संकटे असली तरी खचून न जाता पेरणी करणार

दोन वर्षापासून थकबाकीदार असल्यामुळे पीक कर्ज मिळत नाही. माफ झाले की नाही ते सांगितले जात नाही. नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे. जुन्या शेतकऱ्यांना एक जूननंतर येण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी दोन एकरांमध्ये दोन क्विंटल कापूस निघाला नाही. त्यामुळे यंदा कापूस लावायचा नाही. सोयाबीन, मूग, तूर पेरणार आहोत. पेरणीसाठी रान तयार आहे. पीक कर्ज मिळण्याची आणि पाऊस येण्याची वाट पहात आहोत. - शेख नासेर, शेतकरी, तरोडा, जि. परभणी.
खरीप नियोजन
खरीप नियोजन

परभणी : औंदा मोसमी पाऊस वेळेवर यावा, समद्यांची पेरणी सोबतच व्हावी. अबक (लवकर) पेरणी झाली तर आमदानी चांगली येते. त्यासाठी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होऊन आर्द्रा नक्षत्रात पेरणी उरकणे आवश्यक आहे. शेतीत नाना तऱ्हेच्या संकटांचा फेरा सुरूच असतो. त्यामुळे खचून जाऊन उपयोग नाही. चांगला पाऊस झाला की पेरणी करावीच लागणार आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत.

बोंड अळीमुळे झालेले नुकसान तसेच मजुरांच्या समस्येमुळे यंदा कपाशीची लागवड घटणार आहे. सोयाबीन, तूर, मूगाचा पेरा तसेच हळद, केळी लागवड वाढणार आहे. उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. त्यामुळे खरिपाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट येणार आहे. सध्या पेरणीपूर्व वखर पाळ्या, नांगरट, प-हाटी उपटून, काडी कचरा वेचणे, शेतात शेणखत नेऊन टाकणे, हळद लागवडीसाठी सऱ्या, वरंबे तयार करण्याची कामे सुरू आहेत.

पीक कर्जातून बियाणे, खतासाठी पैशाची तजवीज करण्याकरिता बॅंकेत चकरा मारणे, बाजारपेठेत बियाणे, खतांची उपलब्धता, त्यांचे दर यांचा अदमास घेणे, हरभऱ्याचे मोजमापासाठी केंद्रावर चकरा, असा सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वसाधारण दिनक्रम सुरू आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असले तरी पूर्व मोसमी कापूस लागवड सुरू केलेली नाही. उन्हाळी भुईमूग काढणीची कामे सुरू आहेत.

तूर्त बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप सुरू असून जेमेतेम १ ते दीड टक्का वाटप झाले आहे. तूर, हरभऱ्याचे चुकारे रखडले आहेत. वेळेवर पीक कर्ज मिळाले नाही तर पेरणीसाठी उधार-उसणवारी करावी लागेल. तेही नाही जमले तर कर्जासाठी सावकाराचे उंबरठे झिजवल्याशिवाय गत्यंतर नाही.

परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २१ हजार ८१० हेक्टर असून या सर्व क्षेत्रावर पेरणी होईल असे गृहित धरण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन कृषी विभागाने केले आहे. आजवर सोयाबीनचे १० हजार ६०० क्विंटल बियाणे आणि कपाशीची १ लाख २५ हजार पाकिटे बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत. विविध ग्रेडचा ३९ हजार टन खतसाठा उपलब्ध आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ४३ हजार २१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. यंदा महाबीजकडे २७ हजार ७७८ आणि खासगी कंपन्यांकडे ७० हजार २७२ क्विंटल अशी एकूण ९८ हजार ५० क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे.

गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रतिहेक्टरी ५.५ पाकीट यानुसार ९ लाख ७ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

बोंड अळीचा प्राद्रुर्भाव कमी करण्यासाठी यंदा सोमवारपासून (ता. २१) बाजारामध्ये बीटी कपाशी बियाणे उपलब्ध झाले आहे. आजवर १ लाख २५ हजार पाकिटे उपलब्ध झाली आहेत.जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

आजवर जिल्हा बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांनी एकूण ३ हजार ६६ शेतकऱ्यांना १४ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपयांचे (०.९९ टक्के) कर्ज वाटप केले आहे. पेरणी   तोंडावर आलेली असतांना राष्ट्रीयकृत बॅंकांनी अद्याप पीक कर्ज वाटपास सुरवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com