साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक हमीभावापासून दूरच

शेतकऱ्यांच्या अार्थिक अडचणीचा व्यापाऱ्यांकडून फायदा उठविला जात आहे. हमीभाव प्रमाणेच दर मिळाला तर शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी शिल्लक पडणार आहे. यासाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, तसेच कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी. - अनंत माने, प्रगतिशील शेतकरी, रहिमतपूर, जि. सातारा.
सोयाबीन
सोयाबीन

सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू झाली असून, दर मात्र हमीभावापेक्षा खूपच कमी आहेत. व्यापाऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याबाबत असमर्थता दाखवली आहे. त्यातच शासनाने अजूनही खरेदी केंद्र सुरू केलेली नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

राज्यात बहुतांशी ठिकाणी खरिपात सोयाबीन हे प्रमुख पीक झाले आहे. दिवसेंदिवस सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनला प्रतिक्विंटल ३३९९ रुपये हमीभाव जाहीर केला. गेल्या वर्षी ३०५० रुपये हमीभाव होता. पहिल्या टप्प्यात पेरा झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. पिकाच्या आवश्यकतेनुसार पाऊस न झाल्याने अपेक्षित उत्पादन नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मिलमध्ये सोयाबीनला क्विंटलला ३२०० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना ३००० ते ३१०० रुपये दर देणे शक्य असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यात घट, फॅट, हमाली, बारदाना या नावाखाली क्विंटल मागे २०० ते ३०० रुपये कपात होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात २५०० ते २६०० रुपये पडत आहेत. सध्या पावसाने दडी मारली असल्याने दुसऱ्या टप्प्यातील सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. हमीभावापेक्षा कमी दराने अनेक ठिकाणी राजरोसपणे सोयाबीनची खरेदी सुरू आहे. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ होण्यासाठी शासनाने त्वरित प्रत्येक तालुका स्तरावर खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. या केंद्रांवर नुसते उत्तम दर्जाच्या सोयाबीनची खरेदी न होता दोन ग्रेडमध्ये खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारण ए ग्रेड सोयाबीनला हमीभाव मिळतो. मात्र बी ग्रेडच्या सोयाबीनची व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दरात खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com