एकरी १०३ टन उसाचे उत्पादन

रेठरे हरणाक्ष, जि. सांगली : भगवान बल्लाळ यांच्या ऊसपिकाची पाहणी करताना अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले. संजय पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग होनमाने, सूर्यकांत दळवी व अन्य अधिकारी.
रेठरे हरणाक्ष, जि. सांगली : भगवान बल्लाळ यांच्या ऊसपिकाची पाहणी करताना अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले. संजय पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग होनमाने, सूर्यकांत दळवी व अन्य अधिकारी.

सातारा : रेठरे बुद्रुक (जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या भगवान बल्लाळ या शेतकऱ्याने एकरी १०३ टन ऊस उत्पादन घेतले आहे.

कृष्णा कारखाना पुरस्कृत उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा शेततळ्यामध्ये साठा करून, त्याला ठिबक सिंचनाची जोड देऊन श्री. बल्लाळ यांनी घेतलेले हे उत्पादन कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या ऊसपिकाची पाहणी करताना सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी कृष्णा कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून एकरी १०० टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २०१६-१७ या कालावधीत या योजनेत २ हजार ४०९ शेतकरी सभासद सहभागी झाले असून, २ हजार ४९० एकर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ऊसपिकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे, ऊसविकास विभागातील मंडल अधिकारी व शेती मदतनीस यांच्यामार्फत मार्गदर्शन व माहिती संकलित केली जाते. तसेच सहभागी शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात येतात.

या योजनेत सहभागी झालेले रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा, जि. सांगली) येथील शेतकरी सभासद भगवान जयसिंग बल्लाळ यांनी कारखान्याच्या बिचुद-भवानीनगर उपसा जलसिंचन योजनेचा वापर करून, क्रमपाळीनुसार मिळणाऱ्या पाण्याचा शेततळ्यामध्ये साठा केला. त्याला ठिबक सिंचनाची जोड देऊन उत्कृष्ट नियोजनाने मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येते हे दाखवून दिले. त्यांच्या क्षेत्रातील कारखान्याकडे गळितास आलेल्या उसाचे उत्पादन एकरी १०३.८१२ मेट्रिक टन इतके झाले आहे.  

या वेळी कारखान्याचे संचालक संजय पाटील, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, जे. डी. मोरे, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, शिवाजी बाबर, आर. जे. पाटील, सुधाकर भोई, अजय दुपटे यांच्यासह ऊसविकास व इरिगेशन विभागातील कर्मचारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com