग गिरासे (दोघे आंबा उत्पादक) हे आहेत. जसा पद्मसिंग गिरासे यांना मोबदला मिळाला, तसा आपल्यालाही मिळावा म्हणून हे चौघे शेतकरी व धर्मा पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री (धुळे), पर्यटनमंत्री यांच्याकडेही मागण्यांचे निवेदन वारंवार दिले. पण त्याची दखल घेतली नाही.

निम्म्या हिस्स्याने रॅकेट सक्रिय
या भागात प्रकल्पग्रस्तांना निम्मी हिस्सा पद्धतीने जमिनीचा मोबदला मिळवून देणारे रॅकेट असून त्यांची मदत जे घेतील त्यांना लवकर मदत मिळेल, वरपर्यंत सेटिंग करण्याचे काम हे रॅकेट करते. कामे पटापट होतात. यांची मदत घेण्यासाठीच धर्मा पाटील यांना जणू काही मंडळी प्रवृत्त करीत होती. पण धर्मा पाटील यांनी त्यांची मदत न घेता आपल्याला न्याय मिळण्यासाठी विखरण ते मुंबई, अशी पायपीट सुरूच ठेवली असेही यानिमित्त चर्चिले जात आहे. 

तीन महिने मुंबईला पायपीट
जिल्ह्यात कुणी दाद घेत नाही म्हणून धर्मा पाटील हे उतारवयात मुंबईचे खेटे मागील तीन महिने घालत आहे. अशातच २३ जानेवारीला प्रकल्पग्रस्तांची बैठक मुख्यमंत्र्यांकडे घेण्याचे ठरले होते. त्यासाठी धर्मा पाटील हे मुंबई पोचले. पण मुख्यमंत्री एका कार्यक्रमासंबंधी परदेशात गेल्याने ही बैठक रद्द झाली. त्याची कोणतीही पूर्वसूचना त्यांना मंत्रालयातून आली नव्हती. त्यात धर्मा पाटील निराश व हतबल झाले आणि त्यांनी विष घेतल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत. 

पूर्ण शेतजमीन गेली
धर्मा पाटील यांची पूर्ण पाच एकर जमीन या प्रकल्पात गेली आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नरेंद्र पाटील हे नोकरीनिमित्त सुरत (गुजरात) येथे दोन वर्षांपूर्वी गेले आहे. तर कनिष्ठ चिरंजीव महेंद्र हे अमळनेरात एका संस्थेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करतात. धर्मा पाटील यांना तीन मुलीही आहेत. ते एकटेच पत्नी सखुबाई पाटील (वय ७५) यांच्यासोबत विखरणमध्ये राहतात. विखरणचा सौर प्रकल्प तीन गावांची जमीन संपादीत करून पूर्ण करायचा आहे. त्याचे काम सुरू झालेले नाही. सध्या दोन तीन सुरक्षा रक्षक असतात. याची जमीन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून मागील वर्षी घोषीत झाली. पण त्याला दोंडाईचा सौर प्रकल्प नाव दिले असून, त्यासाठी सरकारमधील काही राज्यकर्त्यांनी श्रेयवाद सुरू केला. पण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सोईस्कर दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. 

प्रतिक्रिया
आघाडी सरकारने औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प म्हणून विखरणनजीक शेतजमिनीचे संपादन सुरू केले. आता भाजप सरकारने हा प्रकल्प सौर प्रकल्प म्हणून हाती घेतला. ज्या जमिनींचे संपादन केले, त्याच्या सातबाऱ्यावर महानिर्मितीचे नाव लागले. त्यांनी या जमिनीचा महसूलही भरलेला नाही. परिणामी ग्रामपंचायतींना २५ टक्के महसुली निधीही मिळाला नाही. विखरणसह मेथी व वरझडी या ग्रामपंचायतींची फसवणूक शासनाने केली आहे. हा प्रकल्प म्हणजे फक्त स्वप्नच ठरला आहे. 
- विकास पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता, विखरण (जि. धुळे)

 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...