कंपन्यांकडून मदत मिळवून देणारच : मुख्यमंत्री

कंपन्यांकडून मदत मिळवून देणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कंपन्यांकडून मदत मिळवून देणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळ : बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत हेक्‍टरी तब्बल ३० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खासगी बियाणे कंपन्यांचादेखील वाटा राहणार असून, तो कोणत्याही परिस्थितीत कंपन्यांकडून घेत शेतकऱ्यांना दिला जाईल. यापूर्वी केवळ पाच हजार रुपयांची मदत देत शेतकऱ्यांची बोळवण केली जात होती. आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी असल्याने अशाप्रकारची भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  घारफळ (ता. बाभूळगाव) येथे रविवारी बळिराजा जलसंजीवनी योजनेतील ७३८ कोटींच्या निधीतून १४ प्रकल्पाचे कार्यान्वयनास प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने प्रत्येक बाबतीत विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण ठेवले. कर्जमाफीचा फायदा केवळ पश्‍चिम महाराष्ट्राला मिळाला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तसेच राहिले. या वेळच्या कर्जमाफीत विदर्भ, मराठवाड्यातील खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, याकडे लक्ष्य केंद्रित करण्यात आले. ५० लाख शेतकऱ्यांचे खाते क्‍लीअर केले. कर्जमाफीतून एक हजार कोटी रुपये एकट्या यवतमाळलाच दिले; पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्‍कम जाणार नाही, तोवर ही योजना सुरूच राहणार. शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानांचे घरकुलाचे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री मदन येरावार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार भावना गवळी, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार या वेळी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी पीक पद्धती बदलावी : गडकरी केंद्र सरकारच्या निधीतून दोन मोठे प्रकल्प, सहा मध्यम, ५६ लघु प्रकल्पांकरिता ७१४ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती पालटावी याकरिता शेतकऱ्यांनी पीक फेरपालटावर भर देण्याचे आवाहन या वेळी नितीन गडकरी यांनी केले. 

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • जुन्या सरकारने रिकामी तिजोरी आणि प्रश्‍नांचा डोंगर दिला
  • केंद्रीय मंत्री गडकरी आणि पंतप्रधान यांच्या समर्थ साथीने सर्व अडसर दूर करण्यात यश
  • विदर्भातील १०४ प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होणार
  • २००६ मधील पंतप्रधान पॅकेज कुचकामी
  • २००६ मधील पॅकेजच्या ९ हजार विहिरी आणि ६०० शेततळी आता केली
  • १५ वर्षांत दिल्या नाही त्या २० हजार वीज जोडण्या तीन वर्षांत दिल्या
  • सौर फीडरच्या माध्यमातून शेतीला २४ तास वीज मिळणार
  • सिंचनाच्या नावाखाली काहींनी आपल्या तिजोऱ्या भरल्या
  • यवतमाळ जिल्ह्यात नद्यांचे जाळे. त्यातील पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com