अकोल्यातील अांदोलनाने शेतकऱ्यांना दिले लढण्याचे बळ

अकोला ः पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हात उंचावून अशी एकजूट दाखवली.
अकोला ः पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हात उंचावून अशी एकजूट दाखवली.

अकोला ः कुठल्याही स्थानिक मोठ्या नेतृत्वाशिवाय गेले तीन दिवस येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शेतकऱ्यांनी दिलेला लढा अाणि त्यांच्या मागण्यांवर शासनाला झुकते घ्यावे लागल्याने सर्वांचा विजय झाला.

या अांदोलनाचे नेतृत्व करणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे वलय जितके महत्त्वाचे ठरले; तितकीच शेतकऱ्यांची मानसिकताही महत्त्वाची होती हे नाकारता येणार नाही. दुसरीकडे अांदोलन ‘पाडण्यासाठी’ काम करणाऱ्या विविध शक्तींना झणझणीत चपराकही या अांदोलनाने दिली.

जनता एकवटली तर काहीही अशक्य राहत नाही, हेही या निमित्ताने दिसून अाले. शेतकरी जागर मंच नावाच्या बिगर राजकीय संघटनेत सर्वच पक्षांतील शेतकरी विचाराचे कार्यकर्ते एकवटलेले अाहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून वेळोवेळी शेतकरी प्रश्नांवर अावाज उठविला. या वर्षात तूर खरेदीच्या मुद्द्यावर अामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हा पणन अधिकाऱ्याला कोंडण्याचे अांदोलन केल्यापासून जागर मंच अधिक चर्चेत अाला.

तूर खरेदी, नाफेडची शेतमाल खरेदी, कर्जमाफी, सोयाबीन अनुदान व इतर शेतकरी मागण्यांवर सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू होता. दरम्यानच्या काळात एका वर्तमानपत्रात यशवंत सिन्हा यांचा नोटाबंदी व त्याअनुषंगाने अार्थिक धोरणांबाबत लेख प्रसिद्ध झाला अाणि देशभर खळबळ उडाली. याचा फायदा घेत जागरमंचाने यशवंत सिन्हांना अाॅक्टोबमध्ये अकोल्यात व्याख्यानासाठी अाणले अाणि या व्याख्यानानंतर अापसुकच या लढ्याचे नेतृत्व सिन्हांच्या हातात पोचले. येथून लढ्याची बीजे पेरली गेली.

रविवारी (ता. ३) कापूस-सोयाबीन-धान परिषदेला अालेल्या यशवंत सिन्हा यांनी ठोस भूमिका घेत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ४) सर्जिकल स्ट्रॉइक करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष अकोल्याकडे वेधले गेले. ठरल्यानुसार मोर्चा निघाला. तीन ते साडेतीन तास ठिय्या अांदोलनही झाले. नंतर पोलिसांनी स्थानबद्ध करीत अांदोलकांना पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर नेल्यापासून हे मैदान पुढील तीन दिवस देशभरासाठी लक्ष वेधणारे ठिकाण झाले.

यशवंत सिन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जागर मंचाचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी, कार्यकर्ते तीन रात्री मैदानावरच झोपले. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस अाश्वासन हवे अशी भूमिका घेण्यात अाली. त्यामुळे वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये कुठलाही तोडगा निघत नव्हता. मात्र शेवटी ‘मुंबई’तून सूत्रे हलली. मुख्यमंत्री कार्यालय कामाला लागले अाणि बुधवारी (ता. ६) दुपारी चार वाजता सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला. लढ्यानंतर  राजकीय चष्म्यातून विश्लेषणे मांडताहेत या लढ्यात सहभागी झालेले हे विविध राजकीय पक्षांत वावरणारे असले तरी शेतकरी प्रश्नांवर एकवटले होते. त्यामुळेच हा वाढत चाललेला लोकलढा पाहून अनेक राजकीय पक्ष सुरवातीला घेतलेली बघ्याची भूमिका सोडून पाठिंब्यासाठी पुढे अाले. अाजवर विविध राजकीय पक्षांच्या ‘मोटी’त बांधलेले शेतकरी हा लढा स्वतःच्या बळावर लढले. अकोला हा प्रामुख्याने जातीअाधारित राजकारणाचा गड मानला जातो.

या ठिकाणी पूर्वीसारखी शेतकरी अांदोलने होत नाहीत. शेतकरी प्रश्नांवर मोठी ‘स्पेस’तयार झालेली अाहे. अशा वेळी या लढ्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागण्यांना, त्याच्या अात्मविश्वासाला बळ मिळाले. अाता या लढ्यानंतर अनेकजण राजकीय चष्म्यातून विश्लेषणे मांडू लागली अाहेत. मात्र हा विजय कोणत्या नेत्याचा नसून, शेतकऱ्यांचा अाणि शेतकरी विचारांचा झाला एवढेच खरे...!  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com