हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा मात्र कायम

खरीप हंगाम तोंडावर अाला अाहे. शेतकरी खते, बियाण्यांची तजवीज करीत अाहे. त्यांच्यासमोर या वेळी अनेक अडचणी अाहेत. शेतीमाल घरात पडलेला अाहे. बाहेर भाव नसल्याने शेतीमाल विक्रीची अडचण अाहे. नाफेडला द्यावे तर तेथे वेळेवर पैसे मिळत नाही. हंगाम समोर असताना मागे जाणे योग्य नाही, हे पाहून कमी दराने शेतीमाल विकावा लागत अाहे. - दत्ता वाळके, वाळकी, जि. वाशीम.
तयारी खरीपाची
तयारी खरीपाची

अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला आहे. असे असताना अद्यापही शेतकऱ्यांना  बियाणे खरेदीसाठी पैशांची मोठी अडचण भासत आहे. सोयाबीन उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात गेल्या हंगामात पिकाने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला. याची झळ रब्बीतही भरून निघाली नाही. हरभऱ्यासारख्या पिकाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाले. आता हंगामासाठी कृषी निविष्ठांची खरेदी करावी तर बँकांकडून पीककर्जही मिळालेले नाही. हजारो शेतकरी सध्या पीककर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बँकांकडून नव्याने पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जंत्री जमवावी लागत असल्याने त्यातही त्यांचा वेळ जात आहे.  वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब म्हणून अोळखल्या जातो. जिल्ह्याच्या चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होते. उर्वरित ३५ टक्के क्षेत्रात इतर पिके घेतली जातात. परंतु, दरवर्षी हंगामात या पिकाचे कमी होणारे दर पाहता शेतकरी कपाशीकडे वळू लागले होते.

मात्र, गेल्या वर्षी कपाशीवर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने ही स्थिती शेतकऱ्यांना पुन्हा सोयाबीनकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकते. मागील वर्षी कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नव्हता. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कपाशी लागवड क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत साडेसात हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे.

वाशीम जिल्‍ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र २९,७०१ हेक्टर अाहे. गेल्यावेळी ३०,९२१ हेक्टरवर पेरणी झाली होती. या वेळी २३,५०० हेक्टरवर कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. सोयाबीनची २,७३,५१७ हेक्टरवर पेरणी झाली होती. या हंगामात हे क्षेत्र वाढून २ लाख ७५ हजार हेक्टरवर पोचू शकते. जिल्‍ह्यात तुरीच्या क्षेत्रात साडेचार हजार हेक्टरची वाढ अपेक्षित धरत गेल्या वेळच्या ५७,५१५ हेक्टरच्या तुलनेत ६२ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात अाले.

गत हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा ठरला अाहे. गेले वर्षभर शेतमालाला भाव मिळालेले नाहीत. कमी पावसामुळे पिकांचे उत्पादन घटले. परिणामी सर्वच पिके तोट्याची ठरली. अाता नवा हंगाम समोर असताना अनेक शेतकरी पैशांअभावी चिंतातूर अाहेत. जिल्ह्यात बोगस बियाणे दरवर्षी विकले जाते. यामुळे हंगामात बियाणे उगवले नाही, झाडांवर शेंगा धरल्या नाहीत, अशा तक्रारी येतात. हे रोखण्यासाठी यंत्रणांनी तपासणी सुरू केली. जिल्ह्यात या हंगामात अाणखी कठोर कारवायांची गरज अाहे. वाशीम जिल्ह्यात यावर्षी सुमारे चौदाशे ७५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्य ठेवण्यात अाले अाहे. अातापर्यंत जिल्ह्यात १०० कोटींचेही पीककर्ज वाटप झालेले नाही. वाटप झालेल्या पीककर्जात सर्वाधिक वाटा अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अाहे. उर्वरित बँकांनी पीककर्जाला अद्याप फारसे प्राधान्य दिलेले दिसून येत नाही. पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक बँका कधी पूर्ण करतील हे निश्चित सांगता येत नाही.

प्रस्तावित पीक लागवड क्षेत्र सोयाबीन २,७५,०००, तूर ६२,०००, कापूस २३,५००, मूग १६,०००, उडीद १९,९१६, ज्वारी ७०००, तीळ २०००, इतर पिके १२००.

पीकनिहाय बियाणे नियोजन (क्विं.) सोयाबीन ९२,८१२, तूर ४१८५, कापूस ५९२, मूग १२४८, उडीद १५६०, ज्वारी ५२५, मका ७५, तीळ ४३.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com