कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित

कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित

बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १८) सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध प्रात्यक्षिके पाहून शेतकरी प्रभावित झाले. 

कृषिक प्रदर्शनात नांदेड, गडचिरोली, हिंगोली, परभणीपासून ते अगदी सातारा, कोल्हापूर, चंदगड, बेळगाव, रत्नागिरीपर्यंतचे शेतकरी स्वयंस्फूर्तीने आले होते. या शेतकऱ्यांपैकी अनेकांनी गुरुवारी रात्रीच बारामतीत पोचून मुक्काम केला व सकाळपासून प्रदर्शनात सहभाग घेतला. या शेतकऱ्यांनी शेतीची विविध प्रात्यक्षिके व यांत्रिक अवजारांना पसंती दिली. बहुतांश शेतकरी हे आपल्या कुटुंबांसमवेत आले होते. गेली दोन वर्षे कृषिक पाहण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नीलाही आणावे, जेणेकरून नवे तंत्र महिला शेतकरी खूप लवकर आत्मसात करतील, अशी जनजागृती केली जात होती. त्याला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आज जाणवले. 

आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी भुसार शेतीची व भाजीपाल्याच्या पिकांची सूक्ष्म पाहणी केली. पिकांचे नवे वाण, त्यांचे नेमके हंगाम, उत्पादनाची टक्केवारी, कमी पाण्यात येणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, कमीत कमी खत, औषधे लागणारी, रोगप्रतिकारक गुण उत्तम असणाऱ्या पिकांची त्यांनी कंपन्यांकडून माहिती घेतली. चौकस शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवे तंत्र नेताना आपल्या जमिनीत ते तगेल अशा पद्धतीने सारी माहिती तज्ज्ञांकडून घेण्यास प्राधान्य दिले. तसेच कमी खर्चाच्या शेडनेट शेतीलाही शेतकऱ्यांनी अधिक पसंती दाखवली.

४० फूट उंचीच्या उसाची गोड कहाणी हडपसरमधील भेकराईनगर येथे ऋतुगंध नावाचा बंगला आहे. या बंगल्याला वेलींमुळे शोभा आलेली नाही, तर चौथ्या मजल्यापर्यंत पोचलेल्या उसाने शोभा आणली. हाच ४० फूट उंचीचा ऊस सध्या कृषिकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राजेंद्र यादव व वेदांत यादव या चुलत्यापुतण्यांनी घरापुढे लावलेला हा ऊस आणून जातिवंत शेतकऱ्यांनाही विचार करायला लावला.

नांदेडमध्ये आम्ही कांदा असाच पेरूनं... गादी वाफ्यावरचा कांदा, संकर केलेला भाजीपाला, उसाची सेंद्रिय शेती पहिल्यांदा पाहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील उंबरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा गट एकदम उत्साही झाला.डोलंब्री गावच्या शेतकरी गटातील प्रभू रावसाहेब सरसे, विनोद संभाजी बैनवाड, वानमराव साहेबराव पगलवाड या शेतकऱ्यांनी ‘‘आमी आता कंप्लीट असाच कांदा घेऊन राहणार भौ’’ असे सांगत येथील शेतीचा मंत्र नांदेडमध्ये रुजविण्याचा संकल्प केला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com