नगरमधील ७ हजारांवर शेतकरी हरभरा खरेदीपासून वंचित

हरभरा
हरभरा

नगर : हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी सुरू असलेले शासकीय खरेदी केंद्रे बंद झाली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केलेल्या ७३३९ शेतकऱ्यांना हरभरा विक्री करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना आता बाजारात हरभरा विक्री करताना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. यंदा जिल्ह्यामध्ये हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरांत अजूनही हरभरा पडून आहे. बाजारातही दर खाली आले आहेत. शासकीय खरेदी केंद्रावर यंदा १ लाख ९६ हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी झाली.

राज्यातील जवळपास पंचवीसपेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. बाजारात आवक वाढली, की लगेच हरभऱ्याचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात होती. त्यामुळे हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मागणीनुसार केंद्रे सुरू झाली होती.

जिल्ह्यात हरभऱ्याचे झालेले उत्पादन लक्षात घेऊन १३ ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू झाली होती. जामखेड, कर्जतला तर प्रत्येकी दोन केंद्रे सुरू होती. सुरवातील २९ मे रोजी मुदत संपल्याने केंद्रे बंद झाली. तोपर्यंत दीड लाख क्विंटल हरभरा खरेदी झाली होती. त्यानंतर मुदत वाढली. आता वाढलेली मुदत संपल्याने बुधवारी (ता. १३) केंद्रे बंद झाली. आता ही केंद्रे पुन्हा सुरू होण्याची आजिबात शक्‍यता नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ हजार ३०६ शेतकऱ्यांकडून ८६ कोटी ४६ लाख रुपयांची १ लाख ९६ हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे.

मात्र हरभरा विकण्यासाठी २४ हजार ६४५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. ७३३९ शेतकऱ्यांना हरभरा विक्री करता आला नाही. नोंदणी करूनही हरभरा विक्री करता आला नाही अशा शेतकऱ्यांची संख्या जामखेड, कर्जतमध्ये अधिक आहे. हरभरा विक्री करता आली नाही. हरभरा खरेदी केंद्रे बंद झाली आणि लगेच बाजारातही दर खाली आले असल्याने सुमारे सव्वासात हजार शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.

केंद्रनिहाय हरभरा खरेदी (क्विं.)
नगर  २१,७९५
नेवासा ५३७५
शेवगाव ७६१७
श्रीरामपूर १२५०
वांबोरी (राहुरी) १६०२
श्रीगोंदा १९,५०५
राहाता ४३१८
कोपरगाव ४७१४
खर्डा (जामखेड)  ५४,७०७
कर्जत ४२,६९७
पारनेर   १०८९
जामखेड  १६,३९३
मिरजगाव १५,४३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com