कर्जमाफीला गती; साडेआठ लाख खात्यांवर ४४२८ कोटी वर्ग

कर्जमाफीला गती; साडेआठ लाख खात्यांवर ४४२८ कोटी वर्ग

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर चोहोबाजूंनी टीकेचे लक्ष्य व्हावे लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने आता ही प्रक्रिया वेगाने राबवण्यास सुरवात केली आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत फक्त ६९,८३२ शेतकऱ्यांना ४३९ कोटी ९४ लाख रुपयांची प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली होती, तर २ डिसेंबरपर्यंत ८ लाख ३४ हजार ३९९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४ हजार ४२८ कोटींहून अधिकची कर्जाची रक्कम वर्ग करण्यात माहिती व तंत्रज्ञान आणि सहकार विभागाला यश आले आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गांभीर्याने कर्जमाफीची प्रक्रिया जलदगतीने राबवण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

जूनमधील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पहिले दोन ते तीन महिने शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेणे, छाननीत गेल्यानंतर ऑक्टोबरपासून कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रक्रियेतील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या गोंधळामुळे योजना पुढे सरकलीच नाही. सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या ग्रीन लिस्टमध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे मधले किमान ४० दिवस हा गोंधळ दूर करण्यातच गेला. यावरून राज्य सरकारला शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जहरी टीकेचा सामना करावा लागला. इतर अनेक मुद्यांसोबत कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अपयशावरून विरोधकांनी राज्यव्यापी आंदोलन, मोर्चे सुरू केले आहेत. त्यातच पुढील आठवड्यात सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनातही शिवसेनेसह विरोधी पक्षांचे आमदार या मुद्यावर सरकारविरोधात रान पेटविणार हे स्पष्ट आहे. त्याचमुळे कर्जमाफीच्या ऐतिहासिक अपयशाचे धनी व्हावे लागू नये त्यामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने कर्जमाफीची अंमलबजावणी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.

गेले काही दिवस माहिती व तंत्रज्ञान आणि सहकार विभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालून कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे २५ नोव्हेंबरपर्यंत फक्त ६९,८३२ शेतकऱ्यांना ४३९ कोटी ९४ लाख रुपयांची प्रत्यक्ष कर्जमाफी मिळाली असताना २ डिसेंबरअखेर ८ लाख ३४ हजार ३९९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४ हजार ४२८ कोटींहून अधिकची कर्जाची रक्कम वर्ग करण्यात यश आले आहे. सुटीच्या दिवशीही काम सुरू असल्यामुळे हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत शेतकरी लाभार्थी संख्येत आणि कर्जमाफीच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत कमालीची अनिश्चितता निर्माण झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या रेट्यामुळे माहिती व तंत्रज्ञान आणि सहकार विभागाला प्रक्रियेतील कोंडी फोडण्यात यश आले. एकाअर्थाने हे विरोधकांचे यश मानले जात आहे. तरीही दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी १५ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६,५०० कोटी जमा केल्याची घोषणा अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. त्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत आणखी दहा-दहा लाख शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट बँकांना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे समजते. २५ नोव्हेंबरपर्यंतची स्थिती लाभार्थी संख्या - ६९ हजार ८३२ रक्कम वर्ग - ४३९ कोटी ९४ लाख २४,३४१ रुपये २ डिसेंबरअखेरची कर्जमाफीची स्थिती आतापर्यंत बँकांकडे वर्ग रक्कम रुपये - ८,४५५ कोटी (जिल्हा बँका - २,७६८ कोटी आणि व्यापारी बँका - ५,६८७ कोटी) ग्रीनलिस्ट तयार - १३ लाख २५,२५० शेतकरी यापैकी तपासणी झालेली खाती - १२ लाख ४०,६०५ शेतकरी अचूक खाती - ९ लाख ७६,८७१ दुरुस्तीची गरज असलेली खाती - २ लाख ५१,१४५ तपासणीच्या प्रतीक्षेत खाती - ९९,३२६ प्रत्यक्षात लाभार्थी शेतकरी - ८ लाख ३४ हजार ३९९ रक्कम वर्ग - ४ हजार ४२८ कोटी २४ लाख ३२,५१७ रुपये जिल्हा बँका - खातेधारक संख्या - ४ लाख ५४,८६७ कर्ज रक्कम - २ हजार ११९ कोटी १९ लाख ८८,९९५ रुपये व्यापारी बँका - खातेधारक संख्या - ३ लाख ७९,५३२ कर्ज रक्कम - २ हजार ३०९ कोटी ४ लाख ४३,५२१ रुपये  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com