तूर, हरभरा विक्रीचे पैसे न मिळाल्याने उसनवारी, कर्ज काढून पेरणी

आमच्या भागात खरिपात वाटाणा व सोयाबीन, तूर, मूग ही पिके घेतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही वाटाणा, तूर, मूग घेण्याचे नियोजन आहे. आता पाऊस किती लवकर येतो. पेरणीच्या काळात योग्य पाऊस पडतो का यावर खरीप पेरणी अवलंबून आहे. मात्र साऱ्या शक्‍यता गृहीत धरून नियोजन केले आहे. - ज्ञानदेव ठुबे, शेतकरी, कान्हुर पठार, जि. नगर.
खरीप नियोजन
खरीप नियोजन

नगर  : मागील दहा वर्षांतील पाच ते सहा वर्षे दुष्काळातच गेली. गेल्या दोन वर्षांत जरा बरे दिवस गेले. यंदाही चांगल्या पावसाची आशा आहे. शेती मशागतीची कामे उरकली असून, समाधानकारक पाऊस पडेल अशी आशा ठेवूनच पेरणीचे नियोजन केले आहे. परंतु तूर, हरभरा विक्री करून दोन महिने झाले तरी अजूनही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्या खरिपासाठी बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन काही शेतकऱ्यांनी केले आहे.

ऊस आणि साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नगरची राज्यात ओळख आहे. मात्र जिल्ह्याच्या दक्षिण भागासह उत्तरेतील काही तालुक्‍यांनी मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. खरिपात तूर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी आणि अलीकडच्या काळात कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.

सध्या जिल्ह्यातील शेतकरी खरीप पूर्वमशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. गतवर्षीच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला, मात्र नतंरच्या काळात ओढ दिल्याने पिकांना काहीसा फटका बसला. त्यामुळे उत्पादनात घट झाली आणि आर्थिक नियोजन कोलमडले.

या वर्षी सुरवातीलाच चांगल्या पावसाचे आणि मॉन्सून लवकर येण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाबाबत उत्साह आहे. लवकर पाऊस झाला, लवकर पेरणी झाली आणि पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन पाणी साठवण झाले, तर उन्हाळी पिकेही घेता येतात.

यंदा लवकर पाऊस येणार असल्याचे सांगितले जात असल्याने आता जवळपास मशागतीची कामे उरकली असून, चांगला पाऊस झाला तर जुनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. पाऊस लांबला, तर पीक पेरणीचेही नियोजन बदलू शकते, त्या दृष्टीनेही शेतकऱ्यांनी तयारी केली आहे.

नगर जिल्ह्याचे खरीप पिकांचे चार लाख ७८ हजार ५७१ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी साधारण साडेपाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा चार लाख ८० हजार ५५० हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती.

गतवर्षी बोंड अळीचा फटका बसल्याने कापूस उत्पादनात मोठा फटका सोसावा लागला असला तरी यंदाही कापसाचे क्षेत्र गतवर्षी एवढे राहण्याचा अंदाज आहे. लवकर पाऊस झाला तर तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढेल. कापसाच्या पिकांतून होणारे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी पिकांचाही अवलंब शेतकरी करणार असल्याचे दिसत आहे.  जिल्ह्यामध्ये यंदा तूर, हरभऱ्याचे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शासनाने हमीभावाने तूर, हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे तीस हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी तूर, हरभऱ्याची विक्री केली आहे. अजून पन्नास हजारांवर शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र विक्री करून दोन महिने झाले, तरी शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि शेतीचा खर्च फक्त पीक उत्पादनातून येणाऱ्या पैशावरच अवलंबून आहे. त्यामुळे शेती कसण्याशिवाय पर्याय नाही. ती कसण्यासाठी पैसा लागतोच. मात्र सध्या खरिपाचे बियाणे, खते व मशीगतीकरिता पैसे नसल्याने उसनवारी करून, कर्ज काढून खरिपाची पेरणी करण्याचे काही शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com