फवारणीने अंधत्व आलेल्या `कालिदास'ची दिवाळी अंधारात

कालिदास सूर्यवंशी
कालिदास सूर्यवंशी

महागाव, जि. यवतमाळ : शेतात कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने डोळे गमावण्याच्या वाटेवर असलेला अंबोडा (ता. महागाव) येथील शेतमजूर कालिदास विठ्ठल सूर्यवंशी (वय ४०) घरातील अठराविश्व दारिद्र्यामुळे उपचार घेऊ शकत नाही. त्यातच संवेदनशून्य शासकीय यंत्रणेने कालिदास यांच्या वेदनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या कुटुंबाला दिवाळी अंधारात साजरी करावी लागली आहे.  शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही डोळ्यांची दृष्टी परत येण्याचे चिन्ह दिसत नसल्याने शेतमजूर असलेले कालिदास हताश झाले असून त्यांची पत्नी व मुलाबाळांच्या डोळ्यात केवळ अश्रू आहेत.  पोटाची खळगी भरण्यासाठी पाठीवर फवारणी पंप घेऊन कालिदास २२ सप्टेंबर रोजी गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात फवारणी करावयास गेले. फवारणी दरम्यान डोळ्यांना विषबाधा झाल्याने कालिदास सूर्यवंशी यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. धुरासारखे अस्पष्ट दिसू लागल्याने कालिदास यांना पुसद व नांदेड येथील नेत्र तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले. खर्चाची ऐपत नसल्याने नांदेड शासकीय रुग्णालयातही त्यांना हलविण्यात आले. परंतू एक महिना होत आला तरी कालिदास सूर्यवंशी यांना अद्यापही अस्पष्टच दिसत असून अंधत्व येण्याचे चिन्ह असल्याने या गरीब शेतमजूर कुटुंबावर आभाळच कोसळले.  कालिदास सूर्यवंशी यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून पूर्णपणे अंधत्व आले तर मोठे संकट कुटुंबापुढे उभे राहण्याची शक्यता आहे. कालिदास यांची पत्नी सौ. संगीता आणि मुलांना रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवावा लागत असून कालिदास यांच्या उपचारासाठी मोठी  धावपळ करावी लागत आहे. कृषी विभागाच्या कोडग्या यंत्रणेने या विषबाधित शेतमजुरास वाऱ्यावर सोडल्यामुळे डोळ्यांची दृष्टी गमविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com