धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस लागवडीकडे कल

धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस लागवडीकडे कल
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस लागवडीकडे कल

धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर खरीप हंगाम उभा राहणार आहे. यंदा शेतकरी पुरेसा चारा, धान्य घरात असावे यासाठी ज्वारी व बाजरी पेरणीचे नियोजन करीत आहेत. यासोबतच नगदी पीक म्हणून कापूस लागवडही कमी अधिक क्षेत्रात केली जाईल, अशी स्थिती आहे. धुळे जिल्हा अर्धाअधिक कोरडवाहू शेतीचा आहे. धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबे परिसर, साक्रीमधील पिंपळनेर भागात सिंचनाच्या सुविधा आहेत. धुळ्यातील कापडणे, न्याहळोद, जापी भागांतील शेतकरी कांदा लागवड करतात. कमी पाण्यात चांगले उत्पादन घेणारे शेतकरी या भागात आहेत. शिंदखेडामधील तापीकाठावर स्थिती बरी आहे. परंतु शिंदखेड्याचा पश्‍चिम, दक्षिण भागही सिंचनाच्या सुविधांविनाच आहे.  शिरपुरात सातपुडा व तापीकाठालगतच्या काही गावांमध्ये मुबलक जलसाठा आहे. या तालुक्‍यात कापसाचे क्षेत्र अधिक राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व ८७ महसूल मंडळांना कमी पावसाचा फटका बसला. पिके हातची गेल्यानंतर परतीचा पाऊस आला. रब्बी हंगामातही जेमतेम स्थिती होती.  कापसाचे गुलाबी बोंड अळीमुळे ८० टक्के नुकसान झाले. तर ज्वारी व बाजरीचेही कमी पावसामुळे नुकसान झाले. पिकात तूट आली. तुरीचे क्षेत्र जिल्ह्यात कमी होते. सर्वाधिक दोन लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड जिल्ह्यात झाली होती.  मागील हंगामात फटका बसल्याने शेतकरी सावध आहेत. नियोजन करताना कापसाची लागवड कमी करायची आणि इतर सर्व पिकांना प्राधान्य द्यायचा विचार शेतकरी करीत आहेत. यामुळे कापसाची लागवड घटू शकते. सोयाबीनची पेरणी मात्र कमी होईल, अशी स्थिती आहे. कारण, जिल्ह्यात काळीकसदार जमीन फक्‍त तापीकाठ व पांझरानदीनजीक आहे. साक्री, शिंदखेड्या पश्‍चिम पट्ट्यात हलकी जमीन आहे. या भागात तृणधान्यासह कडधान्याची पेरणी होईल. नंतर परतीचा पाऊस आला तर दादरची पेरणी शेतकरी करतात. कापसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात यंदा नुकसान कमी व्हावे, यादृष्टीने शेतकऱ्यांनी पेरणीची वर्गवारी केली आहे.  पावसानंतर बियाणे खरेदी बियाणे खरेदीला अजूनतरी धुळे, शिरपुरात हवा तसा प्रतिसाद नाही. कारण पाऊस कसा येतो, यावरच पेरणीबाबतचा शेवटचा निर्णय होईल. पाऊस जसजसा लांबतो, तशी कापसाची लागवड कमी होते. मग तूर, बाजरीची पेरणी केली जाते. मागील वर्षाचा कटू अनुभव व पावसाची गरज या बाबी लक्षात घेता बियाणे खरेदी पहिला पाऊस झाल्यानंतर करायचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचे चित्र आहे. 

कर्ज वितरण ठप्पच जिल्ह्यातही सोसायट्यांकडून होणारे कर्ज वितरण ठप्प आहे. कर्जमाफीच्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज मिळालेले नाही. कारण, कर्जमाफीची रक्कम बॅंकेत जमा झालेली नाही. जिल्ह्यात यंदा सुमारे ९०० कोटी रुपये कर्ज वितरणाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे. परंतु, यातून २० टक्केही कर्ज वितरण झालेले नाही. 

संकरित कापूस बियाण्यांची टंचाई जिल्ह्यात २० मेपासून कापूस बियाणे दाखल व्हायला सुरवात झाली. आतापर्यंत तीन लाख बीटी कापूस बियाण्याची पाकिटे प्राप्त झाली आहेत. एक लाख दोन हजार मेट्रिक टन खते मिळणार आहेत. खते मागील हंगामाची शिल्लक आहेत. सुमारे आठ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. बियाणे व खते मुबलक असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. परंतु देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्याची टंचाई आहे. त्याची हवी तेवढी उपलब्धता नसल्याने त्यांचा काळाबाजार शिरपूर व धुळे भागात सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.  यंदा कापसाची लागवड कमी करून कडधान्ये व तृणधान्यांची पेरणी वाढविणार आहे. अजून पूर्वहंगामी कापूस लागवड आमच्या भागात सुरू झालेली नाही. परंतु पुढील आठवड्यात लागवड सुरू होईल.  - प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (ता. शिंदखेडा)

खरिपात तृणधान्ये व कडधान्यांची पेरणी यंदा वाढवू. कापूस लागवड  करायची आहे. पण पावसावरच सर्व अवलंबून आहे. अजून बियाणे खरेदी  केलेले नाही. - प्रवीण देसले, शेतकरी, देवभाने (ता. जि. धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com