शेतकरी संघटनेचे आधारस्तंभ रवी देवांग यांना साश्रूनयनांनी निरोप
शेतकरी संघटनेचे आधारस्तंभ रवी देवांग यांना साश्रूनयनांनी निरोप

शेतकरी संघटनेचे आधारस्तंभ रवी देवांग यांना साश्रूनयनांनी निरोप

धुळे : शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे साथी, स्थापत्य अभियंता, नामवंत आर्किटेक्‍ट, प्रयोगशील शेतकरी आणि विपश्‍यनेसह विविध चळवळींचे आधारस्तंभ रवी देवांग (वय ६२) यांचे शेगाव (जि. बुलडाणा) येथे मंगळवारी (ता. १२) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात येथील देवपूरमधील अमरधाममध्ये बुधवारी (ता.१३) दुपारी साडेबाराला अंत्यसंस्कार झाले.  साथी देवांग यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह अनेक मान्यवरांना अश्रू अनावर झाले. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंद जोशी, अनंतराव देशपांडे, बाबूराव गोल्डे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात श्री. जोशी व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय पदाधिकारी अरविंद कपोले यांनी श्रद्धांजली वाहिली. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, मेधा पाटकर, पाशा पटेल, न्या. पुखराज बोरा, ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी शोक संदेश दिला.   देवांग यांच्या जाण्याने संघटनेला विचार देणारा अभ्यासू, लढाऊ बाण्याचे व्यक्तिमत्त्व, आधारवड हरपल्याने चळवळीची मोठी हानी झाली, शरद जोशी यांच्यानंतर संघटनेवर हा दुसरा मोठा आघात झाल्याची भावना श्री. जोशी यांनी व्यक्त केली. कर्मयोध्दा, प्रामाणिक, निर्भीड, काम तडीस नेणारा व शेतकऱ्यांसाठी आयुष्य समर्पित करणारा साथी गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना श्री. कपोले यांनी व्यक्त केली. रमाकांत देसले यांनी देवांग यांना भावणारी "आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण'' ही कविता सादर करून श्रद्धांजली वाहिली. शेतकरी संघटना, शरद जोशी झिंदाबाद, रवी देवांग अमर रहे'', या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भावनिक घोषणांनी परिसर दुमदुमला.  देवांग अविवाहित होते. ते मूळचे शिरूड (ता. धुळे) येथील रहिवासी आहेत. शेतकरी संघटनेतर्फे शेगाव (जि. बुलडाणा) येथे मार्केट यार्डच्या आवारात मंगळवारी दुपारी एक ते सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यस्तरीय परिषद होती. नंतर ते तेथील शासकीय विश्रामगृहात गेले. गप्पागोष्टी सुरू असताना रात्री साडेआठला त्यांच्या छातीत कळ आली. ते लक्षात येताच देवांग यांना प्रदेशाध्यक्ष अनिल धनवट, संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, गोविंद जोशी व इतर सहकाऱ्यांनी शेगाव येथील यश हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com