पेरणीची वेळ जवळ येतेय, पण भांडवल उपलब्ध नाही

जास्तीचा उत्पादन खर्च, कमी बाजारभाव यामुळे परवडत नसल्याने तीन वर्षांपासून कापूस लागवड बंद केली आहे. यंदा दहा एकर क्षेत्रापैकी एक एकर रसवंतीसाठी आणि एक एकर कारखान्यास घालण्यासाठी अशी २ एकरांवर ऊस लागवड केली आहे. ३ एकरांवर सोयाबीन, दीड एकरावर हळद लागवड करणार आहोत. उर्वरित क्षेत्रावर मूग, उडदामध्ये तुरीचे आंतरपीक घेणार आहोत. याशिवाय तीळ, कारळ या पिकांचीदेखील अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करणार आहोत. शेतामधून थेट विक्री सुरू केलेली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन यंदा कडधान्याच्या डाळी, तीळ, कारळं, गूळ विक्री करणार आहोत. - बालासाहेब राऊत, शेतकरी, तेलगाव, ता. वसमत
खरीप नियोजन
खरीप नियोजन
हिंगोली ः कर्जामाफीचा घोळ अद्याप सुरूच आहे. पीककर्ज देण्यासाठी बॅंकांकडून चालढकल केली जात आहे. तुरीचे थोडेबहुत पैसे मिळाले असले तरी हरभऱ्याचे चुकारे अजून रखडलेलेच आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा रोखीवर भर आहे. त्यामुळे उधारीवर निविष्ठा मिळणे कठीण झाले आहे. पेरणीची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. नैसर्गिक आपत्ती, कोसळलेले बाजारभाव, बाजार यंत्रणा यांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी भांडवल उपलब्ध नाही.
 
त्यामुळे ऐनवेळी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने रिन (कर्ज) काढून पेरणी करावी लागणार आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. गतवर्षीपेक्षा यंदा कापूस लागवड क्षेत्रात ११ हजार २२ हेक्टरने (२० टक्के) घट होऊन ४३ हजार ६८४ हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात २५०० हेक्टरने वाढ होऊन यंदा २ लाख ३० हजार ५१८ हेक्टरवर, तुरीची ४६ हजार ९९७, मुगाची १२ हजार ४७२, उडदाची ८ हजार ९२, ज्वारीची १० हजार २६, मक्याची २६२३, तीळाची २३१ हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे.
 
वाढलेला उत्पादन खर्च, वेचणीसाठी मजुरांची समस्या बोंड अळीचा प्राद्रुर्भाव यामुळे कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होईल. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या हळदीच्या क्षेत्रात यंदा २० ते ३० टक्के वाढ होईल, असे सांगितले जात 
आहे.
 
सध्या जिल्ह्यातील शेतकरी हरभऱ्याच्या मोजमापासाठी केंद्रावर, पीककर्जासाठी बॅंकेत चकरा मारत आहेत. पेरणीपूर्व वखर पाळ्या, काडीकचरा वेचणे, शेणखत नेऊन टाकणे, हळद लागवडीसाठी बेड तयार करत असल्याचे चित्र जिल्ह्यातील गाव शिवारात दिसत आहे. 
 
‘महाबीज’ आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे मिळून एकूण १ लाख १० हजार ८७४.९७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६६ हजार १२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. बीटी कपाशीची ३३ हजार २२० पाकिटेदेखील उपलब्ध झाली आहेत. खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या ५८ हजार
१२० टन रासायनिक खतांचा साठा मंजूर झाला आहे. गतवर्षीचा १५ हजार ७९१ टन खतसाठा शिल्लक आहे.

यंदा जिल्ह्यातील बॅंकांना ९५९ कोटी खरीप पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पीककर्जामध्ये ७३ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परंतु खरीप हंगाम जवळ येऊन ठेपलेला असताना अद्याप एक हजार शेतकऱ्यांनादेखील पीक कर्जवाटप करण्यात आलेले नाही.

कर्जवाटप रक्कम उद्दिष्टाच्या जेमतेम एक टक्कादेखील कर्जवाटप झालेले नाही. बॅंकांकडून वेळेवर पीककर्ज मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी चिंतित झाले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com