साताऱ्यातील ७६ शेतकऱ्यांना विमासंरक्षण

साताऱ्यातील ७६ शेतकऱ्यांना विमासंरक्षण
साताऱ्यातील ७६ शेतकऱ्यांना विमासंरक्षण

सातारा ः गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील ११८१ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षण मिळाले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात निकामी किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त होते. नोव्हेंबर २०१५ मध्ये शेतकरी अपघात विमा योजनेला ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

या योजनेत डिसेंबर २०१५ पासून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना दुप्पट म्हणजे दोन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शेतात दैनंदिन कामे करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अपघात होतात. अनेकदा विषारी प्राण्यांचा दंश, वीज पडणे, विजेचा धक्‍का लागणे, रस्ते अपघात या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यूदेखील होतात.

अपघातात घरातील कर्ता व्यक्‍ती गमावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून संरक्षण देण्यात आले आहे. योजनेच्या लाभासाठी शेतकरी हे दहा ते ७५ वर्षे वयोगटातील असावेत, अपघात विमा संबंधित कृषी पर्यवेक्षक यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज, मृत झाले असल्यास मृत्यूचा दाखला, सात- बारा उतारा, वयाचा पुरावा, अपघाती मृत्यू असल्यास शवविच्छेदन प्रमाणपत्र, अपंगत्व आले असल्यास कायम अपंगत्व प्रमाणपत्र, बॅंकेचे पासबुक आदी प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मार्चअखेर १६४ प्रस्ताव विमा कंपनीस सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, तीन प्रस्ताव नामंजूर तर ८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतात काम करत असताना विविध प्रकारच्या अपघातामुळे शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा कायमचे अंपगत्व येते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी शासनाने शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे.

मात्र, अनेकवेळा या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता असते. या मदतीपासूनशेतकरी किंवा शेतकऱ्यांचे कुटुंबीय वंचित राहू नये, यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या योजनेतून जास्ती जास्त मदत व्हावी यासाठी दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव जमा केले जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com