शेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार

शेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार
शेतकरी संघर्ष समिती पुन्हा रस्त्यावर उतरणार
   मुंबई : दूध दरातील अभाव, साखरेचे कोसळलेले भाव आणि मोझांबिकमधून आयात तूरीवरुन राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला. यासंदर्भात राज्य सरकारने सात जूनपर्यंत कोणताही प्रतिसाद न दिल्यास त्यानंतर शेतकऱ्यांनी शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवावा असे आवाहन किसानसभेचे डॉ.अजित नवले यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.    डॉ.नवले म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेला प्रति लिटर २७ रुपये दर मिळत नाही. तरीही देवेंद्र फडणवीस सरकार गुजरात आणि कर्नाटकच दूध पायघड्या घालून महाराष्ट्रात आणत आहे. साखरेचे दरही कोसळलेले आहेत. राज्यात तूर खरेदी थांबली आहे. तरीही सरकारकडून पाकिस्तानातून साखर आणि मोझांबिकमधून तूर आयात केली जात आहे. दूध उत्पादक, ऊस उत्पादक, तूर उत्पादक अशा सर्वच शेतकऱ्यांचे शोषण सुरु आहे. मात्र, केंद्रात आणि राज्यात निर्लज्ज सरकार आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांबद्दल चांगल्या निर्णयांची अपेक्षा नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत. याचा निषेध म्हणून येत्या ५ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर निषेध आंदोलन करणार आहोत.   शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने गुजरात आणि कर्नाटकमधील राज्यात येत असलेले दूध, पाकिस्तानची आयात साखर आणि मोझांबिकची तूर तहसीलदार कार्यालयामार्फत फडणवीस सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत. त्यानंतरही सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास ७ जूननंतर शेतकऱ्यांनी शहरांचा भाजीपाला आणि दूध पुरवठा रोखावा असे आवाहन आहे. ७ जूननंतर शेतकऱ्यांनी हा लढा स्वतःच्या हातात घेऊन शहरांचा पुरवठा थांबवावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यानंतर १० जूनला राज्यभरात शेतकरी चक्का जाम आंदोलन करुन सरकारला औकात दाखवून देतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच १ जूनपासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com