कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर शेतकरी

नवीन एचव्हीडीएस योजनेअंतर्गत सर्व ग्राहकांच्या प्रलंबित वीजजोडणीची कामे केली जातील. कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची पडताळणी करून प्रतीक्षा यादी शाखेनिहाय तयार केली आहे. - ए. एन. पवार, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, धुळे ग्रामीण उपविभाग
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर शेतकरी
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर शेतकरी

देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत विविध नऊ मंडळांतील ५८२ शेतकऱ्यांनी २०१५-१६ या वर्षांपासून कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अर्ज केले. त्यांनी रीतसर डिमांड ड्राफ्टही भरले. तरीही ते वीज जोडणीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे आर्वी शाखेत सर्वाधिक १७७ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. महावितरणतर्फे उघडलेली विशेष मोहीम थंड बस्त्यात का गेली, असा  शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

जिल्ह्यात काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून अनुदानातून विहिरींची कामे होत आहेत. विहिरींची कामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. महावितरण कंपनीनेही वीज जोडणीसाठी वर्षभरापूर्वी मोहीम सुरू केली. मात्र, अजूनही या ५८२ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही.  काही शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर वीजपंप खरेदी केले. मात्र, त्याचा भुर्दंडही त्यांना सोसावा लागत आहे. एकीकडे शासन सिंचनाची सुविधा वाढावी, यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची फरफट होत आहे. वीजजोडणीचे अर्ज वीज कंपनीच्या कार्यालयांत पडून आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्याठिकाणचे  उंबरठे झिजवावे लागत आहेत. महावितरणने उच्च दाब वितरण प्रणालीचे (एचडीव्हीएस) नियोजन केले आहे. या प्रणालीद्वारे केवळ दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिली जाणार आहे. मात्र, त्याची ठोस अंमलबजावणी नाही.

एचव्हीडीएसमध्ये अडचणी सध्याच्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांतून १५ ते २० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते.  मोठ्या प्रमाणात वीजहानी होते. शिवाय शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, रोहित्र बिघाड, अपघात आदींना महावितरणला सामोरे जावे लागते. या सर्व अडचणींवर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे मात करता येणे शक्‍य होणार आहे.

शाखानिहाय प्रलंबित वीजजोडण्या

नेर क्रमांक एक  १६
नेर क्रमांक दोन   ६५
देऊर बुद्रुक ३४
कुसुंबा  ६३
आनंदखेडे  ६२
मुकटी  ४५
आर्वी   १७७
शिरूड   ९४
बोरविहीर  २६
एकूण   ५८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com